Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 17 August
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ ऑगस्ट २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
२०४७ पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी युवा, गरीब, महिला आणि
शेतकऱ्यांचं सक्षमीकरण गरजेचं-केंद्रीय मंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन
·
माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त
देशभरात आदरांजली
·
छत्रपती संभाजीनगर इथल्या शेंद्रा – बिडकीन ऑरिक औद्योगिक
वसाहतीसाठी दुसऱ्या टप्प्यात सात हजार एकर जमिनीचं भूसंपादन
·
पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त महादेव मंदिरांमध्ये भाविकांची
गर्दी, प्रशासनाकडून
उपाययोजना
आणि
·
भारत-श्रीलंका क्रिकेट कसोटीत दुसऱ्या दिवसअखेर भारताच्या
नऊ बाद ४६० धावा
****
२०४७ पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी युवा, गरीब, महिला आणि
शेतकऱ्यांचं सक्षमीकरण गरजेचं असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित
शहा यांनी केलं. राजस्थानात अलवर इथं जाहीर सभेत ते काल बोलत होते. राजस्थानातल्या
१७ जिल्ह्यांमधल्या सहा हजार ४५३ कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण
आणि पायाभरणी शहा यांच्या हस्ते झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातलं
सरकार सत्तेवर आल्यापासून शेतकऱ्यांना किमान हमी भाव वारंवार वाढवून दिले असल्याचं
त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या
विविध योजनांची माहितीही त्यांनी दिली. ग्रामीण अर्थव्यवस्थेत परिवर्तन घडवून आणण्याची
दुग्ध व्यवसायाची क्षमता शहा यांनी अधोरेखित केली.
****
माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त
काल देशभरात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. नवी दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी
सर्वधर्मीय प्रार्थना सभा झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन,
पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ
सिंह यांच्यासह प्रमुख नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली.
****
जून महिन्यात झालेल्या युजीसी नेट २०२६ परीक्षेतल्या इंग्लिश, कॉमर्स आणि समाजशास्त्र या तीन विषयांची
फेरपरीक्षा घेण्याचे निर्देश राष्ट्रीय परीक्षा संस्थेने दिले आहेत. इंग्लिश आणि कॉमर्सची
फेरपरीक्षा नऊ सप्टेंबरला, तर समाजशास्त्राची परीक्षा १० सप्टेंबरला
होणार आहे. या फेरपरीक्षेसाठी कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार नाही. या तीन विषयांच्या
प्रश्नपत्रिकांमध्ये विविध चुका असल्याच्या तक्रारी परिक्षा संस्थेकडे प्राप्त झाल्या
होत्या. त्यानंतर यासंदर्भात समिती स्थापन करून तपासणी करण्यात आली होती. इतर ८४ विषयांचा
निकाल नियोजित वेळापत्रकानुसारच जाहीर होणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या शेंद्रा, बिडकीन ऑरिक औद्योगिक वसाहतीसाठी दुसऱ्या
टप्प्यातली उर्वरित आठ हजार एकर भूसंपादनाच्या प्रक्रियेला सुरुवात होत आहे. या भूसंपादनासाठी
जायकवाडी प्रकल्पाचे उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास
अधिनियम अन्वये नोटीस जारी केली आहे. पैठण, संभाजीनगर तालुक्याच्या
सहा गावांमधल्या सात हजार ४३८ एकर जमिनीचं भूसंपादन केलं जाणार आहे. त्यात ८२५ गटांचा
समावेश आहे. याआधी २०१२ मध्येच या डीएमआयसीसाठी शेंद्रा आणि बिडकीन परिसरात १० हजार
एकर जागेचं भूसंपादन करण्यात आलं होते.
