Sunday, 16 August 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 16.08.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 16 August 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १६ ऑगस्ट २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      डीएमआयसी साठी दुसऱ्या टप्प्यातील आठ हजार एकर भूसंपादनच्या प्रक्रियेला गती

·      एलपीजीचं उत्पादन वाढवण्यासाठी तेलशुद्धीकरण कंपन्यांना कमाल उत्पादनाचं उद्दिष्ट निश्चित

आणि

·      पालघरमध्ये नालासोपारा इथं ११ जणांना अन्नातून विषबाधा

****

छत्रपती संभाजीनगर येथील शेंद्रा, बिडकीन ऑरिकसाठी पहिल्या टप्प्यात संपादित १० हजार एकर जागा संपल्याने आता दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित ८ हजार एकर भूसंपादनाच्या प्रक्रियेला सुरुवात होत आहे. या भूसंपादनासाठी जायकवाडी प्रकल्पाचे उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम अन्वये नोटीस जारी केली आहे. पैठण, संभाजीनगर तालुक्याच्या ६ गावांतील ७ हजार ४३८ एकर जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे. त्यात ८२५ गटांचा समावेश आहे. याआधी २०१२ मध्येच या डीएमआयसीसाठी शेंद्रा आणि बिडकीन परिसरात १० हजार एकर जागेचे भूसंपादन करण्यात आले होते.

****

माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठव्या पुण्यतिथी निमित्त देश त्यांना आदरांजली वाहत आहे. नवी दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी आज सकाळी सर्वधर्मीय प्रार्थना सभा झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह प्रमुख नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. अटलजींनी देशसेवेसाठी आयुष्य वेचलं. त्यांच्या सक्षम नेतृत्वाने आपल्या देशाला अधिक मजबूत बनवलं अशा शब्दांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसंच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही दिवंगत वाजपेयी यांना आदरांजली वाहिली आहे.

****

पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे स्वयंपाकच्या गॅसचा पुरवठा प्रभावित झाल्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्रसरकारने एलपीजीचं उत्पादन वाढवण्यासाठी विविध तेलशुद्धीकरण कंपन्यांसाठी कमाल उत्पादनाचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने १३ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, देशातल्या २१ तेलशुद्धीकरण कंपन्यांना दर दिवशी एकूण ६३ हजार ८१० टन एलपीजी उत्पादनाची क्षमता निर्धारित करण्यात आली आहे. यापैकी सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल कंपन्यांना ३१ हजार ४७० टन उत्पादनाचा वाटा उचलतील. हे उत्पादन देशाच्या ७० टक्के दैनंदिन गरजेची पूर्तता करेल असा अंदाज आहे. देशात वापरल्या जाणाऱ्या एलपीजी गॅसचा ६४ टक्के भाग आयात केला जातो.

****

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बलिदान देणाऱ्या १०६ हुतात्म्यांना महाराष्ट्र सरकारच्या नवीन प्रशासकीय इमारतीत कायमस्वरुपी स्थान दिलं जाणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार यांनी दिली आहे. या इमारतीवर त्यांची नावं ठळकपणे प्रदर्शित करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं ते म्हणाले.

****

पालघर जिल्ह्यात नालासोपारा इथं काल रात्री एका मुलीच्या वाढदिवसाच्या पार्टीत ११ जणांना अन्नामधून विषबाधा झाली. यापैकी ४ जणांची प्रकृती गंभीर असून, ७ जणांवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शाळांना बायोमेट्रिक उपस्थिती आणि सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक केले आहेत. आता शिक्षकांवर प्रशासनाची थेट नजर राहणार आहे. बायोमेट्रिक उपस्थितीमुळे कर्मचाऱ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीची पारदर्शक नोंद उपलब्ध होईल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित असणे आवश्यक आहे. शाळांनी या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करावी. नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांबाबत प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी सांगितले.

****

मुंबईत कुलाबा इथल्या नेव्ही नगर परिसरात काल नौदलाचा एक जवान, त्याची पत्नी आणि दोन अल्पवयीन मुलं यांचे मृतदेह त्यांच्या निवासस्थानी आढळून आले. या जवानाने आत्महत्या केल्याचं, तसंच त्याच्या कुटुंबियांचा मृत्यू विषबाधेने झाल्याचं प्रथमदर्शनी आढळून येत असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. पोलिसांनी या प्रकरणाची अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली असून पुढील तपास सुरू असल्याचं भारतीय नौदलानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

****

महावितरणनं वीजचोरीविरुद्ध एप्रिल महिन्यापासून राज्यभरात केलेल्या धडक मोहीमेत चार महिन्यांत घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक तसंच इतर वर्गवारीत १९ हजार ५९९ ठिकाणी वीजचोरी उघड झाली आहे. जुलै महिन्यात सर्वाधिक ११ हजार ३२ ठिकाणी वीजचोरी झाल्याचे उघड झाले. थेट तारेच्या हूकद्वारे आणि मीटरमध्ये फेरफार केलेल्या १५ हजार ९६५ प्रकरणांत ३० कोटी ३६ लाख रुपयांची वीजचोरी झाल्याचं आढळून आलं आहे. कोकण, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे प्रादेशिक विभागात या वीजचोऱ्या उघडकीस आल्या आहेत. या वीजचोरीचं बिल संबंधित ग्राहकांना देण्यात आलं आहे. वीजचोरीच्या संपूर्ण रकमेचा दंडासह मुदतीत भरणा केला नाही तर संबंधित वीजचोरांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येत आहे.

****

धाराशिवमध्ये आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसराचा २२वा वर्धापन दिन विविध शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. उपपरिसराच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा यावेळी घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबत कौशल्य, नैतिक मूल्ये, सामाजिक जाणीव आणि रोजगाराभिमुख क्षमता आत्मसात करणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉ.मनोहर चासकर यांनी केलं. त्यांच्या हस्ते यावेळी साहित्य क्षेत्रातल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांना ‘जीवनसाधना पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. उपपरिसर हा केवळ शिक्षण देणारी संस्था न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासोबतच परिसराच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना देणारे केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं प्र-कुलगुरु प्राध्यापक प्रवीण वक्ते यांनी सांगितलं.

****

नांदेडमधल्या लोहा तालुक्यातील श्री क्षेत्र माळेगाव इथल्या आगामी खंडोबा यात्रेच्या अनुषंगानं भाविकांना उत्तम सुविधा देण्यासाठी परिसरात विविध विकासकामांना गती देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कंधार लोहा मतदार संघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आज विकास कामासंदर्भात शासकीय विश्रामगृह इथं आढावा बैठक घेतली. त्यांनी यात्रा परिसरातल्या विविध कामांची अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी केली.

****

श्रावण मासानिमित्तानं नाशिकमधल्या श्री त्रंबकेश्वर महादेव मंदिरात आज मध्यरात्रीपासून फेरीला सुरुवात होणार आहे. त्यासाठी भाविकांच्या आगमनाला सुरुवात झाली आहे. राज्य परिवहन महामंडळानं विशेष बसची सोय केली असून त्या थेट त्रंबकेश्वर पर्यंत जाणार आहेत. मात्र अन्य खाजगी वाहतूक खंबाळे इथं थांबवण्यात येणार असून त्र्यंबकेश्वर मार्गे जाणारी वाहतूक जव्हार मार्गे वळवण्यात आली आहे.

****

वीज ग्राहकांच्या समस्या आणि तक्रारींचे स्थानिक पातळीवर तातडीनं निराकरण व्हावं तसंच ग्राहकांना विविध सेवा आणि योजनांची माहिती मिळावी यासाठी महावितरणकडून उद्या आणि परवा सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत ‘ग्राहक समाधान शिबिर' आयोजित करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगरात शहर विभाग एक आणि दोन अंतर्गत आठ उपविभाग कार्यालयात ही शिबिरे होतील. शिबिरात वीजबिलातील तक्रारी, नवीन वीजजोडणी संबंधित समस्या तसंच महावितरणच्या विविध सेवांबाबतच्या तक्रारींचं निराकरण करण्यात येणार आहे.

****

बीडमधल्या पिंपळगाव घाट ते पांढरेवाडी या मार्गावरील रस्ता तातडीनं तयार करून वाहतुकीसाठी खुला करावा, या मागणीसाठी कालपासून पिंपळगाव घाट इथं सुरू करण्यात आलेल्या बेमुदत उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळं विद्यार्थी, रुग्ण, शेतकरी तसंच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागत आहे. प्रशासनानं तातडीनं दखल घेऊन रस्त्याचे काम सुरू करावे, या मागणीसाठी हे बेमुदत उपोषण ग्रामस्थांनी सुरू केलं आहे.

****

विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी छत्रपती संभाजीनगर येथे जिल्ह्यातील विविध कामांचा आढावा घेत आगामी काळातील विकासकामांबाबत चर्चा केली. यावेळी जिल्ह्यातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित विविध प्रश्न, पायाभूत सुविधा, विकासकामे आणि जनहिताच्या विषयांवर यावेळी विचारविनिमय झाला. शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे, पैठणचे आमदार विलास भुमरेंसह नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नेत्यांची उपस्थिती होती.

****

देशसेवेचं कर्तव्य बजावत असताना सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी इथले जवान वैभव तात्यासाहेब आवताडे यांना जम्मूमध्ये वीरमरण आलं. त्यांच्या मूळगावी गणेशवाडीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

****

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पावसाने मोठा व्यत्यय आणला. सकाळचे सत्र पूर्णपणे रद्द झाल्यानंतर दुपारी अडीच वाजता खेळाला सुरुवात झाली. आज दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या पहिल्या डावात ९ बाद ४६० धावा झाल्या आहेत. भारताकडून युवा फलंदाज देवदत्त पडिक्कलने अप्रतिम फलंदाजी करत २३० चेंडूत १६७ धावांची दमदार शतकी खेळी केली.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 01 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...