Friday, 23 April 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 23.04.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 April 2021

Time 7.10AM to 7.25AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २३ एप्रिल २०२१ सकाळी ७.१० मि.

****

कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.

****

·      देशातल्या रुग्णालयांमध्ये प्राणवायू पुरवठा, औषधं आणि उपलब्ध खाटा, लसीकरणाची पद्धत, याबाबत राष्ट्रीय धोरण तयार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश.

·      सर्व राज्यांना प्राणवायुचा पुरवठा सुरळीत तसंच सुयोग्य पद्धतीनं करण्याच्या पंतप्रधानांच्या सूचना.

·      प्राणवायुच्या आंतरराज्य वाहतुकीवर निर्बंध नाहीत - केंद्र सरकारचं स्पष्टीकरण.

·      राज्यातल्या कामगारांची सुरक्षा आणि आरोग्य हितांसाठी कारखान्यांमध्ये कोविड दक्षता समितीस्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना.

·      राज्यातल्या अकृषी विद्यापीठांच्या सर्व परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय.

·      राज्यात ६७ हजार १३ नवीन कोविड रुग्णांची नोंद, मराठवाड्यात १६६ जणांचा मृत्यू तर सात हजार ८०० बाधित.

·      हिंदी चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध संगीतकार श्रवण कुमार राठोड, सोलापूरचे संस्कृत पंडीत गुलाम दस्तगीर बिराजदार, परभणीचे सामाजिक कार्यकर्ते डॉ.शिवाजी दळणर आणि उस्मानाबादचे ज्येष्ठ पत्रकार मोतीचंद बेदमुथा यांचं निधन.

णि

·      पालघर जिल्ह्यातल्या वसई इथं रुग्णालयाच्या लागलेल्या आगीत १२ जणांचा मृत्यू.

·      राज्यातल्या २०४० कोटी रुपयांच्या २७२ रस्ते प्रकल्पांना मंजुरी.

****

देशातल्या रुग्णालयांमध्ये प्राणवायू पुरवठा, औषधं आणि उपलब्ध खाटा, लसीकरणाची पद्धत, यावर एक राष्ट्रीय धोरण तयार करावं, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं काल हे निर्देश दिले. देशातली कोरोना विषाणू संसर्गाची चिंताजनक परिस्थिती लक्षात घेऊन, सर्वोच्च न्यायालयानं एक स्वाधिकारे - सुमोटो याचिका दाखल करुन घेत, केंद्र सरकारला नोटीस जारी केली आहे. देशात वेगवेगळ्या सहा उच्च न्यायालयात या संबंधी याचिकांवर सुनावणी सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणात संदिग्धता निर्माण होऊ शकते, ही गोष्ट लक्षात घेता, या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाकडे वर्ग करण्याचे निर्देश या पीठानं दिले आहेत. या प्रकरणी न्यायालयीन मित्र म्हणून ज्येष्ठ विधिज्ज्ञ हरिश साळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई उच्च न्यायालयानंही यासंदर्भात दाखल एका याचिकेच्या सुनावणी दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकारला, कोविड परिस्थितीवर मात करण्यासाठी कशाप्रकारे व्यवस्थापन करत आहात, असा सवाल केला. न्यायालयानं यासंदर्भात चार मे पर्यंत उत्तर देण्यास सांगितलं आहे. औरंगाबादच्या खंडपीठानंही यासंदर्भात एक स्वत:हून याचिका दाखल करुन घेतली. त्याची २६ एप्रिलला ऑनलाईन सुनावणी होणार आहे.

रम्यान, देशातील कोरोना विषाणू संसर्गाच्या स्थितीचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एका उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेणार आहेत. सर्वाधिक बाधितांची संख्या असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी तसंच प्रमुख प्राणवायू उत्पादक कंपन्यांच्या उत्पादकांशी ते चर्चा करतील. या बैठकीमुळे पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार दौरा त्यांनी रद्द केला आहे. ट्वीट संदेशाद्वारे त्यांनी ही माहिती दिली. मोदी यांच्या आज बंगालमध्ये चार प्रचारसभा नियोजित होत्या.

