आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२३ ऑक्टोबर २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
शारदीय नवरात्रोत्सवाची आज घटोत्थापनेनं सांगता होत आहे. घरोघरी स्थापन केलेल्या आदिशक्तीला आज षड्रस भोजनाचा नैवेद्य दाखवण्यात येईल, सप्तशती जप तसंच इतर अनुष्ठानांचाही आज समारोप होणार आहे. दरम्यान, हिंदू कालगणनेनुसार साडे तीन शुभ मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
दसऱ्याला मागणी असलेल्या झेंडूच्या फुलांची छत्रपती संभाजीनगर इथं मोठी आवक झाल्याचं दिसून येत आहे.
**
शिर्डी इथं श्री साईबाबा संस्थानच्या वतीने आजपासून गुरुवारपर्यंत साईबाबांचा १०५ वा पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येत आहे. संस्थानचे तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या हस्ते या सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला. दरम्यान, उद्या विजयादशमीला समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर सुरू राहणार असल्याचं, संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवशंकर यांनी सांगितलं आहे.
**
उद्याच्या ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरच्या दीक्षाभूमीवर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आज सकाळी अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहणानंतर दीक्षा, बुद्ध तसंच भीम गीत गायन आदी कार्यक्रम होणार असून, सायंकाळी धम्म परिषद होणार आहे.
**
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद-एससीईआरटीने पूर्वप्राथमिक शिक्षणासाठी राज्य अभ्यासक्रम आराखड्याचा मसुदा प्रसिद्ध केला आहे. शिक्षण क्षेत्राचा विस्तार, पायाभूत स्तरावरील बालकांचं शिक्षण, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील पूर्वप्राथमिक स्तरासाठीची उद्दिष्टं, क्षमता आणि अध्ययन निष्पत्ती अशा मुद्द्यांवर या मसुद्यात भर देण्यात आला आहे.
**
गोवा इथं झालेल्या ३७ व्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने बॅडमिंटन सांघिक खेळात पुरुष तसंच महिला गटात रौप्य पदक पटकावलं. पदक विजेत्या पुरुष संघात छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रथमेश कुलकर्णी याचा समावेश होता. प्रथमेश हा छत्रपती संभाजीनगर इथल्या पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे.
**
No comments:
Post a Comment