Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22
April 2021
Time 18.10
to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ एप्रिल २०२१ सायंकाळी ०६.१०
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत
पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात
येत आहे. प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा
अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. नाक आणि तोंडाला मास्क
लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, वेळोवेळी साबणाने हात धुवावेत. हात आणि
तोंड स्वच्छ ठेवावं. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.
****
**
प्राणवायू पुरवठा, औषधं आणि उपलब्ध खाटा, लसीकरणाची पद्धत यावर एक राष्ट्रीय धोरण तयार
करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश
**
सर्व राज्यांना सुरळित प्राणवायू पुरवठा सुनिश्चित करण्याची पंतप्रधानांची सूचना
**
विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन घेणार- उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
आणि
**
परभणी जिल्ह्यात आठ दिवसांत एक हजार खाटांची कोवीड उपचार केंद्रं उभारणार- पालकमंत्री
नवाब मलिक यांची माहिती
****
देशातली
कोरोना विषाणू संसर्गाची चिंताजनक परिस्थिती लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयानं एक स्वाधिकारे
- सुमोटो याचिका दाखल करुन केंद्र सरकारला एक नोटीस जारी केली आहे. या याचिकेत देशातल्या
रुग्णालयांमध्ये प्राणवायू पुरवठा, औषधं आणि उपलब्ध खाटा, लसीकरणाची पद्धत यावर एक
राष्ट्रीय धोरण तयार करावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत.
सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं आज हे निर्देश दिले. देशात
वेगवेगळ्या सहा उच्च न्यायालयात या संबंधी याचिकांवर सुनावणी सुरू आहे. त्यामुळे या
प्रकरणात संदिग्धता निर्माण होऊ शकते. ही गोष्ट लक्षात घेता या सर्व याचिका सर्वोच्च
न्यायालयाकडे वर्ग करण्याचे निर्देश या खंडपीठानं दिले आहेत. या प्रकरणी न्यायालयिन
मित्र म्हणून ज्येष्ठ विधिज्ज्ञ हरिश साळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
****
ही
आणिबाणीची परिस्थिती
आहे याचं तुम्ही भान ठेवायला हवं अशा
शब्दात आज मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहे. कोरोनाकाळातल्या अव्यवस्थेच्या
विरोधात दाखल करण्यात आलेल्या एक जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं हे
मत नोंदवलं आहे.
कोविड
१९ च्या संदर्भातल्या सर्व मार्गदर्शक सूचना मुद्रित माध्यमांना आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांना
द्यायला हव्यात यावर न्यायालयानं भर देतांनाच समाजमाध्यमं यात आणखी गोंधळ घालत असल्याचंही मत न्यायालयानं व्यक्त
केलं.
****
सर्व राज्यांना प्राणवायुचा पुरवठा सुरळीत तसंच सुयोग्य
पद्धतीनं होईल हे सुनिश्चित करावं असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज या संबंधी आयोजित एका उच्चस्तरीय बैठकीत दिले आहेत. पंतप्रधानांनी
या बैठकीत प्राणवायू उत्पादन वाढवणं तसंच पुरवठा सुरळीत करण्याविषयी
विचारविनिमय केला. प्राणवायू पुरवठ्यात काही अडचणी येत असतील तर स्थानिक
प्रशासनांची जबाबदारी निश्चित करण्यात यावी यावर पंतप्रधानांनी यावेळी भर दिला. प्राणवायुचा बेकारदेशीर साठा करणाऱ्यांवर राज्यांनी कडक कारवाई
करावी आणि प्राणवायुच्या वाहतुकीसंदर्भात ठोस व्यवस्था करावी असंही पंतप्रधानांनी सांगितलं.
प्राणवायुची मागणी प्रतिदिन तीन हजार ३०० मेट्रीक टननं वाढत असून या मागणीच्या
पूर्ततेसाठी देशभरात आरोग्य यंत्रणेव्यतिरिक्त कोणत्याही उद्योगांना प्राणवायु दिला
जात नसल्याचं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी स्पष्ट केलं.
****
राज्यातल्या
१३ अकृषी विद्यापीठाच्या सर्व विभागांच्या सर्व परिक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय राज्यसरकारनं
घेतला आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज या विद्यापीठांच्या कुलगुरुंची
दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेतली. त्यांनतर ते पत्रकार परिषदेत बोलत
होते. ते म्हणाले...
सर्वांनुमते असा निर्णय घेतलेला
आहे की, महाराष्ट्र राज्याच्या तेराही अकृषी विद्यापीठामध्ये उर्वरीत असलेल्या सगळ्या
परीक्षा ह्या ऑनलाईन पद्धतीनचं घेण्यात येतील. ऑनलाईन पद्धतीमधून या परीक्षा घेत असताना
जर विद्यार्थ्यांना काही तांत्रिक अडचण निर्माण होणार असेल तर त्याची पूर्तता करण्याच्या
सूचना विद्यापीठांच्या कुलगुरु महोदयांना केलेली आहे. जेणेकरुन या ऑनलाईन एक्झाम मधून
कुठलेही विद्यार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता विद्यापीठाने, महाविद्यालयाने आणि
संस्थाचालकाने घेतली पाहिजे.
कोविड
विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर प्राध्यापक भरती सुरु करण्यात येईल अशी
माहितीही डॉ. सामंत यांनी यावेळी दिली.