****

सर्व राज्यांना प्राणवायुचा पुरवठा सुरळीत तसंच सुयोग्य पद्धतीनं होईल हे सुनिश्चित करावं, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, काल या संबंधी आयोजित एका उच्चस्तरीय बैठकीत दिले आहेत. पंतप्रधानांनी या बैठकीत प्राणवायू उत्पादन वाढवणं, तसंच पुरवठा सुरळीत करण्याविषयी विचारविनिमय केला. प्राणवायू पुरवठ्यात काही अडचणी येत असतील, तर स्थानिक प्रशासनांची जबाबदारी निश्चित करण्यात यावी, यावर पंतप्रधानांनी यावेळी भर दिला. प्राणवायुचा बेकादेशीर साठा करणाऱ्यांवर राज्यांनी कडक कारवाई करावी, आणि प्राणवायुच्या वाहतुकीसंदर्भात ठोस व्यवस्था करावी, असंही त्यांनी सांगितलं.

****

एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्राण वायुची वाहतूक होत असेल, तर अशा वाहनांची अडवणूक करु नये, आणि प्राण वायुच्या वाहतुकीवर कोणतेही निर्बंध घालू नयेत,शा सूचना केंद्र सरकारनं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत. केंद्रीय गृहसचिव आणि राष्ट्रीय कार्यकारी समितीचे अध्यक्ष अजयकुमार भल्ला यांनी, यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. प्राणवायू वाहून नेणाऱ्या वाहनांना वेळेचंही कोणतं बंधन नसेल, असं यात स्पष्ट करण्यात आलं आहे.

****

राज्यातल्या कोविड रुग्णांसाठी प्राणवायुची तीव्र टंचाई भासत असून, राज्याला आणखी प्राणवायू द्यावा, अशी मागणी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. केंद्र सरकारनं आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, प्राणवायुच्या वाटपाचा कोटाही केंद्र सरकारच्या हातात आहे. महाराष्ट्रासाठी ठरवण्यात आलेला वाटा ग्रीन कॉरीडॉर करुन इतर राज्यातून तातडीनं उपलब्ध करुन द्यावा, त्यासाठी राज्य सरकार सगळ्या पद्धतींनी नम्रतेने विनंती करत असल्याचं टोपे म्हणाले. 

****

राज्यातल्या कामगारांची सुरक्षा आणि त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत, कारखान्यांमध्ये कोविड दक्षता समितीस्थापन करण्यात यावी, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. राज्यातल्या कामगार संघटनांसोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. कामगार मंत्री हसन मुश्रीफ, खासदार अरविंद सावंत तसंच आमदार, प्रमुख अधिकारी, कामगार संघटनांचे प्रतिनिधी, या बैठकीला उपस्थित होते. गेल्या वर्ष ते सव्वा वर्षाहून अधिक काळ आपण कोविड संसर्गाशी लढत असून, येणाऱ्या वर्षभरात कोविड संसर्गाशी मुकाबला करताना, राज्यातले उद्योगधंदे सुरु राहण्याबरोबरच, राज्याचं अर्थचक्र सुरु राहणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. कोविड सुसंगत वर्तणूक आत्मसात करण्यासाठी कामगार संघटनांनी पुढाकार घेऊन कामगारांना काही महत्वपूर्ण नियमांचं पालन करणं किती आवश्यक आहे हे पटवून द्यावं, असं त्यांनी यावेळी सांगितलं.

****

राज्याला प्रतिदिन २६ हजारांऐवजी ५० हजार रेमडेसिवीर औषधाचा पुरवठा करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. केंद्र सरकारकडून राज्याला फक्त २६ हजार रेमडेसिवीर मिळणार असल्याचं सांगितलं गेलं असल्यामुळे, हे संकट अधिकच वाढेल, अशी भीती मलिक यांनी व्यक्त केली. सध्या राज्याला दररोज ३६ हजार रेमडेसिवीर प्राप्त होत असून, नव्या वाटपानुसार ती कमी करून २६ हजार केली जाणार असल्यानं, राज्यातल्या जनतेला ती पुरणार नाहीत असं नमूद करत मलिक यांनी, केंद्र सरकारच्या या धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

****

राज्यातल्या १३ अकृषी विद्यापीठाच्या सर्व विभागांच्या सर्व परिक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय, राज्य सरकारनं घेतला आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल या विद्यापीठांच्या कुलगुरुंची दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेतली. त्यांनतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले

