Monday, 23 October 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 23.10.2023 रोजीचे सकाळी : 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date: 23 October 2023

Time: 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २३ ऑक्टोबर २०२३ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      छत्रपती संभाजीनगर इथं अडीचशे कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे अंमली पदार्थ जप्त;दोघांना अटक

·      मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार तर मनोज जरांगे पाटील यांचा पुन्हा आमरण उपोषण आणि नेत्यांना गावबंदीचा इशारा

·      नवरात्रोत्सवात काल महाअष्टमीला पूर्णाहुती तर आज महानवमीला घटोत्थापन

आणि

·      एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा न्यूझीलंडवर रोमहर्षक विजय

 

सविस्तर बातम्या

छत्रपती संभाजीनगर इथं एका कारखान्यावर छापा मारून सुमारे ४४ किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. बाजारभावानुसार त्यांची किंमत २५० कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचं, याबाबत जारी केलेल्या पत्रकात म्हटल आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अहमदाबाद इथल्या शाखेनं गुजरात तसंच स्थानिक पोलिस गुन्हे शाखेच्या मदतीने ही कारवाई केली. शुक्रवारी केलेल्या या कारवाईत पैठण रस्त्यावरच्या महालक्ष्मी इंडस्ट्रीज तसंच आरोपीच्या राहत्या घरातून हे अंमली पदार्थ जप्त करण्यात आल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

मराठा समाजाला न्यायालयात टिकणारं आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते काल ठाणे इथं पत्रकारांशी बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणासंदर्भात राज्य सरकारची क्युरेटीव्ह याचिका दाखल करून सुनावणी घेण्याचं मान्य केलं, ही दिलासादायक बाब आहे, मात्र मराठा समाजातल्या तरुणांनी संयम ठेवावा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले...

Byte…

मराठा समाज मागास आहे, हे अनेक वेळा आपण पाहिलंही आहे आणि त्याचे पुरावे देखील आहेत. या सगळ्या फॅक्टस जे आहे, त्या सुप्रीम कोर्टासमोर नक्की आपले तज्ञ वकील प्रेझेंट करतील आणि त्यामधून मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी एक मोठी विंडो ओपन झालेली आहे. ही दिलासादायक बातमी आहे. मराठवाड्यामध्ये कुणबी दाखला देण्यासंदर्भात मी जस्टीस शिंदे समिती गठीत केली. त्याच्यावर खूप युद्धपातळीवर काम सुरु आहे. मराठा समाजातल्या माझ्या भावांनो, मी आपल्याला आवाहन आणि विनंती करतो की, टोकाचं पाऊल उचलु नका, थोडा धीर धरा.

****

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मात्र उद्या २४ तारखेच्या आत मराठा समाज आरक्षणाचा निर्णय घेतला नाही, तर परवा २५ ऑक्टोबरपासून पुन्हा कठोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. जरांगे काल, जालना जिल्ह्याच्या अंतरवाली सराटी इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत मंत्री, आमदार, खासदार, तसंच प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना अंतरवाली सराटीत गावबंदी करण्यात येणार असल्याची घोषणा जरांगे यांनी केली. शांततापूर्ण मार्गाने हे आंदोलन मराठा समाजाला आरक्षण मिळवून देईल, मात्र कुणीही टोकाचं पाऊल उचलू नये, असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे.

जरांगे यांच्या घोषणेपाठोपाठ छत्रपती संभाजीनगर तसंच जालना जिल्ह्यात काही गावांनी नेत्यांना प्रवेशबंदीचा निर्णय घेतल्याचं वृत्त आहे. अशा आशयाचे फलक गावांच्या सीमांवर लावण्यात आल्याचं दिसून येत आहे.

****

आर्थिक दुर्बल घटकांना दहा टक्के आरक्षण देताना केंद्र सरकारनं घटना दुरुस्ती करून त्या निर्णयाला संरक्षण दिलं, त्याचप्रमाणे मराठा आरक्षणाला सुद्धा घटनात्मक संरक्षण द्यावं, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. ते काल नांदेड इथं बोलत होते.

दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार आणि मनोज जरांगे यांच्यात चर्चा झाली असण्याची शक्यता  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी वर्तवली आहे. ते काल बारामती इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते.

****

शेतमालाला हमीभाव हा फक्त कागदी खेळ असून, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना हमीभावाचा फायदा होत नाही, असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत बोलत होते. बाजारात दर कमी असतांना सरकारनं हमीभावानुसार शेतमाल खरेदी करून शेतकऱ्यांच्या अडचणी दूर केल्या पाहिजेत, असं वडेट्टीवार म्हणाले.