****
औरंगाबाद
शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आज २५ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये
औरंगाबाद जिल्ह्यातल्या १९ रुग्णांचा समावेश असून अहमदनगर आणि जालना इथले प्रत्येकी
दोन तर हिंगोली, बीड इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात
कोरोना विषाणू संसर्गानं आतापर्यंत दोन हजार २७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातल्या
एकूण रुग्णांची संख्या आता एक लाख १३ हजार ३७ झाली असून पंधरा हजार २१ रुग्णांवर उपचार
सुरु आहेत.
****
बीड
जिल्ह्यात आज एक हजार १४५ नवे कोविड बाधित रुग्ण आढळले. यामध्ये सर्वाधिक २२६ रुग्ण
हे बीड तालुक्यातील असून अंबाजोगाई २०५, आष्टी १३८, केज ११९, गेवराई ११६, पाटोदा ९१,
परळी ७७, माजलगाव ६५, धारुर ४३, शिरुर ३३ आणि वडवणी इथल्या ३२ रुग्णांचा समावेश आहे.
****
राज्यात
कोरोना विषाणू संसर्गाची गंभीर आणि भयावह परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारकडून राज्याला
दिवसाला २६ हजारांऐवजी ५० हजार रेमडेसिवीर औषधाचा पुरवठा करावा, अशी मागणी राष्ट्रवादी
काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. केंद्र
सरकार कडून राज्याला फक्त २६ हजार रेमडेसिवीर
मिळणार असल्याचं सांगितलं गेलं असल्यामुळे हे संकट अधिकच वाढेल, अशी भीती मलिक यांनी
व्यक्त केली आहे. सध्या राज्याला दररोज ३६ हजार रेमडेसिवीर प्राप्त होत असून नव्या
वाटपानुसार ती कमी करून २६ हजार केली जाणार असल्यानं राज्यातल्या जनतेला ती पुरणार
नाहीत असं नमुद करत मलिक यांनी केंद्र सरकारच्या या धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली
आहे.
****
केंद्र सरकारवर टीका करण्याऐवजी राज्यातल्या सरकारनं या संसर्ग
काळात आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी नेमकं काय केलं, याची आकडेवारी सर्वांसमोर ठेवली
पाहिजे, अशी टीका विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. आपलं अपयश सांगता येत नाही म्हणून केंद्राकडे बोट
दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न राज्य सरकारकडून वारंवार केला जात असल्याचा आरोपही त्यांनी
केला आहे. प्राणवायूचा तुटवडा काही एका दिवसात निर्माण झालेला नाही, रुग्ण वाढत असताना
तुटवडा निर्माण होऊ शकतो, हे वेळीच ओळखून जर सरकारनं नियोजन केलं असत तर आज ही परिस्थिती
निर्माण झाली नसती, असं दरेकर यांनी म्हटलं आहे.
****
परभणीत
५०० खाटांचं तर
आठ तालुक्यांच्या ठिकाणी प्रत्येकी ५० खाटांच्या क्षमतेचं कोवीड
उपचार केंद्र येत्या आठ दिवसात उभारलं जाणार
असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री
नवाब मलिक
यांनी दिली आहे. ते आज परभणीत पत्रकार परिषदेत बोलत होते. याद्वारे जिल्ह्यात एक हजार
खाटांची क्षमता वाढणार असून या केंद्रांमधून
वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी तसंच अन्य
सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. जिल्ह्यातल्या कोवीड
केंद्रांमध्ये
प्राणवायू पुरवठा सुरळीत व्हावा यादृष्टीनं जिल्हा
प्रशासनानं उपाययोजना
अवलंबल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. परभणी शहरासह जिल्ह्यातल्या कोविड
केंद्रांना पुरेसा रेमडेसिव्हीरचा पुरवठा सुरू आहे, आजच जिल्ह्याला मोठया
प्रमाणात रेमडेसिव्हीरचा साठा उपलब्ध होईल, अशी माहितीही मलिक यांनी यावेळी दिली.
****
औरंगाबाद
जिल्ह्यातल्या पैठण इथं आज चैत्र शुद्ध दशमीला शालिवाहन शक ही कालगणना सुरु करणारे
सम्राट शालिवाहन राजाची जयंती साजरी करण्यात आली. कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं पालन
करत मोजक्याच जणांच्या उपस्थितीत ही जयंती साजरी करण्यात आली. यावेळी इतिहास प्रेमी
नागरिकांनी संत ज्ञानेश्वर उद्यानात पुराण वस्तू संग्रहालय उभं करण्याची मागणीही केली.
****
परभणी इथल्या पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर
शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजकीय, सामाजिक कार्यकर्ते डॉ. शिवाजी दळणर यांचं आज दुपारी निधन
झालं. ते ६६ वर्षांचे होते.
त्यांनी शिवसेनेचे
जिल्हाप्रमुख, सह संपर्क प्रमुख म्हणून काम केलं होतं
तसंच गंगाखेड विधानसभा मतदार संघाची निवडणुकही शिवसेनेच्यावतीनं लढवली
होती. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुणे इथं उपचार सुरु होते. डॉ. दळणर यांच्या पार्थीव
देहावर आज रात्री आठ वाजता राणीसावरगाव इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
//*********//
No comments:
Post a Comment