सर्वांनुमते असा निर्णय घेतलेला आहे की, महाराष्ट्र राज्याच्या तेराही अकृषी विद्यापीठांमध्ये उर्वरीत असलेल्या सगळ्या परीक्षा ह्या ऑनलाईन पद्धतीनंच घेण्यात येतील. ऑनलाईन पद्धतीमधून या परीक्षा घेत असताना जर विद्यार्थ्यांना काही तांत्रिक अडचण निर्माण होणार असेल तर त्याची पूर्तता करण्याच्या सूचना विद्यापीठांच्या कुलगुरु महोदयांना केलेली आहे. जेणेकरुन या ऑनलाईन एक्झाम मधून कुठलेही विद्यार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता विद्यापीठाने, महाविद्यालयाने आणि संस्थाचालकाने घेतली पाहिजे.

कोविड विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर प्राध्यापक भरती सुरु करण्यात येईल, अशी माहितीही सामंत यांनी यावेळी दिली.

****

देशातल्या १८ वर्षांवरील सर्व नागरिकांच्या लसीकरणासाठीची नोंदणी, येत्या २८ एप्रिलपासून सुरु होणार आहे. त्यासाठी पात्र असणाऱ्यांना `कोविन जीओव्ही इन` या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. नोंदणी केलेल्यांना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात येत्या एक मे पासून लस दिली जाणार असल्याची माहिती, केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे देण्यात आली. सर्व सरकारी लसीकरण केंद्रावर ही लस विनामूल्य दिली जाणार असून, त्या बरोबरच आरोग्य कर्मचारी आणि पंचेचाळीस वर्षावरील नागरिकांचंही लसीकरण सुरुच राहणार आहे. लस उत्पादन कंपन्यांना आपल्या उत्पादित लसींपैकी पन्नास टक्के लसींच्या मात्रा या राज्य सरकारांना तसंच खुल्या बाजारात थेट विकण्याची मुभाही देण्यात आल्याचं मंत्रालयानं नमूद केलं आहे.

****

राज्यात काल ६७ हजार १३ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या ४० लाख ३४ हजार ५४० झाली आहे. काल ५६८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ६२ हजार ४७९ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ५३ शतांश टक्के झाला आहे. काल ६२ हजार २९८ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ३३ लाख ३० हजार ७४७ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८१ पूर्णांक ३४ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात सहा लाख ९ हजार ८५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल नव्या सात हजार ८०० कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १६६ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या २४, लातूर ३८, नांदेड २७, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी २१, परभणी १९, जालना दहा, तर हिंगोली जिल्ह्यातल्या सहा रुग्णांचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार ४५८ रुग्ण आढळले. लातूर जिल्ह्यात एक हजार २६९, परभणी एक हजार २२०, बीड एक हजार १४५, नांदेड एक हजार ९९, उस्मानाबाद ७१९, जालना ५५१, तर हिंगोली जिल्ह्यात ३३९ नवे रुग्ण आढळून आले. 

****

परभणीत पाचशे खाटांचं तर आठ तालुक्यांच्या ठिकाणी प्रत्येकी पन्नास खाटांच्या क्षमतेचं कोविड उपचार केंद्र, येत्या आठ दिवसात उभारलं जाणार असल्याची माहिती, पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिली. ते काल परभणीत वार्ताहरांशी बोलत होते. यामुळे जिल्ह्यात एक हजार खाटांची क्षमता वाढणार असून, या केंद्रांमधून वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी तसंच अन्य सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. जिल्ह्यातल्या कोवीड केंद्रांमध्ये प्राणवायू पुरवठा सुरळीत व्हावा यादृष्टीनं जिल्हा प्रशासनानं उपाययोजना केल्या असल्याचं, त्यांनी सांगितलं.

****

राज्य सरकारच्या कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्याच्या मोहिमेअंतर्गत लागू कडक निर्बंधांमध्ये, केश कर्तनालयं बंद ठेवण्याच्या निषेधार्थ, काल नाभिक समाज संघटनेतर्फे औरंगाबादमध्ये मुंडन आंदोलन करण्यात आलं. शासनानं नाभिक समाजाला आर्थिक मदत करावी, तसंच कर्जाचे हप्ते माफ करण्याची मागणी, संघटनेचे विभागीय अध्यक्ष विष्णू वखरे यांनी यावेळी केली.

