Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 06 August
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ०६ ऑगस्ट २०२६ सकाळी ११.०० वाजता
****
कर
आकारणी आणि इतर कायदे सुधारणा विधेयकावर आज लोकसभेत चर्चा होणार आहे. या विधेयकाचा
उद्देश पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम्स कायदा, २००७, आयकर
कायदा, २०२५ आणि वित्त कायदा, २०२६ मध्ये सुधारणा प्रस्तावित
आहे. तर राज्यसभेत विनियोग विधेयकावर चर्चा होणार आहे. हे विधेयक मार्च २०२३ रोजी संपणाऱ्या
आर्थिक वर्षात विशिष्ट सेवांवर खर्च झालेल्या निधीची भरपाई भारताच्या एकत्रित निधीतून
करण्याची तरतूद करते. त्या वर्षात सेवांसाठी वाटप केलेल्या रकमेपेक्षा जास्त असलेली
रक्कम देण्यासाठी हा विनियोग केला जात आहे. लोकसभेने हे विधेयक यापूर्वीच मंजूर केलं
आहे.
****
महिला
आणि मुलांसह सर्व वापरकर्त्यांसाठी सुरक्षित, विश्वासार्ह आणि उत्तरदायी इंटरनेट सुनिश्चित करणं हे
केंद्र सरकारचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने स्पष्ट केलं
आहे. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी लोकसभेत लेखी उत्तरातून
ही माहिती दिली. भारतामधलं इंटरनेट कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर, अश्लील किंवा बीभत्स मजकुरापासून
मुक्त राहण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ नुसार सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसह
सर्व मध्यस्थांवर आवश्यक दक्षता बाळगण्याची जबाबदारी असल्याचं मुरुगन यांनी स्पष्ट
केलं.
****
राज्य
शासनानं पिंक इ-ऑटो योजनेच्या अनुदानात २० टक्क्यांवरुन ४० टक्क्यांपर्यंत वाढ केली
आहे. या योजनेअंतर्गत याआधी पिंक इ-रिक्षा घेतलेल्या महिलांनाही वाहन कर्जाची परतफेड
करण्यासाठी अतिरिक्त २० टक्के अनुदानाचा लाभ मिळेल. महिलांसाठी उपजीविकेच्या संधी निर्माण
करणं आणि स्वच्छ वाहतुकीला चालना देण्याच्या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
****
वक्फ
बोज्यात मूळ मालकांच्या किंवा खासगी मालकीच्या जमिनींवर वक्फ बोर्डाच्या नोंदी झाल्याबाबत
निर्माण झालेल्या वादांवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशा प्रकरणांची वस्तुस्थिती तपासून जलद आणि
प्रभावी निपटारा करण्यासाठी राज्यातल्या सर्व विभागीय आयुक्तांच्या सदस्यतेखाली विशेष
बेंच स्थापन करण्याचे निर्देश दिले आहे. बेकायदेशीर नोंदी आढळल्यास
त्या कायद्यानुसार तातडीने कमी करून पुढील कार्यवाही करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
****
ज्येष्ठ
कॉँग्रेस नेते डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवावर काल कोल्हापूर इथं शासकीय इतमामात
अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस पथकानं बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली.
डॉ. डी. वाय.पाटील यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला होता. तत्पूर्वी उच्च
आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन
मुश्रीफ, खासदार
शाहू महाराज यांच्यासह अनेक मान्यवरांनी पाटील यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण
करुन आदरांजली वाहिली.
****
अंध
महिलांच्या टी-20 क्रिकेट
विश्वचषकावर भारताचं नाव कोरणाऱ्या अंध महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या सदस्यांचा
काल राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भारतीय अंध महिला
क्रिकेट संघाच्या तसंच खेळाडुंच्या प्रेरणादायी प्रवासावर आधारित देख ले! इंडिया; या माहितीपटाच्या प्रदर्शनानिमित्त
या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं.
****
राष्ट्रीय
नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत नाशिक जिल्ह्यात काल एकाच दिवशी एक लाख लिटर जीवामृताची
म्हणजेच नैसर्गिक खताची निर्मिती करण्यात आली. प्रथमच अशी खतनिर्मिती करून कृषी विभागानं
नैसर्गिक शेतीच्या प्रसाराला नवं बळ दिलं आहे. या जीवामृताचा वापर खरीप हंगामातल्या
विविध पिकांवर करण्यात येणार आहे. राज्य शासनाचा कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन
यंत्रणेनं राबवलेल्या या विशेष मोहिमेत जिल्ह्यातल्या ८० शेतकरी गटांतले दहा हजार शेतकरी
सहभागी झाले होते. जीवामृत हे सूक्ष्मजीवांनी समृद्ध असं द्रवरूप सेंद्रिय खत आहे.
****
अवयवदान
पंधरवड्यानिमित्त काल बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नेत्ररोग विभागातल्या अधिकारी
आणि कर्मचाऱ्यांनी सामूहिक अवयवदान प्रतिज्ञा घेतली. या कार्यक्रमात अवयवदानाचं सामाजिक
महत्त्व, अवयवदानातून
मिळणारं नवजीवन याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं.
****
पैठणच्या
जायकवाडी धरणातून सध्या सुमारे ३० हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू
आहे. धरणाच्या १८ दरवाजातून सुमारे २८ हजार घनफूट, उजव्या कालव्यातून एक हजार, तर डाव्या कालव्यातून ७०० घनफूट
प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. धरणाचा पाणी
साठा सुमारे ९४ टक्क्यांवर पोहोचला आहे.
दरम्यान, जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात
येत असल्याने गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतल्या नागरिकांनी
विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
No comments:
Post a Comment