Saturday, 8 August 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 08.08.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 08 August 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०८ ऑगस्ट २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      एसआयआर अंतर्गत राज्यातल्या १२ जिल्ह्यांमध्ये स्वयंनोंदणी अर्ज वाटप पूर्ण-मराठवाड्यातल्या परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांचा समावेश

·      सहकारी बँका जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कार्यरत असल्याचं केंद्रीय सहकार मंत्र्यांचं प्रतिपादन

·      देशभरात कोट्यवधी रुपयांचा सायबर घोटाळा करणारी म्यूल बँक खाती उघडकीस-दोन जणांना अटक

·      डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रवेशासाठी १४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

आणि

·      ‘कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताची अश्मिता चालिहा अंतिम फेरीत दाखल

****

राज्यातल्या १२ जिल्ह्यांमध्ये मतदारयाद्यांच्या सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत स्वयंनोंदणी अर्ज वाटपाचं काम १०० टक्के पूर्ण झालं आहे. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने आज ही माहिती दिली. यामध्ये मराठवाड्यातल्या परभणी आणि हिंगोलीसह जळगाव, बुलडाणा, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अहिल्यानगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यात एकंदर नऊ कोटी ५४ लाख ७७ हजार ११९ अर्ज वाटण्यात आले. एक लाख २५३ बूथ लेव्हल अधिकारी या वाटप प्रक्रियेत सहभागी आहेत. अर्ज करण्यासाठीची मुदत येत्या १७ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे.

****

सहकारी बँका या नफा कमवण्यासाठी नसून जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कार्यरत असल्याचं प्रतिपादन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी केलं आहे. शहा यांच्या हस्ते आज मुंबईत राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. नागरी सहकारी बँकांना मुख्य प्रवाहात आणणं हाच या शिखर संघटनेचा उद्देश असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. ही संघटना, बँकिंग सेवा आधुनिक, पारदर्शी आणि विश्वासार्ह बनवून या क्षेत्रात परिवर्तन घडवून आणेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्व सहकारी बँकांनी या संघटनेसोबतच आजपासून सुरु झालेल्या सुरक्षा कार्यान्वयन केंद्रातही सहभागी व्हावं, असं आवाहन त्यांनी केलं. महाराष्ट्रात देशातल्या सर्वात जास्त ४४९ सहकारी बँका असल्याचा उल्लेख त्यांनी केला. या कार्यक्रमात NUCFDC आणि राष्ट्रीय न्याय सहाय्यक विज्ञान विद्यापीठ यांच्यात एक सामंजस्य करारही करण्यात आला. तसंच विविध संबंधित सेवांचं लोकार्पणही शहा यांच्या हस्ते झालं.

****

गैरवापराच्या उद्देशानं तयार करण्यात येणारी म्यूल बँक खाती उघडणाऱ्या टोळीचा पोलिसांनी मुंबईत पर्दाफाश केला. पोलिसांनी या प्रकरणी २ जणांना अटक केली असून देशभरात ४२ प्रकरणात तब्बल साडे सात कोटी रुपयांचा सायबर घोटाळा करण्यात वापरली गेलेली बँक खाती उघडकीस आणली आहेत. खार पोलीस ठाण्यात नुकत्याच दाखल झालेल्या एका प्रकरणाच्या चौकशीत या टोळीचा सुगावा लागल्याचं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणातल्या तक्रारदाराशी टेलिग्राम या ऍपच्या माध्यमातून संपर्क साधून त्याला मोठ्या परताव्याचं अमिष दाखवण्यात आलं होतं.

****

मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात देणग्यांचा अपहार होत असल्याच्या आरोपांची समग्र चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मंदिराच्या गेल्या ५ वर्षातल्या नोंदी तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचं याबाबतच्या बातमित म्हटलं आहे. मंदिराच्या विश्वस्त मंडळानं काल २०२३ ते २०२६ दरम्यान मिळालेल्या देणग्यांच्या तपशीलवार नोंदी मुख्यमंत्र्यांना भेटून सादर केल्या, त्यानंतर त्या आधीच्या वर्षातल्या नोंदी तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. सिद्धीविनायक मंदिरात १८ कोटी रुपयांच्या देणग्यांचा अपहार झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. याप्रकरणी ९ कर्मचाऱ्यांना अटक झाली होती.

****

नवजात बालकांना दर्जेदार आणि अत्याधुनिक आरोग्यसेवा वेळेवर उपलब्ध व्हावी, तसंच नवजात बालक विशेष दक्षता विभागात अधिक सक्षम उपचार करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा तातडीनं उपलब्ध होतील, असं सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितलं. ते आज मुंबईत आरोग्य भवनात ‘एनआयसीयू आणि बालकांवरील उपचार’ या विषयावर झालेल्या आढावा बैठकीत बोलत होते. राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक असलेलं मनुष्यबळ तातडीनं उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रलंबित पदभरती आणि पदोन्नतीच्या प्रक्रियांना गती देण्याचे निर्देशही आबिटकर यांनी दिले.