****

लातूरमध्ये लवकरच जम्बो कोवीड उपचार केंद्र उभारण्यात येईल, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिली. जिल्ह्यातल्या कोविड प्रतिबंधासाठीच्या उपाययोजनांसंदर्भात, दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या प्रमुख डॉक्टरांशी काल ते बोलत होते. जिल्ह्यातला ऑक्सिजनचा पूरवठा सुरळीत झाला असून, आगामी काळातही तो नियमीत होत राहील, असं देशमुख यांनी यावेळी सांगितलं.

****

हिंदी चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध संगीतकार श्रवण कुमार राठोड यांचं काल मुंबईत कोविड संसर्गानं निधन झालं, ते ६७ वर्षांचे होते. ९०च्या दशकात नदीम-श्रवण यांच्या जोडीने अनेक लोकप्रिय गाणी दिली. आशिकी चित्रपटातील त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी अतिशय गाजली. साजन, साथी, राजा, धडकन, दिलवाले, राजा हिंदुस्थानी अशा अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं.

****

संस्कृत पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार यांचं काल सोलापूर इथं निधन झालं, ते ८७ वर्षांचे होते. बिराजदार यांनी वेदांचा अभ्यास केला आणि त्यांत प्राविण्य मिळवलं. त्यांनी कुराण-शरीफ हा पवित्र ग्रंथ संस्कृतमध्ये भाषांतरित केला आहे. संस्कृतचं संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी बिराजदार यांनी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं.

****

परभणी इथल्या पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजकीय, सामाजिक कार्यकर्ते डॉ. शिवाजी दळणर, यांचं काल निधन झालं, ते ६६ वर्षांचे होते. त्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, सहसंपर्क प्रमुख म्हणून काम केलं होतं, तसंच गंगाखेड विधानसभा मतदार संघाची निवडणुकही शिवसेनेच्या वतीनं लढवली होती. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुणे इथं उपचार सुरु होते. काल रात्री त्यांच्या पार्थिवावर राणीसावरगाव इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.

****

उस्मानाबादचे ज्येष्ठ पत्रकार मोतीचंद बेदमुथा यांचं काल हैदराबाद इथं एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं, ते ६९ वर्षांचे होते. जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं होतं. उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रांत प्रतिनिधी म्हणून, सध्या ते कार्यरत होते. महाराष्ट्र टाइम्स दैनिकाचे उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी म्हणून, तसंच उस्मानाबाद इथल्या दैनिक समय सारथीचे, ते संस्थापक संपादक होते.

****

पालघर जिल्ह्यात विरार पश्चिम इथं विजय वल्लभ कोविड केअर सेंटरच्या इंटेंसिव्ह केअर युनिटला लागलेल्या आगीत १२ रुग्णांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. आज पहाटे ३ वाजता ही आग लागली.

****

राज्यातल्या २०४० कोटी रुपयांच्या २७२ रस्ते प्रकल्पांना, काल केंद्रीय महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातले बारा प्रकल्प, बीड जिल्ह्यातले सात, हिंगोली जिल्ह्यातले तीन, जालना जिल्ह्यातले सहा, लातूर जिल्ह्यातले नऊ, नांदेड जिल्ह्यातले बारा, उस्मानाबाद जिल्ह्यातले पाच आणि परभणी जिल्ह्यातल्या पाच प्रकल्पांचा समावेश आहे. विदर्भातल्या १०२८ कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या ७७  प्रकल्पांचा यात प्रामुख्यानं समावेश आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं राज्य शासनाला या मंजूर कामांची यादी पाठवली असून, केंद्रीय मार्ग निधी २०२१ अंतर्गत ही सर्व कामं होणार आहेत.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी २५ तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या दुसऱ्या आवृत्ती कार्यक्रम शृंखलेचा हा  २३ वा भाग असेल. सकाळी ११ वाजता आकाशवाणी च्या सर्व वाहिन्यांवरुन हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 13 جون 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 13 June-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں ...