Thursday, 20 August 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 20.08.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 20 August 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २० ऑगस्ट २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      राज्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत सरासरीच्या ९२ टक्के पाऊस

·      वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताची दोनच कडवी गाण्याचा काँग्रेस कार्यकारणीचा ठराव असंवैधानिक असल्याची मुख्यमंत्र्यांची टीका

·      आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

·      जलसंधारण दिनानिमित्त उद्या राज्यभरात ‘महा वॉकेथॉन - वॉक फॉर वॉटर’ उपक्रमाचं आयोजन

आणि

·      जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत महिला दुहेरीत भारताच्या त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

****

राज्यात यंदाच्या पावसाळ्यात एक जून ते २० ऑगस्ट दरम्यान सरासरीच्या ९२ टक्के इतका पाऊस झाला आहे. या कालावधीत ७२३ मिलीमीटर पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ६६५ पूर्णांक एक शतांश मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जुलैमध्ये राज्यात सरासरीच्या १३१ पूर्णांक पाच शतांश टक्के पाऊस झाला; मात्र ऑगस्टमध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे. एक ते २० ऑगस्टदरम्यान राज्यात १०४ पूर्णांक दोन शतांश मिलिमीटर पाऊस झाला असून, हे प्रमाण सरासरीच्या ५६ टक्के इतकं आहे. या कालावधीत छत्रपती संभाजीनगर विभागात ३० पूर्णांक सहा शतांश टक्के पावसाची नोंद झाली. एक जूनपासून कोकण विभागात सर्वाधिक पाऊस झाला असून, या विभागात सरासरीच्या १०३ पूर्णांक ५ टक्के पावसाची नोंद झाली. जुलैमध्ये झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यातल्या एकूण हंगामी पावसाची स्थिती समाधानकारक असल्याचं दिसून येत आहे.

****

वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताची दोनच कडवी गाण्याचा काँग्रेस कार्यकारणीचा ठराव असंवैधानिक असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. काँग्रेसचा निर्णय गुलामगिरीच्या मानसिकतेतून आल्याचं आणि हा संविधानाशी द्रोह असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. पुण्यात आयोजित ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सर्वच तरुणाईशी संवाद साधला असता तर चांगलं झालं असतं, मात्र केवळ पुणे परिसरातल्या काँग्रेस नेत्यांच्या शैक्षणिक संस्थामधल्या मुलींची नोंदणी कार्यक्रमात होत असल्याचं ते म्हणाले.

राज्यात आपलं सरकार असेपर्यंत लाडकी बहीण योजनेद्वारे पात्र लाभार्थ्यांना अनुदान मिळत राहील असं मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. या योजनेत प्राप्तिकर भरणाऱ्या कुटुंबातल्या महिलांनी तसंच सरकारी सेवेतल्या महिलांनी अर्ज केले होते, त्या अपात्र ठरल्या असून त्यांच्यावर कारवाई करावी लागेल असं ते म्हणाले.

****

राज्यातल्या आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल. यासाठी १७४ कोटी रुपयांहून अधिक निधीला सरकारनं मंजुरी दिली आहे.

****

प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या सहा फुटांपेक्षा उंच गणेशमूर्तींचं नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करायला मुंबई उच्च न्यायालयाने आज अंतरिम परवानगी दिली. मात्र, या प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवरचा निर्णय न्यायालयाने राखून ठेवला आहे. निर्णय जाहीर होईपर्यंत २४ जुलै २०२५ रोजी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल, असं न्यायालयाने स्पष्ट केलं. या आदेशानुसार, सहा फुटांपर्यंतच्या गणेशमूर्तींचं कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करणं बंधनकारक करण्यात आलं होतं, तर सहा फुटांवरच्या गणेशमूर्तींचं नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करायला परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे यंदा पीओपीच्या उंच गणेश मूर्तीचं विसर्जन नैसर्गिक स्रोतांमधे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

****

माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची जयंती राज्यभरात उद्या जलसंधारण दिन म्हणून साजरी करण्यात येणार आहे. मृद आणि जलसंधारणाबाबत जनजागृती करण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी उद्या ‘महा वॉकेथॉन - वॉक फॉर वॉटर’ हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. राज्यभरात सुरू असलेल्या जलसंधारण जनआंदोलनात सहभागी होऊन महाराष्ट्राचं जल-सुरक्षित भविष्य घडवावं तसंच ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हा संदेश सर्वत्र पसरवण्याचं आवाहन मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केलं आहे.

समाजामध्ये माती आणि जलसंवर्धनाचं महत्त्व रुजवण्यासह जलसंधारणाच्या उपक्रमांमध्ये लोकसहभाग वाढवण्याच्या उद्देशानं नांदेड शहरात उद्या दिंडी निघणार आहे.

या उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा जलसंधारण अधिकारी नरेंद्र कटके यांनी केलं आहे.

****

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती आज सद्भावना दिन म्हणून साजरी होत आहे. यानिमित्त देशभरात राजीव गांधी यांना अभिवादन करण्यात आलं.

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली. देशसेवा आणि सार्वजनिक जीवनात राजीव गांधी यांनी दिलेल्या योगदानाची आठवण राधाकृष्णन यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात करुन दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली.

राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी मुंबईत लोकभवनात राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. उपस्थित अधिकारी, कर्मचारी तसंच पोलिस अधिकारी आणि जवानांना त्यांनी यावेळी सद्भावना प्रतिज्ञा दिली.

****

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत महापौर कविता मुळे आणि मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मता आणि शांततेची शपथ देण्यात आली.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सद्भावना दिवसाची शपथ घेण्यात आली.

****

आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातली आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पैठण इथं १०० खाटांचं उपजिल्हा रुग्णालय आणि पाचोड इथं ५० खाटांचं ग्रामीण रुग्णालय उभारण्यासाठी विशेष बाब म्हणून प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. मंत्रालयात आज आमदार विलास भुमरे यांच्या उपस्थितीत यासंदर्भात बैठक झाली. पैठण हे दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं महत्त्वाचं तीर्थक्षेत्र असून, आगामी कुंभमेळ्यामुळे इथं भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे, त्या पार्श्वभूमीवर हे निर्देश देण्यात आले.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथल्या ४०० खाटांच्या महिला रुग्णालयाचं लवकरच लोकार्पण करण्याच्या दृष्टीनं मनुष्यबळ, उपकरणं आणि पायाभूत सुविधांची तयारी पूर्ण करण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या.

****

जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन - ग्रामीण, अंतर्गत कार्यरत कंत्राटी आणि बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांच्या समावेशनाचा प्रस्ताव मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे सादर करावा, असे निर्देश पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. मुंबईत आज यासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक असून, त्यांच्या समावेशनाबाबतचा प्रस्ताव मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालच्या समितीसमोर सादर करून त्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, असंही पाटील यांनी सांगितलं.

****

ज्येष्ठ मराठी साहित्यिक बी. रघुनाथ यांच्या पुण्यतिथीनिमित्त परभणीकर मित्र मंडळ आणि साहित्य संगीत कला मंचच्या वतीने बी. रघुनाथ स्मृती सोहळ्याचे आयोजन करण्यात येतं. यानिमित्त दिला जाणारा बी. रघुनाथ पुरस्कार नांदेडचे व्यंकटेश सोळंके यांच्या ‘अरसड’ कादंबरीला जाहीर झाला आहे. पुरस्कार निवड समितीच्यावतीने संयोजक श्रीकांत उमरीकर यांनी ही माहिती दिली. येत्या १३ सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगर इथं या पुरस्काराचं वितरण होणार आहे.

****

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया आणि नॅशनल बोर्ड फॉर क्वालिटी प्रमोशन यांच्या सहकार्यानं NABL मान्यता जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रयोगशाळा, उद्योग तसंच विविध संस्थांमध्ये NABL मान्यता प्रक्रियेबाबत आणि गुणवत्ता मानकांबाबत जनजागृती निर्माण करणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

****

नवी दिल्लीत सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत महिला दुहेरीत भारताच्या त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी शानदार कामगिरी करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आज झालेल्या सामन्यात त्यांनी जपानच्या जोडीचा २१-१६, २१-१२ असा पराभव केला.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातल्या लाडगाव रोडवरील एका दुकानात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं कारवाई केली. यात मसाले, चहा पावडर, कसुरी मेथी, मनुके तसंच खराब झालेले सुके खोबरे हे मुदतबाह्य अन्नपदार्थ जप्त करण्यात आले. या दुकानात अस्वच्छता, अन्नपदार्थ जमिनीवर ठेवणं आणि खाद्य तसंच अखाद्य वस्तू एकत्र साठवल्याचंही निदर्शनास आलं.

****

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड-तिरुपती मार्गावरील विशेष रेल्वेगाडीची सेवा सप्टेंबरमध्येही सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नांदेड-तिरुचानुर ही विशेष रेल्वे एक सप्टेंबरपासून दर मंगळवारी, तर तिरुचानुर-नांदेड विशेष रेल्वे दोन सप्टेंबरपासून दर बुधवारी धावणार आहे. सप्टेंबर महिन्यात या गाडीच्या दोन्ही दिशांनी प्रत्येकी पाच फेऱ्या होणार आहेत, ही गाडी तिच्या सध्याच्या वेळापत्रकानुसार आणि थांब्यांवरच धावेल, असं रेल्वे विभागाने कळवलं आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 01 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...