Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 03 May 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३ मे २०२४ सायंकाळी ६.१०
****
·
लोकसभा
निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात अर्ज भरण्याची मुदत संपली-उद्या छाननी
·
निवडणुकीच्या
तिसऱ्या टप्प्यात प्रचारासाठी अखेरचे दोन दिवस शिल्लक - प्रचाराला वेग
·
बनावट
प्रचार साहित्य प्रसारित केल्यास संबधितांवर कारवाईच्या पोलिस विभागाला सूचना
आणि
·
अकोला
जिल्ह्यात दोन कारच्या अपघातात पाच जण ठार
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात अर्ज भरण्याची मुदत आज संपली. या टप्प्यात राज्यातल्या १३ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या
दिवशी पालघर लोकसभा मतदार संघातून महायुतीकडून भाजपचे डॉ. हेमंत सवरा यांनी आपला उमेदवारी
अर्ज दाखल केला तर याच जागेसाठी बहुजन विकास आघाडी कडून आमदार राजेश पाटील यांनी उमेदवारी
अर्ज दाखल केला आहे.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघात शिवसेनेच्या उमेदवार
यामिनी जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. यावेळी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे या पक्षांचे असंख्य
कार्यकर्ते उपस्थित होते.
ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार
नरेंद्र म्हस्के यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी ठाण्यातून टेंभी
नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी रॅली काढण्यात आली होती. मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे
मुख्यनेते एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते.
उत्तर मध्य मुंबई भाजप महायुतीचे उमेदवार ॲड. उज्वल निकम आणि उत्तर पश्चिम मुंबई
शिवसेना महायुतीचे उमेदवार रविंद्र वायकर यांनी वांद्रे मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात
उमेदवारी अर्ज दाखल केले.
धुळे लोकसभा मतदार संघातून दिनेश मोतीलाल बच्छाव यांनी कॉंग्रेसचे पर्यायी उमेदवार
म्हणून आपला अर्ज दाखल केला, या मतदार संघातून कॉंग्रेसच्या
डॉ.शोभा दिनेश बच्छाव यांनी नामांकन अर्ज दाखल केला आहे. याच मतदार संघातून वंचित बहुजन
आघाडीचे उमेदवार अब्दुर रहमान यांनी आज नामनिर्देशन पत्र दाखल केलं.
या सर्व मतदार संघात उद्या अर्जांची छाननी होणार असून, परवा सोमवारी सहा मे पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. या टप्प्यात मतदान
२० मे रोजी होणार आहे.
****
काँग्रेसनं उत्तरप्रदेश मधल्या रायबरेली मतदार संघातून राहुल गांधी यांना उमेदवारी
अर्ज दाखल केला. तर अमेठीतून काँग्रेसचे किशोरी लाल शर्मा
निवडणूक लढवणार आहेत.
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात देशभरातली १० राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांतल्या
एकूण ९६ जागांसाठी एक हजार ७१७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये महाराष्ट्रातल्या
११ लोकसभा मतदार संघातल्या २९८ उमेदवारांचा समावेश आहे. या टप्प्यासाठी येत्या १३ मे
रोजी मतदान होणार आहे.
****
निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रचारासाठी आता अखेरचे जवळपास दोन दिवस शिल्लक
आहेत. यामुळे राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला आहे. प्रचार सभा, प्रचार फेऱ्या तसंच इतर पारंपरिक आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वच
उमेदवार, अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी आज पुण्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर
यांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात
कणकवली इथं प्रचारसभा घेणार आहेत.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या
प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी आज प्रचारसभा
घेतली. आपल्या भाषणात अमित शहा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसह लोकमान्य टिळक आणि
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली
केंद्र सरकारने १० वर्षांमध्ये केलेल्या विकासकामांचा आढावा घेतानाच अमित शहांनी विरोधकांवर, प्रामुख्याने उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली. उद्धव यांनी शिवसेनाप्रमुख
दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या घरात जन्म घेतला असला, तरी बाळासाहेबांचा
खरा वारसा नारायण राणे, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्याकडे
आला असल्याचं अमित शहा यांनी नमूद केलं. दरम्यान, शहा यांनी आज
सांगलीत महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्यासाठी प्रचारसभा घेतली.
****
भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी आज लातूर जिल्ह्यातल्या निलंगा इथं भाजप
उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. भाजप संविधान बदलणार असल्याची
टीका करणाऱ्या काँग्रेसनेच देशाचं संविधान ८० वेळा तोडल्याचा आरोप गडकरी यांनी यावेळी
केला. देशावर आणीबाणी लादून काँग्रेसने संविधानाची ऐशी-तैशी केल्याची टीकाही गडकरी
यांनी केली. याप्रसंगी माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्यासह भाजप नेत्यांची
उपस्थिती होती.
