Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date:
21 January 2024
Time:
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २१ जानेवारी २०२४ सकाळी ७.१० मि.
****
· मराठा समाजाचं २३ जानेवारीपासून सर्वेक्षण-सामाजिक भावनेतून कालबद्धरितीने अचूक काम करण्याचे
मुख्यमंत्र्यांचे निर्देश;मनोज जरांगे पाटील पायी मोर्चासह मुंबईकडे
रवाना
· मराठा आरक्षणासाठी ओबीसीचा स्वतंत्र प्रवर्ग निर्माण करावा-केंद्रीय मंत्री रामदास आठवले
· अयोध्येतल्या श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची
तयारी अंतिम टप्प्यात
· वेरूळ अजिंठा महोत्सवाच्या पूर्वरंग कार्यक्रमाला प्रारंभ
आणि
· मराठवाडा साहित्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार प्राचार्य
रा.रं.बोराडे यांना जाहीर
****
मराठा समाजाचं सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी
कालबद्धरितीने अचूक सर्वेक्षण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले
आहेत. ते काल वर्षा या निवासस्थानी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त,
जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांच्याशी दूरदृश्य
प्रणालीच्या माध्यमातून घेतलेल्या बैठकीत बोलत होते. राज्य मागासवर्ग
आयोगामार्फत परवा २३ जानेवारीपासून ३१ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत मराठा तसंच
बिगर मराठा खुल्या प्रवर्गात अंदाजे अडीच कोटी कुटूंबांचे सर्वेक्षण होणार आहे.
यासंदर्भात गावोगावी दवंडी द्यावी, सूचना फलकांवर
माहिती द्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळवून
देण्यासाठी राज्यशासन कटीबध्द असून सामाजिक भावनेनं हे काम करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी
केलं आहे.
****
मराठा
आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील काल जालना जिल्ह्यातल्या
आंतरवाली सराटीमधून मुंबईकडे रवाना झाले. राज्यात कुणबी मराठा अशा ५४ लाख नोंदी
सापडल्या आहेत, तरीही सरकार आरक्षणाबाबत निर्णय घेत नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. ही पदयात्रा
२६ जानेवारीला मुंबईत पोहचणार आहे. जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा
मोर्चाचे सदस्य राज्याच्या अनेक शहरातून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.
****
ओबीसींच्या सध्याच्या २७ टक्के आरक्षणाला धक्का न लावता
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी वेगळा स्वतंत्र ओबीसीचा प्रवर्ग निर्माण करावा, असा पर्याय केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री
रामदास आठवले यांनी सुचवला आहे. क्रिमीलेयरच्या मर्यादेमुळे ज्यांचं
वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी आहे, अशा ओबीसींनाच आरक्षणाचा
लाभ मिळतो. त्याप्रमाणे ८ लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या गरीब
मराठा समाजाला आरक्षण द्यावं, असं आठवले यांनी म्हटलं आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रता
प्रकरणाबाबत सुनावणीसाठी, विधानसभेच्या
अध्यक्षांनी नवं वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार आता २३, २४ आणि २५ जानेवारीला साक्षीदारांची उलट तपासणी होईल तर २९ आणि ३०
जानेवारीला अंतिम युक्तीवाद होईल. त्यानंतर १०-१५ दिवसात निकाल जाहीर करू असं,
विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत
म्हटलं आहे.
****
सामाजिक
बांधिलकीस बाधा आणणाऱ्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या समाज माध्यमांद्वारे
प्रसारित न करण्याचं आवाहन, केंद्रीय माहिती
आणि प्रसारण मंत्रालयातर्फे करण्यात आलं आहे. उद्या अयोध्येत होणाऱ्या
श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने दिशाभूल करणाऱ्या बातम्या
समाज माध्यमांद्वारे प्रसारित होत असल्याचं निदर्शनास आल्यानं, केंद्रशासनानं या सूचना दिल्या आहेत.
**
दरम्यान अयोध्येतल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
या सोहळ्यासाठी जगभरातील हजारो भाविक अयोध्येत दाखल झाले आहेत. भाविकांच्या सुरक्षेसाठी निमलष्करी दल, राज्य पोलीस
यंत्रणा तैनात करण्यात आली असून महिलांसाठी विशेष महिला पोलिसांची सुरक्षा तैनात
करण्यात आल्याचं देखील आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
श्रीरामाच्या
प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त नांदेड जिल्ह्यात तीन लाख रामज्योतींचं वाटप
होणार आहे. नांदेडचे खासदार
प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी ही माहिती दिली. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी,
नांदेड जिल्ह्यात सर्व नागरिकांनी आपापल्या घरात दिवाळी साजरी करावी
असं आवाहनही खासदार चिखलीकर यांनी केलं आहे.
**
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंदिर परिसर स्वच्छतेच्या
आवाहनाला प्रतिसाद देत काल जालना इथल्या भाजपा पदाधिकाऱ्यांनी शहरातल्या बालाजी मंदिरासह
काशी विश्वेश्वर महादेव मंदिरात स्वच्छता मोहीम राबवली.
