Sunday, 30 August 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.08.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 30 August 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० ऑगस्ट २०२६ दुपारी १.०० वा.

****

विकसित भारतासाठी अमली पदार्थ मुक्त युवा या देशभरात सुरु असलेल्या मोहिमेतून ‘अमली पदार्थमुक्त युवा पिढी आणि अमली पदार्थमुक्त भारत’ साध्य करण्याचं उद्दीष्ट आहे. या  मोहीमेत मोठ्या संख्येनं देशाची युवा पिढी सहभागी होत असून भारताच्या तरूणांच्या आरोग्य, आनंद आणि उज्जवल भविष्यासाठीचा हा सामूहिक संकल्प आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

आज पंतप्रधानांनी आकाशवाणीवरील 'मन की बात' या कार्यक्रमाच्या १३७व्या भागातून देश-विदेशातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

अंमली पदार्थाचं व्यसन केवळ त्या व्यक्तीलाच उद्ध्वस्त करत नाही तर त्या व्यक्तीचे संपूर्ण कुटुंब आणि समाजालाही त्याचे परिणाम भोगावे लागतात असं मोदी म्हणाले. अंमली पदार्थांविरुद्ध जनजागृती करणाऱ्या आणि व्यसनाशी झुंजणाऱ्या व्यक्तींना मदत करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांची त्यांनी प्रशंसा केली. अंमली पदार्थ-मुक्त भारतासाठी प्रभावी घोषवाक्य बनवण्याचं आवाहन त्यांनी केलं. ते म्हणाले...

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

याबाबत NashaMuktYuva हा हॅशटॅग वापरुन, समाज माध्यमावरुन याचा प्रसार करण्याचं आवाहन त्यांनी केलं.

भारताच्या स्वातंत्र्य दिना निमित्त ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम देशाच्या अभिमानाच्या   भावनेला अजून बळकट करते असं सांगून यातून आठ कोटींहून जास्त तिरंगा सेल्फी आपल्याला प्राप्त झाल्याचं ते म्हणाले. हा तिरंगा उत्सव भारतापुरता मर्यादित राहिला नसून, यावर्षी 'सूर्यपथ तिरंगा' उपक्रमाद्वारे फिजीमधील सुवा इथं सूर्याच्या पहिल्या किरणांसोबत तिरंगा फडकवण्यात आला. त्यानंतर आशिया, आफ्रिका आणि युरोपमधल्या भारतीय दूतावास आणि कार्यालयांमध्ये तो फडकवण्यात आला आणि अखेरीस तो अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोपर्यंत पोहोचला. अशाच प्रयत्नांमुळं समाज एकत्र येत असतो. तसंच, यामुळं देशाशी असलेलं आपलं नातंही अधिक दृढ होतं असं सांगून या प्रयत्नांमध्ये सहभागी झालेल्यांचं आपण अभिनंदन करत असल्याचं ते म्हणाले. शहरांपासून गावांतल्या रस्त्यांवर रोज सकाळ ते संध्याकाळ लाखो महिला विविध सामानाची विक्री करतात. अनेकदा, केवळ भांडवलाच्या अभावामुळं त्यांचा व्यवसाय भरभराटीला येत नव्हता, मात्र पीएम स्वनिधी योजना अशा लाखो महिलांना नवी शक्ती देत असल्याचं ते म्हणाले. पीएम स्वनिधी योजनेतल्या लाभार्थ्यांपैकी जवळपास ४६ टक्के महिला असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. देशातल्या ३५ लाख महिला यात सामील होवून व्यवसाय वाढवत असल्याचं सांगून, जेव्हा एखाद्या महिलेचा व्यवसाय वाढतो, तेव्हा तिच्या संपूर्ण कुटुंबाचं भविष्यही त्यासोबत प्रगती करतं. मुलांचं शिक्षण सुधारतं, घरातल्या गरजा पूर्ण होतात आणि महिलेचा आत्मविश्वास वाढतो. हे महिला सक्षमीकरणाचं एक जिवंत उदाहरण आहे. रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या सर्व भगिनींना मी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो असं ते म्हणाले. पंतप्रधानांनी, स्वच्छतेमध्ये एक मोठा सद्गुण असून जेव्हा एखाद्या ठिकाणचे लोक ते ठिकाण स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करतात, तेव्हा होणारा बदल केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित राहत नाही. तो त्या जागेची संपूर्ण ओळखच बदलून टाकतो- त्या ठिकाणाचं सौंदर्य अधिकच वाढतं, असं ते म्हणाले. देशाच्या विविध भागांत स्वच्छतेसाठीचे असे प्रयत्न आपल्याला सतत प्रेरणा देतात असही त्यांनी नमूद केलं. जेव्हा एखाद्या छंदाला कठोर परिश्रम आणि योग्य मार्गदर्शनाची जोड मिळते, तेव्हा तो नवीन संधींची दारं उघडू शकतो असही ते म्हणाले. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत जे एक छोटासा प्रयत्न सुरू करतात आणि अल्पावधीतच त्यांच्या प्रयत्नांमुळं अनेकांच्या जीवनात बदलाचा मार्ग मोकळा होतो असं सांगून यासंदर्भातील विविध दाखले मोदी यांनी बोलतांना दिले. निसर्गाच्या रक्षणातून जीवन समृद्ध होऊ शकते याबद्दलही त्यांनी उदाहरण दिलं. मुलींची स्वप्नं पृथ्वीवरून अवकाशात झेप घेत आहेत भारत जगभरातील अशा हजारो मुलींना एकत्र आणत असून याबाबतच्या 'मिशन शक्तीसॅट' उपक्रमातून १०८ देशांतील बारा हजार विद्यार्थिनींना उपग्रह तंत्रज्ञान शिकण्याची आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात प्रगती करण्याची संधी मिळत असल्याचं ते म्हणाले.

संपूर्णपणे विद्यार्थिनींच्या सहभागाने तयार केलेला एक उपग्रह चंद्राच्या कक्षेत पाठवण्याची तयारी सुरू आहे, असंही ते म्हणाले. आपले सण आणि उत्सव, आपल्या परंपरांसोबतच, आपल्याला एकमेकांशी जोडले जाण्याची संधीही देतात असं सांगून या सणासुदीच्या काळात, आपण पुन्हा एकदा स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचं आवाहन करू इच्छितो असं ते म्हणाले. भारताचा आत्मनिर्भर बनण्याचा मार्ग हा भारतीय वस्तूंच्या गर्वानं स्वीकार करण्यानंच विस्तारत जाईल असं सांगून इतरांनाही त्यासाठी प्रेरित करा. असंही पंतप्रधान मोदी यांनी मन की बातमध्ये नमूद केलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या उझबेकिस्तान दौऱ्यावर आज दुसऱ्या दिवशी उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शावकत मिर्झियोयेव्ह यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी उझबेकीस्तान योग संघटनेनं ताश्कंद इथं घेतलेल्या एका विशेष योगासन कार्यक्रमात सहभाग घेतला.

****

नेपाळमधील भीषण पुरातील मृतांची संख्या पावणेसातशेंवर पोहोचली असून  जवळपास अडीच हजार जण अजूनही बेपत्ता आहेत. यात २७५ हून अधिक भारतीय नागरिक आणि भारतीय वंशाचे १२८ लोक अजूनही बेपत्ता आहेत.

****

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं आणि हैदराबाद गॅझेटिअरची अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागण्यांसाठी अंतरवाली सराटी इथं पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 01 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...