Saturday, 20 June 2020

Text - AIR News Bulletin, Aurangabad 20.06.2020....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20 June 2020

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० जून २०२० सायंकाळी ६.००

****

·      गलवान संघर्षाबाबत खोडसाळपणा करू नये - पंतप्रधान कार्यालयाचं आवाहन.

·      जालना इथं शिक्षकांची मुख्यमंत्रीनिधीला एक कोटी तेवीस लाख रुपयांची मदत.

·      नांदेड जिल्ह्यातील तेवीस रुग्ण कोरोना विषाणूमुक्त.

आणि

·      साहित्यिक किशोर घोरपडे यांचं निधन.

****

भारत आणि चीन या दोन देशांमधे गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षाबाबत बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत, पंतप्रधानांनी केलेल्या विधानांचा काहीजण चुकीचा अर्थ काढून खोडसाळपणा करत आहेत असं पंतप्रधान कार्यालयानं म्हटलं आहे. असा खोडसाळपणा न करण्याचं आवाहन कार्यालयानं केलं आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर मोठ्या प्रमाणावर जमून, चिनी सैन्यानं वादग्रस्त भागात बांधकाम करायचा प्रयत्न केला. तसं न करण्याचा इशारा देऊनही त्यांनी काम सुरूच ठेवल्यानंतर भारतीय जवानांनी त्यांना साजेसं प्रत्युत्तर दिलं, असं पंतप्रधान कार्यालयानं आज सांगितलं. म्हणूनच, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर होणाऱ्या कुठल्याही आगळिकीला चोख प्रत्युत्तर देण्याची भारताची क्षमता असून, गलवान संघर्षात, भारताच्या हद्दीत कुणी घुसखोरी केलेली नाही अथवा भारतानं कुणाच्या हद्दीत अतिक्रमण केलेलं नाही, असं पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठकीत सांगितल्याचं, पंतप्रधान कार्यालयानं नमूद केलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पळशी इथं आज सर्वाधिक ६ रुग्णांना कोरोना विषाणुची लागण झाली आहे.याशिवाय पिसादेवी इथं २ आणि कन्नड इथं एक रुग्ण आढळून आला. आज जिल्ह्यात १०२ रुग्णांना बाधा झाल्याचे अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये ४७ महिला आणि ५५ पुरुषांचा समावेश आहे.

****

कोरोना विषाणू संकटाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत पाच हजार ९११ शिक्षकांनी आपल्या एक दिवसाच्या वेतनातून कपात झालेला एक कोटी पाच लाख २३ हजार रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीस दिला आहे. मदत निधीची ही रक्कम प्रत्येक शिक्षकाकडून वैयक्तिक धनादेशाद्वारे जमा न करता जिल्हा परिषदेच्या लेखा आणि वित्त विभागाने एकत्रितरीत्या कपात करून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्री सहायता निधीच्या खात्यात जमा केली आहे. राज्यात या प्रणालीचा वापर करून अशा प्रकारे ऑनलाईन मदत निधी हस्तांतरित करण्याचा पहिला आणि एकमेव प्रयोग जालना जिल्हा परिषदेनं केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी उत्तम चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात कार्यरत सर्व शिक्षकांचं प्रत्येक महिन्याचं वेतन याच प्रणालीचा वापर करून एकाच वेळी थेट बँक खात्यात जमा केलं जातं, असंही चव्हाण यांनी या निमित्त सांगितलं.

****

लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यात आजपासून तीन दिवसांसाठी जनता संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तालुक्यातल्या मदनसुरी इथं एका कोरोना विषाणू बाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे नगराध्यक्ष श्रीकांत शिंगाडे यांनी हा निर्णय घेतला आहे. हा रुग्ण शहरात अनेकांच्या संपर्कात आला होता त्यामुळे ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या रुग्णावर उपचार केलेल्या उपजिल्हा रुग्णालयातल्या डॉक्टर, परिचारिकांसह ३६ जणांना विलगीकरणात ठेवण्यात आलं असल्याची माहिती निलंगा इथले उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी दिली. शहरातल्या नागरिकांनी अनावश्यक फिरु नये, अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांनी मास्क, निर्जंतुकीकरण औषधाचा वापर करावा, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यात आज कोरोनाबाधित एकुण २३ रूग्ण उपचारानंतर बरे झाल्यानं त्यांना घरे सोडण्यात आलं. जिल्ह्यात आता रूग्णालयातून सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या २०९ झाली आहे. दरम्यान, अज आज नवे ४ रूग्ण कोरोनाविषाणू बाधीत असल्याचं आढळून आलं आहे. आता जिल्हयातील कोरोना विषाणूच्या रूग्णांची संख्या ३०४ झाली आहे.

****

मूळ पाकिस्तानचा आणि कॅनडातील व्यावसायिक तहव्वूर राणाला सहव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्लाप्रकरणी अमेरिकेत अटक करण्यात आलं असल्यानं त्याच्या प्रत्यार्पणानंतर आयएसआयच्या कारवायांवर अधिक प्रकाश पडेल, असं विशेष सरकारी वकील उज्जव निकम यांनी म्हटलं आहे. भारतानं त्याला फरार घोषित केलं असून अमेरिकेनं त्याला अटक करून त्याचं प्रत्यार्पण करायची विनंती केल्याच्या पार्श्र्वभूमीवर गेल्या दहा तारखेला लॉस एंजल्स इथं त्याला अटक करण्यात आली आहे. भारतामधे दहशतवादी कारवायांचा कट रचल्याचे त्याच्याविरुद्ध आरोप असल्याचे सहव्वीस अकरा प्रकरणी विशेष सरकारी वकील असलेल्या निकम यांनी म्हटलं आहे.

