Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 22 January 2024
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २२ जानेवारी २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· अयोध्येत आज श्रीराममूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा-देशभरात उत्साह
· मराठवाड्यासह राज्यभरात दीपोत्सव आणि शोभायात्रांमध्ये नागरिकांचा उत्स्फुर्त सहभाग
· मराठा आरक्षणासाठी मनोज जरंगे पाटील यांचा मोर्चा अहमदनगर जिल्ह्यात दाखल
आणि
· मराठा सर्वेक्षणासाठी प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात
सविस्तर बातम्या
अयोध्येत श्रीरामाच्या जन्मभूमीस्थळी नवनिर्मित मंदिरात बाळरामाच्या मूर्तीची आज दुपारी साडे बारा वाजता प्राणप्रतिष्ठा होत आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून हजारो निमंत्रित अयोध्यानगरीत दाखल झाले असून, त्यांच्या निवासासह इतर सर्व व्यवस्था तसंच सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातून आलेल्या निमंत्रित संत महंतांच्या मांदियाळीने अयोध्या नगरी फुलून गेली आहे. या निमंत्रितांमध्ये पैठणच्या संत एकनाथ महाराजांचे वंशज योगीराज महाराज गोसावी यांचाही समावेश आहे. आपल्या परिसरातल्या सर्व भाविकाच्या वतीनं आपण प्रभुरामाचं दर्शन घेणार असल्याचं सांगतानाच, योगीराज महाराजांनी, अयोध्येत असलेल्या उत्साहाचं या शब्दांत वर्णन केलं...
आधीचं अयोध्या आणि आताची अयोध्या याच्यामध्ये खूप अंतर आहे. अयोध्ये कडे येणाऱ्या रस्त्यांच्या दहा किलोमीटर पासून पूर्ण रस्त्यांची सजावट करण्यात आलेली आहे. जागोजागी प्रभु रामचंद्रांचे कटआऊट्स आहेत. रामायणातल्या पात्रांचे त्याठिकाणी म्युरल्स उभे केलेले आहेत. भाविकभक्त जे आहेत ते हनुमान गढी असेल किंवा दशरथाचा महाल असेल किंवा शरयूचं स्नान असेल, या सगळ्या गोष्टी करून रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी आतूर आहेत. आम्ही सर्व जण फक्त आम्ही दर्शनाला आलो असे नं समजता जी मंडळी आपल्या परिसरातली आहेत, त्यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. त्यामुळे रामलल्लांचं दर्शन आपल्या सर्वांच्या वतीनं घेतो आहोत, अशी प्रत्येक साधुसंतांची या ठिकाणी धारणा आहे. हा आनंद सोहळा आपण याची देही याची डोळा आपण सर्व जण बघतो आहोत याचा सर्वस्वी आनंद आज जाणवतो आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यभरात सर्वत्र उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुंबईत विविध मंदिरांमध्ये स्वच्छता मोहिमेत सहभागी होत सफाई कामगारांशी संवाद साधला.
दक्षिण मध्य मुंबईतली १०८ मंदिरं पणत्यांनी उजळून निघावीत यासाठी भाजपचे दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांनी पणत्यांचे संच भेट दिले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं वास्तव्य असलेलं 'सावरकर सदन', 'स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक' आणि 'अंदमानातल्या सावरकरांच्या कोठडीतही आज दिवाळी साजरी करण्यात येणार असल्याचं शिरवडकर सांगितलं.
****
मराठवाड्यातही या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या वतीनं काल छत्रपती संभाजीनगर इथं १०९ महायाग पार पडला. आज सायंकाळी शहराच्या अनेक भागात दीपोत्सवासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात विविध राम मंदिरांसह सर्व मंदिरांवर रोषणाई तसंच रांगोळ्यांसह आकर्षक सजावट करण्यात आली आहे. घरांवर तसंच बाजारपेठांमध्ये विविध आस्थापनांवर श्रीरामाची छबी असलेले भगवे ध्वज फडकताना दिसत आहेत. टीव्ही सेंटर चौकात श्रीरामाची भव्य प्रतिमा सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
जालना शहरात काल भव्य शोभायात्रा काढण्यात आली. जुन्या जालन्यातल्या आनंदवाडी इथल्या श्रीराम मंदिरातून निघालेल्या या शोभायात्रेत श्रीराम, लक्ष्मण, सीता तसचं हनुमान यांचे सजीव देखावे नागरिकांसाठी विशेष आकर्षणाचं केंद्र ठरले. महिलांनी सडा-रांगोळी काढून यात्रेचं उत्साहात स्वागत केलं. यानिमित्त ठिकठिकाणी अल्पोपहाराचं वाटपही करण्यात आलं. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह अनेकांनी या मिरवुणकीत सहभाग घेतला.
हिंगोली इथं श्रीराम भक्त हनुमान मंदिराच्या वतीने काल भव्य कलश यात्रा काढण्यात आली. चिंतामणी गणपती मंदिरापासून सुरु झालेली ही कलशयात्रा शहरातल्या विविध भागातून मार्गक्रमण करत हनुमान मंदिर परिसरात विसर्जित करण्यात आली. हिंगोली तालुक्यातल्या राम देऊळगाव इथं श्रीरामचंद्र मंदिरात आमदार तानाजी मुटकुळे यांनी काल स्वच्छता मोहिम राबवली.
