Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 04 May 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४ मे २०२४ सायंकाळी ६.१०
****
·
लोकसभा
निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचा प्रचार उद्या थांबणार;सभा-फेऱ्या आणि गाठीभेटींवर उमेदवारांचा भर;चौथ्या टप्प्यातल्या
प्रचारालाही वेग
·
पाचव्या
टप्प्यात दाखल अर्जांची आज छाननी-धुळ्यात वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार बाद
·
हिंगोली
जिल्ह्यात भरधाव कार झाडावर आदळून तिघांचा मृत्यू
आणि
·
नांदेड
इथं मतदान करतानाची चित्रफीत सामाजिक माध्यमांवर प्रसारित करणाऱ्या तिघांविरोधात आचारसंहिता
भंगाचा गुन्हा दाखल
****
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचा प्रचार उद्या थांबणार आहे. या टप्प्यात
मराठवाड्यातल्या लातूर आणि उस्मानाबाद लोकसभा मतदार संघांसह राज्यातल्या रायगड, बारामती, सोलापूर, माढा,
सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदूर्ग,
कोल्हापूर आणि हातकणंगले या ११ मतदार संघांचा समावेश आहे.
या सर्व मतदार संघांमध्ये महाविकास आघाडी तसंच महायुतीसह विविध पक्षांच्या उमेदवारांसाठी
विविध राजकीय पक्षांचे नेते सभा, मेळावे, प्रचार फेऱ्या तसंच मतदारांशी गाठी भेटी घेत आहेत.
उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी
जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसेनेचे नेते डॉ.तानाजी सावंत यांची प्रचारसभा झाली. सिंचन
क्षेत्र वाढीसाठी उजनी धरणाचं पाणी, वॉटर ग्रीड
आणि जलयुक्त शिवार या तीन महत्त्वाच्या योजनांचा उल्लेख करत सावंत यांनी विकासकामांचा
आढावा घेत, तेरणा कारखाना बंद पडून अनेक कामगार बेरोजगार झाल्याच्या
मुद्यावरून विरोधकांवर टीका केली.
****
याच मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ
आमदार कैलास पाटील यांची सभा पार झाली. दुधाचे दर तसंच उद्योगांचं परराज्यात पलायन
या मुद्यांवरून त्यांनी भाजपवर टीका केली.
****
लातूर जिल्ह्यातील औसा हा विधानसभा मतदारसंघ हा उस्मानाबाद लोकसभा मतदार संघात
समाविष्ट आहे. या मतदार संघातल्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे क्रीडा मंत्री
संजय बनसोडे यांची औसा शहरात सभा झाली. देशाचं संविधान बदलून आरक्षण रद्द होण्यासंदर्भातल्या
अपप्रचारावर कोणीही विश्वास ठेवू नये, असं आवाहन बनसोडे यांनी
यावेळी केलं.
लातूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.शिवाजी काळगे यांच्या प्रचारासाठी काँग्रेस
नेते, माजी मंत्री अमित देशमुख यांनी निलंगा इथं जाहीर
सभा घेतली. शेतमालाला चांगला भाव, मजुरांना चांगली मजुरी,
स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी, जातीय जनगणना,
आदी मुद्यांच्या आधारे त्यांनी आपल्या पक्षाची भूमिका मांडली.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे नेते आदित्य ठाकरे यांची आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या
चिपळूण इथं महाविकास आघाडीचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातले उमेदवार विनायक राऊत
यांच्या प्रचारार्थ सभा झाली. भारतीय जनता पक्षाने महिला आरक्षणासाठी अटी घातल्याच्या
मुद्यावरून त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं.
****
केंद्रीय मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी आज कोल्हापूर इथं 'कॉफी विथ नितिनजी' कार्यक्रमात सहभाग घेतला. कोल्हापूर
हे साखर कारखान्याचं माहेरघर असून, या कारखान्यांनी भरीव योगदान
दिल्यास त्याचा शेतकऱ्यांनाही फायदा होईल, असं मत त्यांनी व्यक्त
केलं. गेल्या दहा वर्षातील यशस्वी प्रकल्पांची माहिती दिली.
****
निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठीही उमेदवारांच्या प्रचाराने आता वेग घेतला आहे.
बीड लोकसभा मतदारसंघातले महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ
राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी बीड इथं
प्रचार केला.
****
राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा भाजप नेते अतुल सावे यांनी आज छत्रपती
संभाजीनगर इथे पत्रकार परिषद घेतली. इतर मागासवर्ग तसंच अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणातून
अन्य कोणत्याही धर्माला आरक्षण देण्यासंदर्भात काँग्रेसनं आपली भूमिका स्पष्ट करण्याचं
आव्हान, सावे यांनी यावेळी दिलं.
****
उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे नेते खासदार डॉ. दिनेशकुमार
शर्मा यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज अहमदनगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा
मतदार संघाचा दौरा केला. मतांच्या तुष्टीकरणासाठी फतवे काढून कुणी राजकारण करणार असेल
तर त्याला जनता थारा देणार नाही, जनता 'वोट जिहादचे राजकारण' झुगारून देऊन राष्ट्रवादाला पाठबळ
देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात दाखल अर्जांची आज छाननी होत आहे. या टप्यात
राज्यातल्या १३ मतदारसंघांमध्ये ३९७ उमेदवारांचे ५१२ अर्ज दाखल झाले आहेत. धुळे लोकसभा
मतदार संघासाठी नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या एकूण ३० उमेदवारांपैकी २२ उमेदवारांचे
अर्ज वैध ठरले तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल रहमान यांच्यासह आठ उमेदवारांचे
अर्ज अवैध ठरले आहेत. या टप्प्यात परवा सहा मे पर्यंत अर्ज मागे घेता येणार असून, मतदान २० मे रोजी होणार आहे.