****

जालना शहराच्या आनंद नगर भागातल्या एका पासष्ट वर्षीय कोरोना विषाणू ग्रस्ताचा आज जिल्हा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे झालेला हा अकरावा मृत्यू आहे. दरम्यान, जालना शहरातल्या वेगवेगळ्या भागात आणखी सहा नवे रुग्ण आढळून आले असून, एकूण रुग्ण संख्या आता ३५९ झाली आहे.

****

पालघर जिल्ह्यातील सुमारे तीस आदिवासी स्वयंसेवक आता कोरोना विषाणूच्या उपचारांसाठी स्थापन रुग्णालयात काम करणार आहेत. एका अशासकीय संस्थेचे सदस्य असलेल्या या स्वयंसेवकांमधे सहा महिला असून सगळ्यांना शुश्रुषेचं प्राथमिक प्रशिक्षण दिलं जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. वसईतील गोल्डन पार्क रुग्णालय तसंच मीरा भायंदर इथल्या इंदिरा गांधी रुग्णालयात हे स्वयंसेवक काम करणार आहेत.

****

अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित २६६ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात ४१६ जणांना या विषाणूची लागण झाली असून बरे होण्याचं प्रमाण ६३ पूर्णांक ९४ टक्के आहे. आज जिल्ह्यात १० जणांना लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला असल्याची माहिती अमरावती प्रशासनानं दिली आहे.

****

धुळे शहरातल्या बँकांमधे सामाजिक अंतर राखण्याचे नियम पाळले जात नसल्याचं निदर्शनास आल्यामुळे, बँकांनी नियमांचं पालन करावं, अन्यथा त्यांच्याविरोधात नियमानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका आयुक्त अजिज शेख यांनी दिला आहे. अनेक बँकांमध्ये निर्जंतुकीकरणाची व्यवस्था नाही, कोरोना प्रतिबंधासाठीच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्यानं महापालिकेनं सर्व राष्ट्रीयीकृत, खासगी बँक, सहकारी पतसंस्थांना या संदर्भातलं पत्र पाठवले आहे.

****

अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोना बाधित ०६ नवीन रुग्ण आढलून आले. यामध्ये संगमनेर तालुक्यातल्या ०३, पारनेर तालुक्यातल्या दोन आणि नगर शहरातल्या एका व्यक्तिचा समावेश आहे. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या २८२ झाली असून आतापर्यंत उपचारानंतर २३७ जण झाले आहेत.

****

वाशिम जिल्ह्यात कोरोना विषाणूबाधित सहा जणांना आज उपचारानंतर बरे झल्यावर घरी सोडण्यात आलं आहे. यामधे वाशिम इथल्या दोन महिला आणि एक पुरुष, बोराळा हिस्से इथला एक पुरुष, शेलूबाजार आणि शेमलाई इथल्या प्रत्येकी एका महिलेचा यात समावेश असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. 

****

साहित्यिक किशोर घोरपडे यांचं आज जालना इथं ह्रदयविकारानं निधन झालं. ते  ७८ वर्षांचे होते. घोरपडे यांचे डहाळी, दलदल हे काव्यसंग्रह तर ‘धग’, ‘घुसमट’ हे कथासंग्रह लोकप्रिय आहेत, आपल्या लिखाणातून सामाजिक वास्तवाचं भान निर्माण करणारे घोरपडे, ‘स्नेहल लक्षवेधी’ या नावानं समाजाचे प्रश्न वृत्तपत्रातून मांडत. ‘महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा गुणवंत कामगार पुरस्कार’, ‘महानुभाव ग्रंथोतेजक पुरस्कार’, ‘विश्वकर्मा पुरस्कार’, ‘अस्मितादर्श वाङमय पुरस्कार’, ‘तुका म्हणे वाङमय पुरस्कार’ आदी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. पहिल्या राज्यस्तरीय श्रमिक साहित्य संमेलनात किशोर घोरपडे यांना जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या पार्थिव देहावर आज जालना इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.

****

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या योगशास्त्र विभागाच्यावतीनं उद्या `वेबिनार`चं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी सात वाजता याला सुरुवात होणार असून योग शिक्षक सुशीला बन्सवाल मार्गदर्शन करणार आहेत. या उपक्रमात सहभागी व्हावं, असं आवाहन विभाग प्रमुख, संयोजक डॉ.सोनाली क्षीरसागर आणि डॉ.टी.आर.पाटील यांनी केलं आहे.

****

लातूरच्या दयानंद शिक्षण संस्थेतर्फे कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी २ लाख ९१ हजार सहाशे रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहय्यता निधीस देण्यात आला आहे. संस्थेच्या शिक्षक कर्मचाऱ्यांनी यासाठे आपलं दोन दिवसांचं वेतन दिलं आहे.

****

हिंगोली इथल्या पोलिस मुख्यालयातल्या शस्त्रागारातले पोलिस कर्मचारी जितेंद्र साळी यांनी आज गोळी झाडून घेत आत्महत्या केली. ते ४३ वर्षांचे होते. आज दुपारच्या सुमारास ते विभागात कामासाठी आले असता कार्यालयातच त्यांनी आत्महत्या केली. ते मूळचे कळमनुरी इथले होते, २००१ पासून ते हिंगोली पोलिस दलात भरती झाले होते. शहर पोलिस स्थानकात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी शिवारात ओढ्यात वाहून गेलेल्या वृध्द दांपत्यापैकी महिलेचा मृतदेह आज सापडला. असोलवाडीचे हे पती-पत्नी काल बैलगाडीसह वाहून गेलं होते. कालपासून शोधकार्य सुरु होतं. कुंडलीक असोले आणि ध्रुपदाबाई असोले अशी या दोघांची नावं असून कुंडलीक असोले यांचा अद्याप शोध लागला नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 10 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...