Friday, 28 August 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 28.08.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 28 August 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ ऑगस्ट २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

नेपाळ आणि तिबेटमध्ये आलेल्या विनाशकारी महापुराच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारनं तिथं अडकलेल्या आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी मोठं बचाव अभियान सुरू केलं आहे. नेपाळमध्ये संपर्क न होऊ शकलेल्या २९० भारतीय नागरिकांचा शोध घेण्यासाठी २४ तास कार्यरत असणारा विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आल्याचं भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं आहे. आतापर्यंत ८४ भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं असून, यात त्रिशूली-एक जलविद्युत प्रकल्पातील ६३ कर्मचारी आणि तामिळनाडूतील २१ पर्यटकांचा समावेश आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांच्याशी चर्चा करून भारताकडून सर्व प्रकारची आवश्यक मानवी मदत आणि सहकार्य देण्याचे पूर्ण आश्वासन दिलं आहे.

****

कैलास मानसरोवर यात्रेवरून परतताना तिबेटमधील सागा इथं अडकलेले महाराष्ट्रातील ३७ भाविक आज सकाळी सुखरूप काठमांडूकडे रवाना झाले आहेत. ठाणे, पुणे, रायगड आणि डोंबिवली परिसरातील हे भाविक परतीच्या प्रवासात अडकले होते. २९ ऑगस्टच्या नियोजित विमानानं भारतात परतण्यासाठी त्यांना वेळेत काठमांडू पोहोचणं आवश्यक असल्यानं या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीनं केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी संपर्क साधून आवश्यक प्रयत्न केले. त्यानंतर सर्व भाविक सागा इथून न्यालम चेक पोस्टमार्गे काठमांडूकडे रवाना झाले आहेत.

****

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक केंद्राचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घघाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या अत्याधुनिक प्रशासकीय वास्तूमुळे परिसरातील अडीच लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला गती मिळणार आहे. दरम्यान, स्थानिक गरजा आणि रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन वाईन टेक्नॉलॉजीशी संबंधित पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसह स्वतंत्र संशोधन केंद्र सुरू करण्यात येणार आहेत, असंही गोसावी यांनी सांगितलं.

****

नाशिक शहरात आजपासून त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे कुंभभक्ती संगमाला प्रारंभ होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घघाटन सोहळा होणार आहे. या सोहळ्यात तीन दिवस विविध अध्यात्मिक कार्यक्रम सादर केले जाणार असून कीर्तन, भजन, ‘भक्ती संमेलन’ आणि विविध भक्ति कार्यक्रमांचं यावेळी आयोजन करण्यात आलं आहे.

****

आज श्रावण पौर्णिमा, म्हणजेच भावंडांच्या निस्सीम प्रेमाचा, विश्वासाचा आणि आपुलकीचा सण - रक्षाबंधन! रक्षाबंधन, केवळ मनगटावर रेशमी धागा बांधणे नव्हे, तर दोन मनांना जोडणारं एक अखंड विश्वासाचं बंधन. बहीण भावाच्या दीर्घायुष्याची अन् यशाची प्रार्थना करते, तर भाऊ तिच्या सुरक्षेची आणि पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची ग्वाही देतो. बहिण भावाचं पवित्र नातं जपणारा राखी पौर्णिमेचा सण देशभर सर्वत्र आज साजरा होत आहे.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रक्षाबंधनानिमित्त देश-विदेशातील सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. राखीचा पवित्र धागा केवळ भाऊ-बहिणीपुरता मर्यादित नसून, समाजात आपुलकी, आदर, विश्वास आणि परस्पर सहकार्याचे प्रतीक असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. या पावन प्रसंगी कुटुंबातील आणि समाजातील परस्पर बंध अधिक मजबूत करत, 'विकसित भारता'च्या ध्येयाकडे एकत्र पुढे जाण्याचे आवाहन राष्ट्रपतींनी सर्व देशवासीयांना केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रक्षाबंधनानिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

****

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात कर्जमाफीच्या दुसऱ्या टप्प्यात ५१ हजार ३३० शेतकऱ्यांसाठी, ३८१ कोटी ९४ लाख ६७ हजार इतकी कर्जमाफीची रक्कम प्राप्त झाली आहे. ही रक्कम जिल्ह्यातल्या संबंधित बँकांमध्ये वर्ग करण्यात आली आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं उद्या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली उद्या सकाळी १० ते दुपारी चार वाजेपर्यंत हॉटेल रामा इंटरनॅशनल इथं ही परिषद होणार आहे. जिल्ह्यातील उद्योजक, उद्योजक संघटनांचे प्रतिनिधी, शेती उत्पादक संस्था, नव उद्योजक यांनी या परिषदेत सहभागी होण्याचं आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या उपायुक्त करुणा खरात यांनी केलं आहे.

****

अमरावती इथं नुकत्याच रुग्णालयाला आग लागून तीन अर्भकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगनं स्वतःहून दखल घेतली आहे. याप्रकरणी राज्याच्या मुख्य सचिवांना आयोगाने नोटीस जारी केली आहे. येत्या दोन आठवड्यात या दुर्घटनेबद्दलचा अहवाल सादर करावा, असे निर्देश आयोगानं दिले आहे.

****

क्रिकेट -

भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलंबो इथला दुसरा क्रिकेट कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानं भारतानं दोन सामन्यांची मालिका एक - शून्य अशी जिंकली. या सामन्याच्या शेवटच्या दिवशी काल श्रीलंकेनं दुसऱ्या डावात नऊ बाद ४२९ धावा केल्या.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 01 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...