**
लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने "स्वच्छ तीर्थ" मोहीमेअंतर्गत शहरातल्या १० धार्मिक स्थळांसह नागरी भागातील १०१ धार्मिक स्थळं
तसंच त्यांच्या परिसरात स्वच्छता करण्यात आली.
**
जळगाव शहरात बालाजी पेठ भागातल्या बालाजी मंदिरात काल
स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्यासह
अनेक मान्यवर या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले.
**
दरम्यान, या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त राज्य सरकारने उद्या सुटी जाहीर केली आहे.
यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत संलग्न
महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा, उद्या
ऐवजी परवा २३ जानेवारीला असणार आहे.
****
राज्यात आज कोविड १९ च्या ७१ नव्या रुग्णांची नोंद झाली. ८६ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. सध्या राज्यात ४३९ रुग्ण
उपचार घेत आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं काल कोविडचा नवीन एक रुग्ण
आढळला.
****
वेरूळ
अजिंठा महोत्सवाने पर्यटन, कला आणि सांस्कृतिक वारसा जपला आणि तो जागतिक पातळीवर पोहोचवण्यासाठी मदत
केली, असं गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी म्हटलं आहे.
ते काल छत्रपती संभाजीनगर इथं या महोत्सवाच्या पूर्वरंग कार्यक्रमाचं
उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. यावेळी ढोलकी वादक पांडुरंग
घोटकर, प्राध्यापक गणेश चंदनशिवे, शाहीर
रामानंद उगले, तसंच कथक नृत्यांगना निधी प्रभू, यांनी सादरीकरण केलं.
दरम्यान, या महोत्सवानिमित्त छत्रपती संभाजीनगर या ऐतिहासिक शहराचं वैभव जाणून घेण्यासाठी
इंटॅक संस्थेच्या सहकार्याने तीन हेरिटेज वॉक होणार आहेत. यातील
पहिला वॉक आज सकाळी होत आहे.
****
छत्रपती संभाजीनगर
इथं महागामीच्या शार्ङ्गदेव महोत्सवात आज मणिपुरी नृत्यगुरू डॉ दर्शना झव्हेरी यांना
शार्ङ्गदेव सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. आज मांगनियार लोकगीत गायन तसंच ओडिशी नृत्य सादर होणार आहे. काल उस्ताद वसिफुद्दीन डागर यांचं ध्रूपद गायन तसंच अयोध्याशरण मिश्र यांचं
कथावाचक कथकचं सादरीकरण झालं. सन्निधी हा विविध नद्यांचं विविध
नृत्यशैलीच्या माध्यमातून दर्शन घडवणारा नृत्यविष्कार महागामीच्या गुरू पार्वती दत्ता
आणि शिष्यांनी सादर केला.
****
मराठवाडा साहित्य परिषदेचा २०२४ चा जीवन गौरव पुरस्कार
ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा.रं.बोराडे यांना जाहीर झाला आहे. परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी ही माहिती दिली. २५ हजार रुपये, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप
आहे. बोराडे यांच्या निवासस्थानी त्यांना हा पुरस्कार लवकरच प्रदान
करण्यात येणार आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड
तालुक्यात रोही पिंपळगाव इथं एका ६ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या
आरोपीस नांदेड पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला न्यायालयासमोर हजर केलं असता, त्याला येत्या ३१ जानेवारीपर्यंत पोलीस
कोठडी सुनावण्यात आली आहे.
****
विकसित भारत संकल्प यात्रेत मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत
अनेक नागरिक आपल्याला मिळालेल्या लाभाची माहिती देत आहेत, नांदेड इथल्या संगीता नामदेव टिकम यांनी आपला
अनुभव या शब्दांत कथन केला...
बाईट - संगीता नामदेव टेकम नांदेड
परभणी जिल्ह्यातले संतोष कुलकर्णी यांना आयुष्मान भारत
योजनेअंतर्गत लाभ मिळाला आहे. याबाबत आपलं मनोगत त्यांनी आकाशवाणीकडे या शब्दांत व्यक्त केलं...
बाईट - संतोष कुलकर्णी परभणी
****
नांदेड जिल्ह्यातल्या पात्र नागरिकांना कुणबी जात
प्रमाणपत्र मिळावेत यासाठी जिल्हा प्रशासनानं येत्या २४ जानेवारीपर्यंत विशेष
मोहिमेचं आयोजन केलं आहे. या मोहिम कालावधीत जात प्रमाणपत्र अर्ज उपलब्ध करुन देणं, आवश्यक कागदपत्रासाठी ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी मदत करतील, असे प्रशासनानं कळवलं आहे.
****
तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्रानिमित्त
देवीची काल रथालंकार महापूजा बांधण्यात आली. देवीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येनं येत आहेत.
****
१९ वर्षांखालील पुरुष एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक क्रिकेट
स्पर्धेत, भारत-बांग्लादेश दरम्यान काल झालेला सामना भारतानं ८४ धावांनी जिंकला.
****
No comments:
Post a Comment