****

स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात भारताने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. जीवाश्म-इंधनावर आधारित नसलेल्या वीज निर्मिती क्षमतेमध्ये देशाने ३०० गिगावॅटचा टप्पा ओलांडला आहे. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सामाजिक माध्यमावरून ही माहिती दिली. गेल्या १२ वर्षांत भारताच्या नवीकरणीय ऊर्जा क्षमतेत ४०० टक्क्यांनी वाढ झालेली आहे.

****

केंद्रीय गृह मंत्रालयानं ‘नियंत्रण रेषा’, ‘प्रत्यक्ष नियंत्रण रेषा’ आणि ‘आंतरराष्ट्रीय सीमा’ भोवतालच्या एक किलोमीटर परिसरात सौर, पवन आणि हायब्रीड अर्थात मिश्र अशा कोणत्याही नवीन अक्षय ऊर्जा प्रकल्पांना प्रतिबंध करणारी मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत. यानुसार, केंद्र सरकारच्या परवानगी शिवाय प्रकल्प अंमलबजावणीसाठी जमिनीवरच्या सीमारेषेबाजूच्या देशांमधले अभियंते, कर्मचारी आणि कामगारांची सेवा घेण्यास मनाई करण्यात आली असून सीमा रेषांच्या पन्नास किलोमीटर परिसराला ‘संवेदनशील क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आलं आहे. तसंच आंतरराष्ट्रीय सीमेपासून वीस किलोमीटर परिसरातल्या प्रकल्पांसाठी संरक्षण मंत्रालयाकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेणं आवश्यक असणार आहे. अर्जदारानं केंद्र सरकारच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणतीही जमीन परदेशी कंपनीला हस्तांतरित करू नये, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

****

महाराष्ट्र आणि पंजाब ही समान मूल्ये, आदर्श आणि धैर्याची जपणूक करणारी ‘जुळी राज्ये’ असल्याचं प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केलं आहे. ते आज मुंबईत श्री गुरू तेग बहादूरजी यांच्या ३५०व्या हौतात्म्य दिनाच्या निमित्ताने सीबीडी बेलापूर इथं ‘श्री गुरू तेग बहादूरजींचा वारसा’ या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात ते बोलत होते. महाराष्ट्रात असलेल्या ६५ सार्वजनिक आणि खाजगी विद्यापीठांपैकी एका विद्यापीठात ‘श्री गुरू तेग बहादूर अध्यासन’ स्थापन करण्याचं आवाहन राज्यपाल वर्मा यांनी केलं आहे.

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि धाराशिव उपपरिसर इथल्या पदवी तसंच पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी १४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मुख्य परिसर तसंच धाराशिव उपपरिसर या ठिकाणी मिळून चार विद्या शाखेतंर्गत १३६ पदवी, पदव्युत्तर आणि पदविका अभ्यासक्रम असून त्यात एकूण २ हजार ९३६ जागांची प्रवेशक्षमता आहे. या जागांवर आजपर्यंत १ हजार ७१९ जणांनी प्रवेश घेतल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागानं दिली आहे.

****

धाराशिव जिल्ह्यात ‘हरित धाराशिव अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात दहा लाख वृक्षलागवड करण्यात येणार आहे. शासनाच्या ३३ हेक्टर क्षेत्रात येत्या १४ ऑगस्ट रोजी अवघ्या १२ तासांत १० लाख वृक्षांची घन-वन पद्धतीने लागवड करून जागतिक विक्रम प्रस्थापित करण्याचा निर्धार जिल्हा प्रशासनाने केला आहे. या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केलं आहे.

****

बीड जिल्ह्यातील ६७ शेतकरी आणि २ समन्वयक अधिकारी आज आठवडाभराच्या गुजरात दौऱ्यावर रवाना झाले. नैसर्गिक शेती, शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, कृषी सलग्न व्यवसाय तसंच दुग्ध उत्पादनात नवनवीन तंत्रज्ञान अभ्यासण्यासाठी या अभ्यास दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. आत्मा कृषी विभागाने आयोजित केलेल्या सहलीला प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांच्या हस्ते झेंडा दाखवून रवाना करण्यात आलं.

****

नंदुरबार शहरात एका घराच्या छतावर लपवून ठेवलेल्या सात धारदार तलवारी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक अश्विनी सानप आणि अपर पोलिस अधीक्षक अशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील आणि सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.

****

दक्षिण कोरियातल्या असान इथं सुरु असलेल्या ‘कोरिया मास्टर्स सुपर ३००’ बॅडमिंटन स्पर्धेत भारताची बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा हिनं महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आज झालेल्या उपांत्य सामन्यात अस्मितानं भारताच्याच रक्षिता रामराजवर २१-१३, १६-२१, २१-१३ अशी मात करत अंतिम फेरी गाठली. उद्या अंतिम फेरीत अस्मिताची चीनच्या हान कियान शी हिच्याशी लढत होणार आहे.

****

पैठण इथल्या जायकवाडी धरणाच्या नाथसागर जलाशयाचं आज पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं. यावेळी विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गोडा, आमदार विलास भुमरे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

दरम्यान, जायकवाडी धरणातून सहा हजार २२८ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाच्या सांडव्याद्वारे सुमारे चार हजार ३२८ घनफूट, उजव्या कालव्यातून अकराशे, तर डाव्या कालव्यातून ८०० घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडण्यात येत आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 01 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...