****
गंभीर आरोप असलेले नेते भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना चालतात का असा सवाल
काँग्रेस नेते तथा विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ते
आज लातूर इथे पत्रकार परिषदेत बोलत होते. लोकसभा निवडणुकीनंतर भाजप आणि उद्धव ठाकरे
एकत्र येतील असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे, त्यावर बोलताना, उद्धव ठाकरेंनी भाजपसाठी आपल्या पक्षाच्या खिडक्या-दरवाजे कायमचे बंद केले असल्याचं वडेट्टीवार
यांनी सांगितलं.
****
लोकसभा निवडणुकीदरम्यान बनावट प्रचार साहित्य - डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करून तो
समाज माध्यमं तसंच डिजिटल माध्यमांवरून प्रसारित केल्यास संबधितांवर कारवाईच्या सूचना
पोलीस महासंचालकांना देण्यात आल्या आहेत. फोटोशॉप, मशीन लर्निंग
किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून असे प्रकार घडत आहेत. निवडणुकीत असे प्रकार
घडणे चिंतेचा विषय आहे. याला आळा घालण्यासाठी तसंच स्वच्छ आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया
होण्याच्या दृष्टीनं 'डीप फेक' कंटेंट तयार
करणाऱ्या आणि प्रसारित करणाऱ्या समाज कंटकांवर ही कारवाई करण्यात येणार आहे.
****
अकोला जिल्ह्यात आज दोन कारच्या समोरासमोर झालेल्या रस्ते अपघातात शिक्षक आमदार
किरण सरनाईक यांच्या कुटुंबातले पाच जण ठार झाले. सरनाईक यांचे कुटुंबीय हे वाशिमला
जात असताना, पातूर घाटात दोन वाहनं समोरासमोर धडकून हा अपघात
झाला. मृतांमध्ये एका महिलेचा आणि तिच्या नऊ महिन्यांच्या बालिकेचा समावेश आहे. अपघातात
तीन जण गंभीर जखमी झाले असून, अपघात नेमका कशामुळे झाला याचा
तपास पातूर पोलीस करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात बारसेवाडा इथं जादुटोण्याच्या संशयावरुन
काही नागरिकांनी एका महिलेसह दोघांना जिवंत जाळल्याची घटना १ मे रोजी घडली. या प्रकरणी
पोलिसांनी १४ जणांना अटक केली आहे. जादुटोणा करत असल्याच्या संशयावरुन नागरिकांनी या
दोघांना मारहाण केली आणि गावाबाहेर नेऊन त्यांना पेटवून दिल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात ४१ गावांमध्ये गृहमतदानाची प्रकिया नुकतीच
राबवण्यात आली. यावेळी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार तालुक्यातील ८५ वर्षे वयापेक्षा
जास्त आणि दिव्यांग अशा १६३ मतदारांनी घरबसल्या मतदानाचा हक्क बजावला. यात १५३ ज्येष्ठ
नागरिक आणि १० दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. यासाठी ८ पथकं स्थापन करण्यात आली होती.
यामध्ये एकूण ५६ कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, बारामती तालुक्यातल्या खुटवड गाव इथल्या ८९
वर्षाच्या महिला मतदारानं काल प्रथमच घरून मतदान केलं. रत्नागिरी शहरातल्या आरोग्य
मंदिर परिसरातल्या ८७ वर्षांच्या महिला मतदारांनीही घरून मतदान केलं आणि या सुविधेबद्दल
आभार मानले. लातूर तसंच उस्मानाबाद मतदारसंघातही गृह मतदान सुरु आहे.
****
लोकसभा निवडणूक प्रचार खर्चात विसंगती आढळल्यामुळं निवडणूक निर्णय अधिकारी कविता
द्वीवेदी यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे
आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. येत्या
दोन दिवसात या संदर्भात स्पष्टीकरण देण्याचं या नोटीसीत म्हटलं आहे.
****
तिसऱ्या टप्प्यात सात तारखेला होणाऱ्या मतदान प्रक्रियेत लातूर तसंच उस्मानाबाद
मतदार संघाचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यातल्या लोहा विधानसभा मतदार संघाचा लातूर लोकसभा
मतदार संघात समावेश आहे. या मतदार संघात निवडणूक ड्यूटी लागलेल्या कर्मचाऱ्यांसाठी
परवा पाच तारखेला नांदेड जिल्हा प्रशासनाकडून बसची व्यवस्था करण्यात आली आहे. सात मे
रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही या कर्मचाऱ्यांना परतण्यासाठी बसची व्यवस्था
करण्यात आली आहे.
****
बीड लोकसभा मतदार संघात १३ मे रोजी मतदान होणार असून यात महिलांनी स्वविवेकाने
आपला मतदानाचा हक्क बजवावा, असं आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ
मुंडे यांनी केलं आहे. त्या आज बीड इथं बोलत होत्या. बीड लोकसभा मतदारसंघात ५५ महिला
मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्राच्या ठिकाणी महिला अधिकारी कर्मचारी असणार आहेत.
महिलांचा मतदानात सक्रिय सहभाग असावा यासाठी मतदान केंद्रावर तात्पुरत्या अंगणवाड्या
उभारण्यात येत आहेत.
****
No comments:
Post a Comment