Saturday, 29 August 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 29.08.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 29 August 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ ऑगस्ट २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

देशात साखरेची कोणतीही कमतरता नाही, वाजवी दरात पुरेश्या प्रमाणात साखर उपलब्ध करून देण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. साखरेचे भाव सुमारे २० टक्क्यांनी कमी झाले असून किरकोळ बाजारातील भावही उतरू लागले आहेत. देशभरातील साखरेचे दर, साठा यावर सरकार बारकाईनं लक्ष ठेवून आहे असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे.

****

आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी आतापर्यंत सात कोटींहून अधिक प्राप्तीकर विवरणपत्रं दाखल झाली असल्याची माहिती प्राप्तीकर विभागानं दिली आहे. व्यवसाय किंवा व्यावसायिक उत्पन्न असलेल्या आणि लेखापरीक्षणाची आवश्यकता नसलेल्या करदात्यांसाठी ३१ ऑगस्ट ही विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट न पाहता लवकर विवरणपत्र दाखल करण्याचं आवाहन प्राप्तीकर विभागानं केलं आहे. याआधी ३१ जुलैपर्यंत पाच कोटी ९० लाखांहून अधिक विवरणपत्रं दाखल झाली होती. अंतिम दिवशीच ४० लाखांहून अधिक विवरणपत्रं दाखल झाली होती. शेवटच्या दिवसांत संकेतस्थळावर वाढता ताण येण्याची शक्यता असल्यानं करदात्यांनी प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असं आवाहन विभागानं केलं आहे.

****

पुण्यातील पोलिसांची विशेष शाखा आणि सैन्य गुप्तचर विभागाच्या एकत्रित कारवाईत शहरात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. प्राथमिक चौकशी आणि त्यांच्या बेकायदेशीर प्रवेशाची खातरजमा केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी तिघांविरुद्ध स्थानबद्धतेचे आदेश जारी केले आहेत. बांगलादेशात परत पाठवण्याची अधिकृत प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ते पोलिसांच्या ताब्यात राहणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 'मन की बात' या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा १३१वा भाग आहे. आकाशवाणी दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

राष्ट्रीय क्रीडा दिन आज देशभर साजरा होत आहे. या दिनाच्या औचित्यानं पुण्यात आज आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा या संकल्पनेवर आधारित विशेष टपाल पाकीटाचं प्रकाशन केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्र आणि गोवा टपाल परिमंडळाचे मुख्य पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाये यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती राहील. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्तानं होत असलेल्या या उपक्रमातून क्रीडा क्षेत्रातील योगदान आणि आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं महत्त्व अधोरेखित केले जाणार आहे.

****

राज्याच्या महिला आणि बालविकास विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली आहे. गेल्या चार वर्षांसाठीचे पुरस्कार काल जाहीर झाले. चंद्रपूर जिल्ह्यातील वनिता घुमे, बुलडाणा जिल्ह्यातील तारामती जायभाये, नंदुरबार जिल्ह्यातील वंदना तोरवणे आणि लातूर इथल्या सुजाता माने यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्याचबरोबर विभागस्तरीय २४ पुरस्कारांची घोषणाही काल करण्यात आली.

****

नेपाळ आणि तिबेटमधील पुरातील मृतांची संख्या ५७९ वर पोहोचली आहे, तर एक हजार ९२४ लोक अजूनही बेपत्ता आहेत. बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. चीनच्या नैऋत्य भागात पाच पूर्णांक एक तीव्रतेचा भूकंप झाल्यामुळे आणखी पूर येण्याची भीती निर्माण झाली आहे.या पार्श्वभूमीवर प्रशासनानं ८०० हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. भोटे कोसी नदी साखळीच्या उगमस्थानाजवळ जमा झालेल्या अडथळ्यांमुळे नव्यानं तयार झालेलं सरोवर आणि तिबेटच्या बाजूला असलेल्या धरणाला तडा गेल्याच्या शक्यतेमुळे पुराचा आणखी एक मोठा लोंढा येण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेल्यानंतर नेपाळमध्ये आलेल्या महापुरात बचावलेले २१ भाविक काल रात्री चेन्नईला सुखरुप पोहोचले. चेन्नई विमानतळावर या पर्यटकांनी कैलास मानसरोवर यात्रेदरम्यान घडलेल्या घटनांची माहिती दिली. चेन्नईला सुरक्षितपणे परतल्याबद्दल या भाविकांनी केंद्र आणि राज्य सरकारचे आभार मानले.

****

नाशिक कुंभमेळ्यात नोकर भरतीच्या नावाने फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कुंभमेळा कालावधीत आरोग्य विभागात महाभरती होणार असल्याचा बनाव रचून सामाजिक माध्यमांवर खोटी जाहिरात प्रसारित केल्याप्रकरणी 'हेलफोर्स फाऊंडेशन मल्टी सर्व्हिस' या संस्थेच्या अध्यक्षांसह तिघांवर नाशिकच्या पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेठ रोड परिसरात या संस्थेने भाड्याने कार्यालय सुरू केले होते.

****

क्रिकेट - छत्रपती संभाजीनगर जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे उद्या, रविवारी १४ वर्षांखालील गटातल्या खेळाडूंच्या निवड चाचणीची दुसरी फेरी होणार आहे. या चाचणीत ३०० खेळाडू सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे सचिव शिरीष बोराळकर यांनी दिली आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 01 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...