Sunday, 21 January 2024

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २१ जानेवारी २०२४ दुपारी १.०० वा.

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 21 January 2024

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २१ जानेवारी २०२४ दुपारी १.०० वा.

****

आयोध्येत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आता २४ तासांहूनही कमी कालावधी शिल्लक असून तयारी अंतिम टप्प्यात आहे. यानिमित्त राज्यासह देशभरात  विविध ठिकाणी अनेक धार्मिक-सांकृतिक-सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. अयोध्येच्या सीमांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. ड्रोनद्वारे संपूर्ण शहराची टेहळणी सुरू आहे. यवतमाळमध्ये श्रीरामभक्त जुगल तिवारी यांनी  अयोध्येतील राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारली असून, ह्या मंदिराच्या दर्शनासाठी रामभक्त गर्दी करीत आहेत . कोल्हापूर इथं  सकल हिंदू समाजातर्फे  ऐतिहासिक दसरा चौकात उभारलेल्या श्रीरामांच्या १०८ फुटी प्रतिमेचं मान्यवरांच्या हस्ते काल उद्घाटन झालं. याप्रसंगी राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार  धनंजय महाडिक यांची उपस्थिती होती.

****

त्रिपुरा, मणिपूर आणि मेघालय या राज्यांच्या आज स्थापना दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या राज्यांच्या स्थापना दिनाबद्द्ल या राज्यातील नागरीकांना शुभेच्छा दिल्या आहेत. या राज्यांनी भविष्यात प्रगतीचे नवे उच्चांक प्रस्थापित करावे असंही त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****

परभणी जिल्ह्यातल्या नांदखेडा भागामध्ये विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे काल शासकीय योजनांचे लाभ देण्यात आले तसंच जनजागृती करण्यात आली. शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते यावेळी आयुष्यमान भारत योजना लाभार्थ्यांना पत्र वितरण करण्यात आलं. सोबतच आरोग्य विभागाच्या शिबीराद्वारे आरोग्य तपासणीसह उपचार करण्यात आले. नागरिकांनी आकाशवाणीशी बोलताना विकसित भारत संकल्प यात्रेचे महत्व अधोरेखित केले. 

****

राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या अंतिम मतदार याद्या उद्या ऐवजी परवा मंगळवारी २३ जानेवारी रोजी  प्रसिध्द केल्या जाणार आहेत. उद्या जाहिर झालेल्या सार्वजनिक सुटीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. अकोला इथं पश्चिम मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयातर्फे नियोजन भवनात काल मतदान विषयक कार्यशाळा झाली. भावी मतदार असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम बनवण्यात आला असून तो शिकवण्यासाठी शाळा - महाविद्यालयांत मतदान प्रक्रीया साक्षरता मंडळांची  स्थापना करण्याचे निर्देश  निवडणूक आयोगानं दिले आहेत. सुदृढ लोकशाही प्रक्रिया आणि मतदानाबाबत जाणीवजागृती करण्याचा यामागचा उद्देश असल्याचं मतदार नोंदणी अधिकारी अनिता भालेराव यांनी सांगितलं. यासंदर्भात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि शाळांनी प्रयत्न करावे, असं  त्या म्हणाल्या.

****

अहमदनगर इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणी आणि सुशोभीकरण कामाचं उदघाटन राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते काल झालं. महापालिकेतर्फे हा पुतळा बांधण्यात येत आहे. इंदूमिल इथल्या बाबासाहेबांच्या आंतरराष्ट्रीय स्मारक उभारणीस वेग देण्यात आला असून डिसेंबर,२०२४ पर्यंत त्याचं काम पूर्णत्वास नेण्यासह  भीमा कोरेगाव इथंही डॉक्टर आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात येणार असल्याचं बनसोडे म्हणाले. अहमदनगर शहरात भव्य बुद्धविहार उभारणीसाठीही निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.

****

नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या इंडियन ओपन सुपर बैडमिंटन स्पर्धेत भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी यांनी पुरुष दुहेरीची अंतिम फेरीत गाठली आहे. आज दुपारी त्यांचा सामना दक्षिण कोरियाच्या खेळाडूंशी होणार आहे.

****

 

 

छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा गांधी मिशन संस्थेच्या गुरुकुल महागामीमध्ये शार्ङ्गदेव महोत्सवात आज मणिपुरी नृत्यगुरू डॉ दर्शना झव्हेरी यांना शार्ङ्गदेव सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. आज मांगनियार लोकगीत गायन तसंच ओडिशी नृत्य सादर होणार आहे.

****

नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रोही पिंपळगाव इथं एका सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला हा आपल्या संस्कृतीला लागलेला कलंक  असल्याचं खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी म्हटलं आहे. त्यांनी अत्याचारित मुलीच्या परिवाराची भेट घेतली, त्यावेळी चिखलीकर बोलत होते. अशा प्रवृत्तींना कायद्यानं वेळीच लगाम लावला पाहिजे, असं ते म्हणाले. पोलिसांनी आरोपींवर कठोर कारवाईसाठी आरोपपत्र तयार करावं, अशी सूचना चिखलीकर यांनी केली.

****

छत्रपती संभाजीनगर इथं सुरू असलेल्या नमो चषक क्रीडा स्पर्धांमध्ये काल कबड्डी, धनुर्विद्या , शूटिंग बॉल, फुटबॉल, बॅडमिंटन आदी स्पर्धा आकर्षणाचं केंद्र होत्या. आज या स्पर्धेत खो- खो, कुस्ती, मल्लखांब आणि रस्सीखेच या खेळांचा थरार अनुभवता येणार आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...