Thursday, 27 August 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 27.08.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 27 August 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ ऑगस्ट २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे ‘खेलो इंडिया डायलॉग’ला संबोधित करणार

·      नेपाळमध्ये आलेल्या पुरात १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता, राज्यातल्या नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर्स जारी

·      एमपीएससीच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी आयोगाच्या तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक

·      राज्यात शासकीय शाळांमधल्या गरजु विद्यार्थ्यांना मोफत चष्मे मिळणार

आणि

·      श्रीलंकेविरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचे पारडे जड

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे ‘खेलो इंडिया डायलॉग’ला संबोधित करणार आहे. भारताच्या क्रीडा प्रवासात युवकांचा अधिकाधिक सहभाग वाढवणं, त्यांच्या आकांक्षा जाणून घेणं आणि सक्षम युवा-केंद्रित विकसित भारताच्या उभारणीत त्यांचं योगदान सुनिश्चित करणं, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. ‘मेरा युवा भारत’च्या वतीने आयोजित हा कार्यक्रम राष्ट्रीय क्रीडा दिन २०२६च्या उत्सवाचा एक भाग आहे. देशातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या दोन महाविद्यालयांमध्ये ‘युवा कनेक्ट’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून युवकांना खेळाडूंशी थेट संवाद साधण्याची तसंच भारतीय क्रीडा क्षेत्राच्या भविष्यासंदर्भात आपले विचार आणि आकांक्षा मांडण्याची संधी मिळणार आहे.

छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय कला महाविद्यालयात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

नेपाळमध्ये आलेल्या पुरात ४७ जणांचा मृत्यू झाला असून, सुमारे ५०० जण बेपत्ता आहेत. बेपत्ता व्यक्तींमध्ये १०५ भारतीय आहेत. प्रारंभिक माहितीनुसार भूकंपामुळे हिमस्खलन होऊन बर्फाच्या वितळलेल्या पाण्याचा लोंढा कोसी नदीत येऊन अचानक पूरस्थिती निर्माण झाली. सुरक्षा दलांनी विविध ठिकाणांहून ८० जणांची सुखरूप सुटका केली आहे. पुराच्या पार्श्वभूमीवर सशस्त्र सीमा दलानं भारत-नेपाळ सरहद्दीलगतच्या आपल्या सर्व तुकड्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

नेपाळमध्ये पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेन्द्र शाह यांच्याशी संवाद साधून या संकटाच्या क्षणी भारत नेपाळच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं सांगितलं.

दरम्यान, या पुरात अडकलेल्या राज्यातल्या नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर्स जारी करण्यात आले आहेत. मंत्रालयातला नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत असून ज्यांना कुठल्याही प्रकारच्या मदतीची गरज आहे, त्यांनी १०७० या राज्य नियंत्रण कक्ष हेल्पलाईनवर किंवा 93 21 58 71 43 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाकडून 0240-2 33 10 77 आणि  73 50 33 51 04 हे नंबर जारी करण्यात आले आहेत.

नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेड जिल्ह्यातल्या पर्यटकांनी ०२ ४६२-२३ ५० ७७ किंवा १ ० ७ ७ या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.

****

मुंबई पोलिसांनी राज्य लोकसेवा आयोग - MPSC च्या औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपरफुटीप्रकरणी आयोगाच्या तीन अधिकाऱ्यांसह एकूण सहा जणांना अटक केली आहे. अटक झालेल्यांमध्ये MPSC चे अवर सचिव आणि कक्ष अधिकारी यांचा समावेश असल्याचं वृत्त आहे. न्यायालयानं या सर्व आरोपींना येत्या बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी MPSC च्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

****

सायबर गुन्हेगार पोलीस, सीबीआय किंवा न्यायाधीशांच्या नावाने धमकावून नागरिकांची फसवणूक करत आहेत. त्यामुळे अशा प्रकारांना बळी न पडता फसवणूक झाल्यास तातडीनं  १ ९ ३ ० या सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत काल ‘डिजिटल अरेस्ट’ जनजागृती लघुपट आणि ‘१ ९ ३ ० महाराष्ट्र सायबर अँथम’चं लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते. फसवणुकीनंतरचा ‘गोल्डन अवर’ अत्यंत महत्त्वाचा असून, तातडीनं तक्रार केल्यास पैसे रोखण्याची किंवा परत मिळवण्याची शक्यता वाढते, असं मुख्यमंत्री म्हणाले.

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

व्हॉईस क्लोनिंग, डीपफेक आणि बनावट ऑडिओ-व्हिडिओ यांसारख्या नव्या सायबर धोक्यांबाबतही नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

****

राज्यातल्या शालेय विद्यार्थ्यांच्या डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीनं शालेय शिक्षण विभागानं एक त्रिपक्षीय सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार शासकीय शाळांमधल्या पाचवी ते दहावीच्या २० लाख विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी केली जाणार असून दृष्टीदोष आढळलेल्या गरजू विद्यार्थ्यांना नंबरचे चष्मे मोफत उपलब्ध करून दिले जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत काल मुंबईत शालेय शिक्षण विभाग, रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि वनसाईट एस्सिलार लक्सोटिका फाउंडेशन यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.