****

धाराशिव जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा अशी मागणी किसान सभेनं केली आहे. काल धाराशिव इथं झालेल्या बैठकीनंतर राज्य सचिव राजन क्षीरसागर यांनी पत्रकारांशी बोलताना, या मागणीसाठी आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला.

****

नवरात्रोत्सवात काल महाअष्टमीला मराठवाड्यात तुळजापूर, माहूर तसंच अंबाजोगाई इथं देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. माहूरगडावर काल कन्या पूजन, होमहवन झाल्यानंतर देवीचा छबिना काढण्यात आला.

तुळजापूर इथं जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थान अध्यक्ष डॉ.सचिन ओम्बासे यांच्या हस्ते शतचंडी यज्ञाची पूर्णाहूती देण्यात आली. आज महानवमीला घटोत्थापन होऊन नवरात्रोत्सवाची सांगता होत आहे. दरम्यान, तुळजाभवानी देवीची तसंच कोल्हापूर इथल्या अंबाबाईची काल महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली होती.

****

'जागर आदिशक्तीचा-सन्मान स्त्री कर्तृत्वाचा' या उपक्रमांतर्गत काल तुळजापूर इथं विविध क्षेत्रात यशस्वी कार्य केलेल्या नवदुर्गांना नवनिर्मिती अष्टभुजा प्रेरणा महिला सहकारी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे सन्मानित करण्यात आलं.

****

क्रिकेट एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत काल भारताने न्यूझीलंडचा चार गडी आणि दोन षटकं राखून पराभव केला. हिमाचल प्रदेशात धर्मशाला इथं झालेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. न्यूझीलंडचा संघ पन्नास षटकांत २७३ धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरादाखल खेळण्यास आलेली भारताची सलामी जोडी कर्णधार रोहीत शर्मा आणि शुभमन गिल यांनी चांगली सुरुवात केली. रोहीत ४६, शुभमन २६, श्रेयस अय्यर ३३ तर के एल राहुल २७,  धावांवर तंबूत परतले. विराट कोहलीने ९५ धावा करून भारताचा विजय दृष्टिपथात आणला. रवींद्र जडेजाने चौकार मारून विजयावर शिक्कामोर्तब केलं. सर्वाधिक पाच बळी घेणारा मोहम्मद शमी सामनावीर ठरला. भारताचा या स्पर्धेतला हा पाचवा विजय असल्याने, दहा गुणांसह भारत गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे.

दरम्यान, या स्पर्धेत आज पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघात सामना होणार आहे.

****

नांदेड इथं दृष्टिहीनांच्या तीन दिवसीय राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली. श्री गुरूगोविंदसिंघजी मैदानावर होत असलेल्या या स्पर्धेत विविध जिल्ह्यातील खेळाडू सहभागी झाले आहेत.

****

छत्रपती संभाजी नगर इथले प्राध्यापक ललित अधाने पाटील लिखित माही गोधडी छप्पन भोकी या कविता संग्रहाचं काल ज्येष्ठ कवी किशोर कदम उर्फ सौमित्र यांच्या हस्ते प्रकाशन झालं. या मातीशी, शेतीशी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी एक संवेदनशील कलावंत आणि माणूस म्हणून आपला जवळचा संबंध असल्याचं, सौमित्र यांनी नमूद केलं, तसंच अधाने पाटील यांच्या कवितासंग्रहातल्या कविता सादर केल्या. मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

बुलडाणा जिल्ह्यातल्या पिंपळगाव सराई इथले रहिवासी असलेले अग्निवीर अक्षय लक्ष्मण गवते यांना सियाचीन इथं कर्तव्यावर असताना वीरमरण आलं. त्यांचा पार्थिव देह काल सायंकाळी विमानाने छत्रपती संभाजीनगर इथं आणण्यात आला. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी विमानतळावर गवते यांच्या पार्थिव देहावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. गवते यांचा पार्थिव देह आज सजवलेल्या लष्करी वाहनातून बुलडाणा जिल्ह्यात पिंपळगाव सरा या गावी नेला जाणार आहे.

****

खाजगीकरण-कंत्राटीकरण विरोधात बीड इथं काल जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. आपल्या मागण्यांचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांना सादर करण्यात आलं.

****

दक्षिण मध्य रेल्वे ने नांदेड ते पानिपत दरम्यान विशेष गाडीची एक फेरी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी येत्या गुरुवारी पहाटे पाच वाजून ४० मिनिटांनी नांदेड रेल्वे स्थानकावरून तर परतीच्या प्रवासात शुक्रवारी दुपारी पानिपतहून सुटणार आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 01 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...