Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 21 May 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २१ मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं फेब्रुवारी - मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल आज मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी जाहीर केला. या परीक्षेसाठी यंदा ९३ पूर्णांक ३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या परीक्षेत मुलींच्या उत्तीर्ण होण्याचं प्रमाण अधिक असून त्याची टक्केवारी ९५ पूर्णांक ४४ इतकी आहे, तर ९१ पूर्णांक ६० टक्के इतकी मुलं उत्तीर्ण झाली आहेत.
यंदा कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९७ पूर्णांक ५१ टक्के इतका लागला असून, सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा ९१ पूर्णांक ९५ टक्के इतका आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल ९४ पूर्णांक शून्य आठ टक्के, तर लातूर विभागाचा निकाल ९२ पूर्णांक ३६ टक्के इतका लागला आहे. त्याशिवाय पुणे विभागाचा ९४ पूर्णांक ४४, नागपूर ९३ पूर्णांक १२, कोल्हापूर ९४ पूर्णांक २४, अमरावती ९३, तर नाशिक विभागाचा ९४ पूर्णांक ७१ टक्के निकाल लागला आहे.
हा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. गुणपडताळणीसाठी आणि उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी पाच जूनपर्यंत सशुल्क ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याचा प्रचार वेगानं सुरु असून, या टप्यात येत्या २५ तारखेला मतदान होणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी इथं होणार्या मातृशक्ती संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि समाजवादी पक्षाच्या डिंपल यावद यांनी आज प्रयागराज इथं आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रचार फेरीचं आयोजन केलं आहे.
****
देशभरात आज दहशतवाद विरोधी दिवस पाळण्यात येत आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा दिवस पाळला जातो. २१ मे १९९१ रोजी एलटीटीई या दहशतवादी संघटनेनं तामिळनडुमधल्या श्रीपेरम्बुदूर इथं केलेल्या बॉम्बस्फोटात राजीव गांधी यांचं निधन झालं होतं. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहेत.
****
पुण्यात कल्याणी नगर जंक्शन भागात रविवारी पहाटे कारने मोटरसायकलला धडक देऊन झालेल्या आपघातप्रकरणी, पुणे पोलिसांनी अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवाल याचे वडिल विशाल अग्रवाल यांना आज छत्रपती संभाजीनगर इथून अटक केली. या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर पोलिसांनी अल्पवयीन मुलांना मद्य दिल्याप्रकरणी बार मालक आणि मॅनेजरला देखील ताब्यात घेतलं आहे.
****
पुण्यात वाघोली इथं दगडखाण कामगार वस्तीजवळ बेकायदा कचरा डेपो उभारल्याप्रकरणी पुणे महानगरपालिकेला ‘एनजीटी’ अर्थात, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने पर्यावरणाची हानी केल्याबद्दल एक कोटी ७९ लाख १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम दोन महिन्यांमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे जमा करावी आणि पुन्हा वस्तीजवळ कचरा टाकू नये, असंही आदेशात नमूद केलं आहे.
****
धुळे शहरातल्या अवधान परिसरात औद्योगिक वसाहती मधल्या फटाक्याच्या गोडाऊनला आज सकाळी भीषण आग लागली. या आगीत फटाक्यांचा स्फोट झाल्यानं परिसरातल्या नागरीकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. प्लायवूड आणि हल्दीराम कंपनीच्या मालाच्या गोडावून जळून लाखो रुपयांचं नुकसान झालं. आग विझवण्याचे प्रयत्न सुरु असून, आगीचं कारण अद्याप कळू शकलं नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात २३ आणि २४ तारखेला गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानाअंतर्गत गाळ उपसा मोहीम राबवण्यात येणार आहे. यासाठी ‘दोन दिवस गाळमुक्तीचे, लातूरच्या विकासाचे’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात जास्तीत जास्त शेतकरी, नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि शासकीय यंत्रणांनी सहभागी होण्याचं आवाहन, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं आहे.
****
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातल्या दुरूस्तीच्या कामामुळे आज दौंड-निझामाबाद, निझामाबाद - पंढरपूर या गाड्या मुदखेड ते निझामाबाद दरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत. तर नांदेड - अमृतसर सचखंड एक्सप्रेसच्या मार्गात आज आणि अमृतसर -नांदेड सचखंड एक्सप्रेसच्या मार्गात उद्या तात्पुरता बदल करण्यात आला असल्याचं विभागातर्फे कळवण्यात आलं आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज प्लेऑफसाठी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैद्राबाद यांच्यात सामना होणार आहे. अहमदाबाद इथं संध्याकाळी साडे सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल. तर स्पर्धेतला दुसरा प्लेऑफचा सामना उद्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स या संघांदरम्यान होणार आहे.
****
हवामान
राज्यात येत्या दोन दिवसांत तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचं, हवामान विभागाने सांगितलं आहे.
****
No comments:
Post a Comment