****

सुरक्षित अन्न ही केवळ सरकार किंवा प्रशासनाची जबाबदारी नाही तर नागरी अन्नधान्याचे व्यापारी आणि नियामक संस्था अशा सर्वांना यासाठी एकत्रित काम करावं लागेल, असं अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. सणासुदीच्या काळात नागरिकांनी खाद्यपदार्थ विकत घेताना त्यांची गुणवत्ता, किंमत, एक्सपायरी डेट अशा सर्व गोष्टींची खातरजमा करुन घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला. राज्यात खुल्या तेलाच्या विक्रीवर बंदी घालणं हा नवा आदेश नाही, २०११ पासूनच खुल्या तेलाच्या संदर्भात नियम लागू आहेत, मात्र, काही विशेष परिस्थितीत खुल्या तेलाच्या विक्रीसंदर्भातल्या नियमांमध्ये सुट दिली जाऊ शकते, असंही मुंढे यांनी सांगितलं.

राज्यात ३१ जुलैपर्यंत एफडीएनं तीन हजार १०० पेक्षा अधिक खाद्यपदार्थ आस्थापनांची तपासणी केली, त्यापैकी १६५ जणांचे परवाने रद्द करण्यात आले, साडेसातशे अस्थापनांना सुधारण्यासाठी नोटीस जारी करण्यात आल्याची माहिती मुंढे यांनी दिली.

****

ईद-ए-मिलाद-उन-नबी काल सर्वत्र उत्साहात साजरी झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या खुलताबद इथं यानिमित्त पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या पवित्र पोषाख आणि केसांचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक दाखल झाले होते. छत्रपती संभाजीनगर शहरातही ईद निमित्त भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. या मिरवणुकांचं पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आलं. शहरात सहा ठिकाणी रक्तदान शिबिरं, अन्नदान करून सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.

ईद निमित्त लातूरच्या केजीएन ग्रुपच्या वतीने ईदगाह मैदानात आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात अनेक जणांनी रक्तदान केलं.

बीड इथं बार्शी नाका परिसरात मुस्लिम बांधवांच्या वतीने जुलूस काढण्यात आला. यावेळी परस्परांना शुभेच्छा देत सामाजिक सलोखा आणि एकतेचा संदेश देण्यात आला.

****

कांदा दर स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफने खरेदी केलेला सुमारे साडे चारशे मेट्रिक टन कांदा काल नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव इथून विशेष रेल्वेनं दिल्लीला रवाना झाला. केंद्र शासनाच्या ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या वतीने शहरी भागातल्या ग्राहकांना रास्त दरात कांदे उपलब्ध करून देण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली होती.

****

लातूर जिल्ह्यातल्या शासकीय रुग्णालयांचं फायर ऑडिट आणि स्ट्रक्चरल ऑडिट तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले आहेत. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. शॉर्ट सर्किटमुळे आगीच्या घटना घडू नयेत, यासाठी रुग्णालयात, विशेषतः आयसीयू आणि ज्याठिकाणी ऑक्सिजन सिलेंडर, व्हेंटिलेटर ठेवल्या जाणाऱ्या कक्षात अग्निशमन यंत्रणा आणि फायर अलार्म तपासणी करून अधिक सक्षमपणे कार्यान्वित राहील, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केली.

****

मुंबईत आज होणाऱ्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात पोलिसांनी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजू कसबे यांच्यासह कार्यकर्त्यांना उजनी टोलनाक्यावर काल रोखलं होतं. मात्र कसबे हे शेकडो शेतकऱ्यांसह पोलिसांना चकवा देत मुंबईच्या दिशेने रवाना झाले. जिल्ह्यातल्या टोलनाक्यावर पोलिसांनी ताफा अडवल्यानंतर आंदोलक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचं आमच्या वार्ताहराने कळवलं आहे.

****

क्रिकेट

कोलंबो इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात, काल चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेनं १६ धावांची आघाडी घेतली आहे. भारतानं पहिल्या डावात केलेल्या ५०३ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा पहिला डाव काल २९० धावावर संपला. पहिल्या डावात २१३ धावांची आघाडी मिळाल्यानं भारतानं श्रीलंकला फॉलोऑन दिला. त्यानंतर, श्रीलंकेच्या दिवसअखेर सहा बाद २२९ धावा झाल्या आहेत.

****

हवमान

पुढील तीन दिवस मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपचा पाऊस पडण्याची शक्यता, हवामान विभागानं व्यक्त केली आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 02 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी ...