Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date: 04 May 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा निवडणुकीत मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी निवडणूक आयोगानं आतापर्यंतची सर्वात मोठी जनजागृती मोहिम हाती घेतल्याचं आयोगानं काल सांगितलं. विविध सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातल्या संस्थांनी या जनजागृती मोहिमेसाठी आयोगाला सहकार्य केलं आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६ पूर्णांक १४ टक्के, तर तर दुसर्या टप्प्यात ६६ पूर्णांक ७१ टक्के इतकं विक्रमी मतदान झालं आहे, मात्र हे प्रमाण २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या मतदानापेक्षा कमी आहे, असंही निवडणूक आयोगानं सांगितलं.
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात दाखल अर्जांची आज छाननी होत आहे. या टप्यात राज्यातल्या १३ मतदारसंघांमध्ये ३९७ उमेदवारांचे ५१२ अर्ज दाखल झाले आहेत.
****
निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचा प्रचार उद्या संपणार आहे. यामध्ये राज्यातल्या उस्मानाबाद, लातूर, रायगड, बारामती, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी - सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांमध्ये सात मे रोजी मतदान होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज सातारा जिल्ह्यातल्या वाई इथं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाटण इथं, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सातारा इथं प्रचारसभा घेणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली इथं रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रचारसभा होणार आहे.
****
कांद्याच्या निर्यातीवरील बंदी केंद्र सरकारने उठवली आहे. परराष्ट्र व्यापार संचालनालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार हा आदेश त्वरित लागू होणार असून, त्यासाठी किमान ५५० प्रति मेट्रिक टन निर्यात किंमत असणं गरजेचं आहे. गेल्याच महिन्यात केंद्रानं सहा देशांना ९९ हजार मेट्रिक टन कांदा निर्यातीस परवानगी दिली होती.
****
पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी राज्यमंत्री गंगाधर गाडे यांचं आज छत्रपती संभाजीनगर इथं निधन झालं, ते ७६ वर्षांचे होते.
गाडे यांनी दलित अत्याचार स्कॉलरशीप गायरान हक्कांसाठी लढा दिला. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या जवळपास ४७ दलित वसाहती त्यांनी वसवल्या. १९७७ मध्ये मराठवाडा विद्यापीठाचे जनरल सेक्रेटरी असताना त्यांनी विद्यापीठाच्या नामांतराचा पहिला ठराव मांडला. काँग्रेसच्या कार्यकाळात गाडे यांनी परिवहन राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं. त्यांच्या पार्थिवावर उद्या छत्रपती संभाजीनगर इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातल्या राजापूर विधानसभा मतदारसंघातल्या साखरीनाटे गावातल्या डोंगरी बंदरावर काल मतदान जनजागृतीसाठी नौका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात २० नौका सहभागी झाल्या होत्या. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्यासह अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सर्वांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहावं, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी या वेळी केलं.
****
अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी मतदारसंघामधे स्वीप कार्यक्रमाअंतर्गत शाहीर आणि तमाशा कलावंतांच्या माध्यमातून मतदार जनजागृती कार्यक्रम काल राबवण्यात आला. यावेळी मनोरंजन कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं. श्रीरामपूर प्रांताधिकारी तथा उपजिल्हाधिकारी किरण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला.
****
सांगली इथं लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी काढण्यात आलेल्या संवाद यात्रेत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधून मतदान करण्याचं आवाहन केलं. सांगली जिल्हा प्रशासनामार्फत मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत.
****
लोकसभा निवडणुकीमध्ये लातूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची दुसरी तपासणी निवडणूक खर्च निरीक्षक संजीब बॅनर्जी यांच्या उपस्थितीत नुकतीच करण्यात आली. लातूर लोकसभा मतदारसंघातल्या 27 उमेदवारांनी यावेळी आपला खर्च तपासणीसाठी सादर केला.
****
परभणी इथलं जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांतर्गत मोफत क्रीडा प्रशिक्षण शिबीर भरवण्यात येत आहे. सहा मे पासून १५ मे पर्यंत चालणाऱ्या या शिबीरात खो-खो, बास्केटबॉल, रग्बी तसंच ॲथलेटीक्सच्या विविध प्रकारांचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. जास्तीत जास्त खेळाडू तसंच शाळांनी या शिबिराचा लाभ घेण्याचं आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी केलं आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स संघादरम्यान सामना होणार आहे. बंगळुरु इथल्या एम चिन्नास्वामी मैदानावर संध्याकाळी साडे सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
****
No comments:
Post a Comment