Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –
05 March 2021
Time
1.00pm to 1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– ०५ मार्च २०२१ दुपारी ०१.०० वा.
****
राज्यातल्या धुळे, नंदुरबार, नागपूर, अकोला, वाशिम, गोंदिया या जिल्हा परिषदांमधील आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं
दिलेल्या निर्णयाचा फटका इतर मागासवर्गीयांना बसू नये, त्यांच्या
हिताचं रक्षण व्हावं ही राज्य सरकारची ठाम भूमिका आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या
निर्णयाला ५ न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर आव्हान देण्यासाठी यासंदर्भात राज्याचे
महाधिवक्ता तसंच दिल्लीतल्या वरिष्ठ वकीलांशी चर्चा करण्यात येईल. विरोधी पक्षनेते
आणि दोन्ही बाजुंच्या नेत्यांशी बैठक आयोजित करुन पुढील कायदेशीर व्यूह रचना
करण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली. विरोधी
पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते
बोलत होते.
****
मुंबईत कोरोना विषाणुचा संसर्ग
वाढत असल्यानं मुंबई महापालिकेनं नियमांच्या कठोर अंमलबजावणीला सुरुवात केली आहे.
युरोपियन, आखाती
देशांतून येणाऱ्या प्रवाशांसह आता ब्राझिलमधल्या प्रवाशांनाही विलगीकरणाचा नियम
बंधनकारक करण्यात आला आहे. अशा प्रवाशांना कोरोना विषाणू संसर्ग नसल्याचं चाचणीतून
स्पष्ट झालं तरी सात दिवस संस्थात्मक तर सात दिवस घरी विलगीकरणात रहावं लागणार
आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर इंग्लडसह युरोप, पूर्व मध्य आशिया, दक्षिण अफ्रिकेतून येणाऱ्या
प्रवाशांना कोरोना चाचणी आणि भारतात आल्यावर विलगीकरण बंधनकारक करण्यात आलं आहे.
****
केंद्रीय माहिती आणि प्रसारण
मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आज कोविड
विषाणु प्रतिबंधक लस घेतली. लसीकरण प्रक्रिया सोपी असून भारतात तयार झालेल्या लस
सुरक्षित असल्याचं जावडेकर यांनी ही लस घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना नमूद
केलं. सर्वांनी लसीकरण करुन घ्यावं असं आवाहन ही त्यांनी यावेळी केलं.
****
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
यांनीही आज मुंबईतल्या सर जे. जे. शासकीय रुग्णालयात कोविड-१९ विरोधी कोव्हॅक्सीन
लसीचा पहिला डोस घेतला. यावेळी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालक डॉ.तात्याराव
लहाने, अधिष्ठाता
डॉ.रणजीत माणकेश्वर, डॉ.विजय सुरासे आदी उपस्थित होते.
****
सांगलीतल्या कवठेमंकाळ
तालुक्यात बोरगाव इथं भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या
कार्यकर्त्यांमध्ये काल हाणामारी झाली. उपसरपंच निवडीवेळी ग्रामपंचायतीबाहेर
झालेल्या या मारामारीत ग्रामपंचायत सदस्य जनार्धन काळे यांचा मृत्यू झाला.
****
दिवसेंदिवस लोकप्रिय ठरत
असलेल्या नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम सारख्या ओटीटी वाहिन्यांवर प्रदर्शित केल्या जाणाऱ्या
मालिका आणि कार्यक्रमांवर अंकुश ठेवण्याची गरज सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केली
असून, याबाबत नव्यानेच तयार करण्यात आलेले नियम आजपासून लागू
करण्याच्या सूचना सरकारला दिल्या आहेत. ॲमेझॉन प्राईमच्या भारतातल्या प्रमुख
अपर्णा पुरोहित यांनी दाखल केलेल्या याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च
न्यायालयानं हे निरीक्षण नोंदवलं आहे. दरम्यान, काही ओटीटी
वाहिन्यांवर प्रसारित होणाऱ्या अनेक कार्यक्रमांतून दाखवली जाणारी अश्लीलता ही
चिंताजनक आहे, असं मत न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या
अध्यक्षतेखाली नेमलेल्या खंडपीठानं व्यक्त केलं आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार
असून तत्पूर्वी ओटीटी वाहिन्यांवर सरकारनं निर्बंध जारी करावेत, असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.
****
तिरुपती रेल्वे स्थानकावर सुरु
असलेलं विद्युतीकरण आणि इतर दुरुस्तीच्या कामांमुळे नांदेड रेल्वे विभागातील काही रेल्वे गाड्या
रद्द करण्यात आल्या आहेत तर एका रेल्वे गाडीचा मार्ग बदलण्यात आला आहे. तिरुपती-अमरावती
द्वी-साप्ताहिक एक्स्प्रेस उद्या ६ तारखेला आणि ११ तारखेला पूर्णतः रद्द करण्यात
आली आहे. परतीच्या प्रवासासाठीच्या ८ आणि ११मार्चच्या फेऱ्याही पूर्णतः रद्द
करण्यात आल्या आहेत.
रामेश्वरम ते ओखा साप्ताहिक एक्स्प्रेस आज
काटपाडी-तिरुपती-रेणीगुंठा या नियमित मार्गाने न धावता मार्ग बदलून काटपाडी- मेल्पाक्कम- रेणीगुंठा या मार्गाने
धावेल. रेणीगुंठाच्या पुढे ओखापर्यंत ती आपल्या नियमित मार्गानेवरुनच जाईस, असं रेल्वे विभागानं
कळवलं आहे.
****
संपूर्ण महाराष्ट्रातून
लाखोंच्या संख्येने गर्दी होणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंगणेवाडी आणि
कुणकेश्वर यात्राना कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना प्रवेश
नाकारण्यात आला आहे. सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी ही माहिती
दिली. आंगणेवाडी यात्रा ६ मार्चला तर कुणकेश्वर यात्रा ११ मार्चला होणार आहे.
आंगणेवाडी यात्रा केवळ ५० जणांच्या उपस्थितीत करण्याचे निर्देश प्रशासनानं दिले आहेत.
****
No comments:
Post a Comment