Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 20 February 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २० फेब्रुवारी २०२४ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मूमध्ये ३२ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक जास्त निधीच्या प्रकल्पांचं उद्धघाटन केलं. श्रीनगर रेल्वेस्थानकावरुन धावणारी पहिली इलेक्ट्रिक रेल्वेगाडी, तसंच सांगलदान रेल्वेस्थानक ते बारामुल्लापर्यंत धावणाऱ्या रेल्वेगाडीचं उद्घघाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं.
आरोग्य, शिक्षण, रेल्वे, रस्ते, विमान वाहतूक, पेट्रोलियम, नागरी पायाभूत सुविधांशी संबंधित हे नवीन विकास प्रकल्प असतील. यावेळी पंतप्रधानांनी उपस्थित नागरिक तसंच केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.
****
राज्यानं २०२७ ते २०२८ पर्यंत एक मिलियन डालर अर्थव्यवस्थेचं महत्वकांक्षी लक्ष्य ठेवलं असून या वर्षात आर्थिक गुंतवणुकीमुळं राज्यात ५३ हजार रोजगार उपलब्ध होणार असल्याचं राज्यपाल रमेश बैस यांनी म्हटलं आहे. विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनाची सुरुवात आज राज्यपालांच्या अभिभाषणानं झाली. त्यावेळी ते बोलत होते.
जानेवारीत दावोस इथं ३ लाख ५३ हजार कोटींचे करार करण्यात आले असून यामाध्यमातून दोन लाख नोकऱ्या उपलब्ध होतील. तसंच समृद्धी महामागार्गाचं विस्तारीकरण सरकार करत असून सिंदखेडराजा ते शेगाव, भंडारा, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर गोंदियापर्यंत विस्तार केला जात आहे. जालना ते नांदेड जलदगदती महामार्गाचाही प्रस्ताव असल्याचं राज्यपाल बैस यांनी सांगितलं. मराठवाड्याच्या संपूर्ण विकासासाठी ४६ हजार कोटी रुपयांची विकासकामं करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. मराठवाडा मुक्तिसंग्रामातील हुतात्मांचं बलिदानाचं स्मरण आणि विजयाची आठवण म्हणून छत्रपती संभाजीनगर इथं स्मारकासाठी शंभर कोटी रुपये मंजूर करण्यात आल्यांचही राज्यपाल बैस यांनी सांगितलं.
दरम्यान, राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात दुपारी एक वाजता विधानसभेचं तर दुपारी दोन वाजता विधानपरिषदेचं कामकाज सुरु होणार आहे.
****
मुंबईत आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्यास मंजूरी देण्यात आली आहे.
****
अमृत भारत रेल्वेच्या मोठ्या यशानंतर केंद्र सरकारनं आणखी ५० अमृत भारत रेल्वे गाड्या चालवण्यास मंजुरी दिली असल्याचं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाजमाध्यमावरील आपल्या संदेशात म्हटलं आहे. विनावातानुकुलीत ही रेल्वे अन्य अत्याधुनिक सोयी-सुविधांनी युक्त असल्याचंही वैष्णव यांनी म्हटलं आहे.
****
जम्मू काश्मीरमध्ये कुपवाडा इथं भारत पाक नियंत्रण रेषेजवळ बर्फाच्छादित वातावरण आणि उणे तापमानात लष्कराच्या जवानांनी काल शिवजयंती साजरी केली.नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला मराठा बटालियनच्या जवानांनी अनोख्या पद्धतीनं अभिवादन केलं. त्यामुळं हिमवर्षावातदेखील काश्मीर खोऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जय घोष दुमदुमला.
****
‘दर्पणकार’आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
****
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या उद्यापासून सुरु होत असलेल्या बारावीच्या परिक्षांसाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. लिखाणासाठी वेळ कमी पडू नये, यासाठी शेवटची दहा मिनिटे वाढवून दिली जाणार असून विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्याव्यात, असं आवाहन केसरकर यांनी केलं. राज्यातील नऊ विभागीय मंडळांमध्ये १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
****
बीड जिल्ह्यात २४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान महासंस्कृती महोत्सव आयोजित करण्यात आला असून महोत्सवात होणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना जिल्ह्यातील नागरिकांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित रहावं असं आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी आज पत्रकार परिषदेत केलं. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी उपस्थित होते.
****
लातूर इथं २३ फेब्रुवारीला मराठवाड्यातील युवक-युवतींसाठी करिअर मार्गदर्शन शिबीर आणि २४ तारखेला विभागीय नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. नमो महारोजगार मेळाव्यामध्ये मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर शहरासह राज्यातील विविध ठिकाणहून उद्योजक उपस्थित राहून मुलाखतीद्वारे पात्र उमेदवारांची निवड करणार आहेत.
****
No comments:
Post a Comment