****
कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याच्या निर्णयाचं शेतकरी वर्गानं स्वागत केलं आहे.
या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये आज कांदा दरात काही प्रमाणात
वाढ झाली. लासलगाव इथं कांद्याला किमान आठशे एक आणि कमाल भाव २ हजार ५५१ रुपये प्रति
क्विंटल भाव मिळाला. कळवण तालुक्यातल्या अभोणा बाजार समितीत आज साडे तीनशे ते चारशे
रुपये क्विंटल मागे भाव वाढल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
हिंगोली इथल्या अनुराधा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षांसह ११ जणांविरोधात
आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या सर्वांनी गुंतवणुकीवर अधिक परतावा देण्याचं
अमिष दाखवून चार हजार ३८ ठेवीदारांची सहा कोटी २७ लाख ६५ हजार १३० रूपयांची आर्थिक
फसवणूक केल्याचा आरोप आहे. बनावट ठराव आणि बनावट कर्ज प्रकरणाची कागदपत्रं तयार करून
संस्थेची रक्कम कर्जाद्वारे परस्पर उचलल्याचं तसंच संस्थेतून होणाऱ्या इतर व्यवहारातही
गैरव्यवहार केल्याचा या सर्वांवर आरोप ठेवण्यात आला आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यातल्या चिखली-मेहकर मार्गावर आज एसटी बस आणि एका खाजगी बसच्या भीषण
अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर २५ प्रवासी जखमी झाले. जखमींमधे सहा प्रवाशांची
प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी मेहकर इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात
आलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव ते नरसी रोडवर भरधाव कार झाडावर आदळून झालेल्या भीषण
अपघातात एक महिला आणि एक पुरूष असे दोघेजण जागीच ठार झाले, तर उपचारादरम्यान नांदेड इथं एकाचा मृत्यू झाला. अपघातात अन्य दोघे जखमी झाले
आहेत. सेनगाव ते नर्सी नामदेव मार्गावरील गिलोरी पाटीजवळ आज पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना
घडली.
****
नांदेड लोकसभेच्या निवडणूकीत मतदान केंद्रावर मतदान करतानाचा व्हिडिओ चित्रण करुन
सोशल मीडियावर प्रसार करणाऱ्या तीन कार्यकर्त्यांविरुद्ध नांदेडमध्ये आचारसंहिता भंगाचे
गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नांदेड शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्र तरोडा
आणि अन्य एका मतदान केंद्रावर मतदान करतांना हे चित्रण झाल्याच्या तक्रारी वजिराबाद
पोलिस ठाणे आणि विमानतळ पोलिस ठाण्यात करण्यात आल्या होत्या, त्यानुसार कारवाई केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मतदान केंद्रांवर मतदानासाठी येणाऱ्या मातांची बालकं सांभाळण्यासाठी मतदान केंद्रांवर
पाळणाघरांची सुविधा उपलब्ध करावयाची आहे. ही पाळणाघरे मतदानाच्या आदल्यादिवशी म्हणजे
दिनांक १२ मे रोजी सज्ज असायला हवी, असे निर्देश
छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज
सर्व संबंधित यंत्रणांना दिले. ते आज यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते. ही जबाबदारी
आरोग्य विभाग, तसंच महिला आणि बालकल्याण विभाग यांनी संयुक्तपणे
पार पाडावयाची आहे.
****
मतदानामुळेच लोकशाही सशक्त होते, बीड लोकसभा
मतदारसंघात येत्या १३ मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी सर्व मतदारांनी मतदानात सहभागी
व्हावं, असं आवाहन बीड जिल्ह्याच्या जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा
मुधोळ मुंडे यांनी केलं आहे. प्रत्येक सुजाण मतदाराने आपले कर्तव्य निभावलं पाहिजे,
असंही मुधोळ मुंडे म्हणाल्या.
****
स्पर्धेच्या युगामध्ये टिकायचे असेल तर विद्यार्थ्यांनी पदवी मिळवण्याबरोबरच कौशल्य
विकासावर भर देण्याची आवश्यकता प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव यांनी वर्तवली आहे. परभणी
इथं श्री शिवाजी महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या पदवी वितरण कार्यक्रमात
ते बोलत होते. या कार्यक्रमात २५० विद्यार्थ्यांना पदवी
प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
****
नांदेड जिल्ह्यात तापमानाचा पारा आज शनिवारी ४३ पूर्णांक २ अंश सेल्सिअसवर पोहोचला
आहे. जिल्ह्यात या उन्हाळ्यातील हा तापमानाचा उच्चांक ठरला आहे. तापमानाचा हा चढता
पारा लक्षात घेता आरोग्य विभागाने खबरदारीच्या उपायोजना हाती घेतल्या आहेत. जिल्ह्यातील
सर्व उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र येथे स्वतंत्र उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. नागरिकांनाही
उन्हापासून बचावाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
****
No comments:
Post a Comment