आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
०३ मे २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात अर्ज भरण्याची मुदत आज संपत आहे. यामध्ये राज्यातल्या धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतल्या सहा मतदारसंघांचा समावेश आहे. उद्या अर्जांची छाननी होणार असून, सहा मे पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. पाचव्या टप्प्यात २५ मे रोजी मतदान होणार आहे.
****
काँग्रेसनं उत्तरप्रदेशमधल्या बहुप्रतिक्षित रायबरेली मतदार संघातून राहुल गांधी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर अमेठीतून किशोरी लाल शर्मा निवडणूक लढवणार आहेत.
****
महायुती कडून ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर, भाजप कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नवी मुंबईतले भाजपाचे माजी नगरसेवक आणि पदाधिकारी अशा एकंदर ६४ जणांनी आपले राजीनामे पक्षाचे माजी सभागृह नेते रविंद्र इथापे यांच्याकडे सादर केले. मीरा भाईंदर आणि ठाण्यामध्येही काही भाजप कार्यकर्त्यांनी राजीनामे दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राज्यात प्रसिद्ध असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातल्या, निघोज इथल्या मळगंगा देवीच्या यात्रौत्सवाला कालपासून सुरुवात झाली. रात्रभर बगाड गाड्यांची मिरवणूक संपल्यानंतर रात्री इथं ऐतिहासिक बारवेतून घागर निघते. या यात्रेसाठी लाखो भाविकांनी हजेरी लावली.
****
छत्रपती संभाजीनगर शहरात काल सिटी चौक परिसरातली ५३ अतिक्रमणं काढण्यात आली. तसंच शहागंज परिसरात चार हातगाड्यांवर कारवाई करत साहित्य जप्त करण्यात आलं. मनपा प्रशासनाकडून, आज देखील ही मोहीम राबवण्यात येणार असून, दुकानदारांनी अतिक्रमण काढून घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
****
बुलढाणा जिल्ह्यात मलकापूर जवळ पोलीस अधीक्षकांच्या पथकानं काल सुमारे ८०० लिटरचा अवैध बायो डिझेल साठा जप्त केला. याप्रकरणी आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे.
****
गडचिरोली इथं किरकोळ विक्रेत्यांना पुरवठा करण्याकरता दोन वाहनांमधून प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या तीन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काल ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून १८ लाख २७ हजार रुपये किमतीचा तंबाखू जप्त करण्यात आला.
****
No comments:
Post a Comment