Tuesday, 25 August 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 25.08.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 25 August 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ ऑगस्ट २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

युनिफाइड पेमेंट इंटरफेस - युपीआयने डिजिटल पेमेंट क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्याची दहा वर्षे पूर्ण केली आहेत. आर्थिक वर्ष २०१६-१७ ते २०२५-२६ दरम्यान युपीआय व्यवहारांच्या संख्येत १३ हजार पट तर मूल्यात चार हजार पट वाढ झाली आहे. जगातल्या ११ देशांमध्ये युपीआय कार्यरत असून, ७०३ बँका या प्रणालीशी जोडल्या गेल्या आहेत. युपीआयमुळे लहान शहरांपासून ते थेट खेड्यापाड्यांपर्यंत, दैनंदिन कोट्यवधी व्यवहार अवघ्या काही सेकंदांत शक्य झालं आहे. युपीआयद्वारे ३१४ लाख कोटींच्या व्यवहारांसह भारत जगातली सर्वात मोठी रिअल-टाईम पेमेंट प्रणाली बनली आहे. युपीआयची व्याप्ती ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. एका दशकापूर्वी सुरू झालेल्या युपीआयच्या अभूतपूर्व यशावर प्रकाश टाकत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना त्यांचे युपीआय अनुभव आणि दैनंदिन जीवनावरील प्रभाव सोशल मीडियावर शेअर करण्याचं आवाहन केलं आहे.

****

गव्हाचं पीठ आणि संबंधित पदार्थांवरच्या निर्यातीवरचे निर्बंध सरकारने उठवले आहेत. त्यामुळे आटा, मैदा, रवा आणि इतर उत्पादनांच्या निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे. परकीय व्यापार महासंचालनालयानं याबाबत अधिसूचना जारी केली आहे. निर्यात धोरणातले हे बदल लगेच लागू होतील.

****

राज्यात साखरेच्या भावांमध्ये गेल्या तीन दिवसांत प्रतिक्विंटल १५०० रुपयांची मोठी घसरण झाली आहे. केंद्र सरकारनं साठेबाजी रोखण्यासाठी उचललेल्या कडक पावलांमुळे बाजारातली कृत्रिम तेजी ओसरू लागल्यानं साखरेचे भाव नियंत्रणात येत असल्याचं दिसून येत आहे. साखरेच्या भावांमध्ये झालेली वाढ कृत्रिम होती अशी माहिती राष्ट्रीय सहकारी कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी दिली. घाऊक बाजारात ६७ रुपयांवर गेलेले दर खाली आले असून, किरकोळ बाजारातही प्रति किलो मागे सात रुपयांची घसरण झाली आहे. राज्यात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती साखर संचालक डॉ. केदारी जाधव यांनी दिली.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल मुंबईत महा eHRMS प्रणालीचं लोकार्पण करण्यात आलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होत्या. या नव्या डिजिटल प्रणालीमुळे प्रशासनाची गती वाढण्यासोबतच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर आणि कार्यप्रेरणेवर सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. महा eHRMS मध्ये सहा प्रमुख डिजिटल साधनांचा एकात्मिक पद्धतीनं समावेश करण्यात आला आहे. अद्ययावत माहितीच्या आधारे शासनाला तातडीनं आणि परिणामकारक निर्णय घेता येणार आहेत. तसंच कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक बाबी पारदर्शक, सुसूत्र आणि सर्वसमावेशक पद्धतीनं हाताळता येणार असून, यामुळे कर्मचारी कार्यक्षमता आणि कार्यप्रेरणा वाढण्यास मदत होईल, असं सुनेत्रा पवार यांनी सांगितलं.

****

मराठी भाषेच्या अस्मितेच्या मुद्द्यावरून राज्यात रिक्षा-टॅक्सी चालकांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या किंवा नियमबाह्य पद्धतीनं कारवाई करणाऱ्या आरटीओ अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. मराठीच्या मुद्द्यावर राज्यात कोणत्याही रिक्षा किंवा टॅक्सी चालकाचं लायसन्स किंवा बॅच रद्द करण्यात आलेलं नाही. तसंच कोणालाही २० ते २५ हजार रुपयांचा दंड करण्यात आलेला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. शासन निर्णयानुसारच कारवाई करण्याचे अधिकार आरटीओ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, असं त्यांनी सांगितलं. कोणाचाही रोजगार हिरावून घेण्याची शासनाची भूमिका नसून, मराठीच्या अस्मितेचा आदर व्हावा, हीच भूमिका असल्याचं सरनाईक यांनी स्पष्ट केलं.

****

दहशतवाद, नक्षलवाद तसंच व्यसनाचं निर्मूलन हेच केंद्र आणि राज्य शासनाचं ध्येय असल्याचं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. सुदृढ, सुशिक्षित आणि सक्षम समाज घडवण्यासाठी पाटील यांच्या संकल्पनेतून सांगलीत काल नशामुक्ती निर्धार पदयात्रा काढण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.

****

छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाच्या सुरू असलेल्या पुनर्विकास कामांची काल खासदार संदिपान भूमरे यांनी पाहणी केली. विकासकामांचा दर्जा, प्रगती, आदीचा आढावा घेत, निर्धारित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने सर्व कामं पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

****

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या बाल आरोग्य विभागाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर इथं समग्र शिशु बाल स्वास्थ्य कार्यक्रम या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचं काल उद्घाटन झालं. कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी माता आणि बालकांच्या आरोग्य सेवांचा आढावा, नवजात आणि बालकांमधल्या जोखमीचं वर्गीकरण, तसंच नवजात आणि लहान बालकांमधली धोक्याची चिन्हं ओळखून आवश्यक उपचार आणि संदर्भसेवा याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. 

****

 

 

 

 

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 01 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...