नांदेड इथं गोदावरी काठावरील श्रीराम मंदिरात आज पालखी तसंच कलश यात्रेसह 'एक दिवा रामाला' या संकल्पनेअंतर्गत भाविकांकडून दीप प्रज्वलन केलं जाणार आहे. भजन, कीर्तन आणि महाप्रसादासह विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे.
धाराशिव इथं अनंतदास महाराज स्मारक मंडळाच्या वतीने काल दीडशे कारसेवकांचा सत्कार करण्यात आला. लातूरच्या आरोह संगीत अकादमीच्या गीत रामायणालाही नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
****
परभणी शहरातल्या महेश मंदिरात काल हनुमान चालीसा पठण आणि दीपोत्सव साजरा झाला, तर नांदेड इथं आज सायंकाळी "बंदाघाटावर राम दीपोत्सव आणि आतिषबाजीचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
चंद्रपूर इथं चांदा क्लब ग्राऊंडवर काल ३३ हजार २५८ पणत्यांनी रामनामाचा मंत्र साकारण्यात आला. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या विक्रमाची नोंद झाली.
****
अहमदनगर जिह्यातल्या शिर्डी इथल्या साईबाबा मंदिरावरही विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
यवतमाळ तसंच जळगाव इथं साकारलेली अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती पाहण्यासाठी रामभक्त गर्दी करीत आहेत.
****
राज्यातल्या सर्व विधानसभा मतदारसंघाच्या अंतिम मतदार याद्या आज ऐवजी उद्या २३ जानेवारीला प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. आज जाहीर झालेल्या सार्वजनिक सुटीमुळे हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, राज्य सरकारनं जाहीर केलेल्या आजच्या सुट्टीविरोधातली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत
****
मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटा इथून निघालेला मनोज जरंगे पाटील यांच्या मोर्चानं काल अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश केला. पाथर्डी तालुक्यात या मोर्चाचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. मोर्चामध्ये चालणाऱ्या आंदोलकांची चहापाण्याची आणि भोजनाची व्यवस्था गावागावांकडून शिधाच्या स्वरूपात करण्यात येत आहे.
****
मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी मागास आयोगाच्या वतीनं उद्यापासून ३१ तारखेपर्यंत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासकीय तयारी पूर्ण होत आली आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं काल जिल्हाधिकारी कार्यालयात या सर्वेक्षणासाठी प्रशिक्षण शिबीर झालं.
नांदेड इथं झालेल्या प्रशिक्षण शिबीरात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मार्गदर्शन केलं.
लातूर जिल्ह्यात या सर्वेक्षणाला नागरिकांनी सहकार्य करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी केलं आहे. जालना इथं या प्रशिक्षण शिबीराला गैरहजर राहणाऱ्या ५८ अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, जालना महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक संतोष खांडेकर यांनी ही माहिती दिली.
****
विकसित भारत संकल्प यात्रेत मेरी कहानी मेरी जुबानी या उपक्रमांतर्गत परभणी इथले लाभार्थी, प्रणाली काठे पल्लेवार, संजय श्रीमंगले, मीरा लोंढे यांनी आपल्याला मिळालेल्या लाभांची माहिती दिली.
****
धाराशिव जिल्ह्यात तुळजपूर इथं शांकभरी नवरात्रोत्सवानिमित्त काल श्री तुळजाभवानी मातेची मुरली अलंकार महापूजा बांधण्यात आली होती. नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होत असून, भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं क्रीडा मंच आणि छत्रपती संभाजीनगर ऑलिम्पिक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या नमो चषक २०२४ चं केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते काल औपचारिक उद्घाटन झालं. छत्रपती संभाजीनगर इथल्या भारतीय खेळ प्राधिकरण-साई इथं खेळाडूंसाठी केंद्र सरकारच्या वतीनं करण्यात आलेल्या कामांचा डॉ कराड यांनी आढावा घेतला
****
कृषी यांत्रिकीकरण उप अभियानांतर्गत बीड जिल्ह्यात ट्रॅक्टर आणि अन्य अवजारांच्या प्रलंबित दोन कोटी रुपये निधीस मंजुरी मिळाली असून, जिल्ह्यातल्या ३१४ लाभार्थींना उद्यापासून वितरण करण्यात येणार आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांनी ही माहिती दिली.
****
वाचनापासून तरूण पिढी दूर जात आहे, मात्र वाचनातूनच खऱ्या अर्थान माणूस घडतो, असं प्रतिपादन कथाकार राजेंद्र गहाळ यांनी केलं आहे. नांदेड जिल्ह्यात बरबडा इथं काल झालेल्या सहाव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. या संमेलनात काल दिवसभरात प्रकट मुलाखत, कथाकथन, कविसंमेलन असे विविध कार्यक्रम घेण्यात आले.
****
No comments:
Post a Comment