****
परभणी जिल्ह्यात उद्योगवाढीसाठी
पोषक वातावरण निर्माण करण्यास शासनाचं प्राधान्य असून, जिल्ह्यात
विविध उद्योगांच्या माध्यमातून एक हजार ६२२ कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक होणार
असल्याची माहिती, पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली. जिल्हा
उद्योग केंद्राच्या वतीने आयोजित परभणी गुंतवणूक परिषदेत त्या काल बोलत होत्या. या
परिषदेच्या माध्यमातून १६२ उद्योजकांसोबत सामंजस्य करार करण्यात आले असून, त्यातून १५ हजार ६१७ स्थानिकांसाठी रोजगार उपलब्ध होणार आहेत. येत्या दसऱ्यापर्यंत
या उद्योगांच्या इमारत बांधकामाची पायाभरणी करण्यात येईल, तसंच
या गुंतवणुकीतून स्थानिक उद्योजकांना चालना मिळेल, असं बोर्डीकर
म्हणाल्या. परभणीत महाराष्ट्रातला पहिला Integrated CBG Cluster उभारण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. यासोबतच परभणीत Waste-to-Wealth
आधारित विविध उद्योगांना प्रोत्साहन देऊन कचऱ्याचं ऊर्जा, रोजगार आणि संपत्तीत रूपांतर करण्यावर भर दिला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
राज्यातली आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी निधीची
कमतरता भासू दिली जाणार नाही, असं आश्वासन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिलं. सार्वजनिक
आरोग्य विभागाच्या महिला आरोग्य समिती, जन आरोग्य समिती आणि रुग्णकल्याण
समितीच्या सदस्यांशी आबिटकर यांनी ऑनलाइन पद्धतीने ‘जन आरोग्य संवाद’ साधला. राज्यात
उपलब्ध झालेल्या एक हजार ४४० डॉक्टरांची येत्या काही दिवसांत नियुक्ती करण्यात येणार
आहे. आणखी ६०० डॉक्टरांसाठी जाहिरात काढण्यात येत असून, सुमारे
२५० दंतचिकित्सकही लवकरच आरोग्य सेवेसाठी उपलब्ध होतील, अशी माहिती
आबिटकर यांनी दिली. या ऑनलाईन संवादात स्थानिक पातळीवरील अडचणी समजून घेऊन त्यावर तातडीने
उपाययोजना करण्यावर भर दिला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
धाराशिवमध्ये काल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
उपपरिसराचा २२ वा वर्धापन दिन विविध शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांनी साजरा झाला.
उपपरिसराच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा यावेळी घेण्यात
आला. यानिमित्त ‘जीवनसाधना पुरस्कार’ साहित्य क्षेत्रातल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल
ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांना, नांदेडच्या स्वामी
रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते
प्रदान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबत कौशल्य, नैतिक
मूल्ये, सामाजिक जाणीव आणि रोजगाराभिमुख क्षमता आत्मसात करणं
आवश्यक असल्याचं, कुलगुरु चासकर यांनी सांगितलं.
****
आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार असून, विविध महादेव मंदिरांमध्ये भाविकांनी
मध्यरात्रीपासून गर्दी केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरुळ इथल्या श्री घृष्णेश्वर
मंदिरात श्रावण सोमवारनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाने उपाययोजना केल्या
आहेत. आज रात्रीपर्यंत वेरुळमध्ये वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
परळी इथल्या वैद्यनाथ मंदिरात श्रावणमास उत्सव सुरु आहे.
श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांच्या सुविधांसाठी देवस्थानने आवश्यक ती तयारी केली आहे.
हिंगोली जिल्ह्यात औंढा इथलं नागनाथ मंदिर आज रात्री ११
वाजेपर्यंत खुलं राहणार आहे. महापूजेनंतर पहाटे दोन वाजता मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात
आलं. मंदिर पसिरात ३२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून,१०० हून अधिक पोलिस कर्मचारी, ३० स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत.
****
मुलींच्या सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या ‘लेक लाडकी’
योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहचावी यासाठी योजनेची प्रक्रिया अधिक सुलभ
करण्यात आली आहे. लाभार्थी मुलींच्या पालकांना आता ‘आपले सरकार’ पोर्टलद्वारे थेट ऑनलाइन
अर्ज करता येणार असून, अर्जासाठी
आवश्यक कागदपत्रांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
****
धाराशिव जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण)
अंतर्गत आवास प्लस सर्वे अंतर्गत २०२५ मध्ये मोबाईल ॲपद्वारे ग्रामीण भागात करण्यात
आलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे पात्र कुटुंबांची यादी तयार करण्यात आली आहे. १३ सप्टेंबर
पर्यंत आयोजित करण्यात येणाऱ्या ग्रामसभांमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या यादीचं वाचन
करण्यात येणार आहे. सर्व ग्रामस्थांनी संबंधित ग्रामसभांना उपस्थित राहून पात्र लाभार्थ्यांच्या
यादीची पडताळणी करावी आणि आवश्यक माहिती ग्रामपंचायतीकडे उपलब्ध करून द्यावी, असं आवाहन जिल्हा परिषदेकडून करण्यात
आलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधल्या
शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद शिक्षण विभागाने बायोमेट्रिक उपस्थिती
आणि सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक केले आहेत. नियमांचं पालन न करणाऱ्या शाळांबाबत प्रशासनाकडून
योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचं माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी अश्विनी
लाठकर यांनी सांगितलं.
****
बीडमधल्या पिंपळगाव घाट ते पांढरेवाडी या मार्गावरील रस्ता
तातडीनं तयार करून वाहतुकीसाठी खुला करावा, या मागणीसाठी पिंपळगाव घाट इथं ग्रामस्थांनी
शनिवारपासून बेमुदत उपोषण सुरु आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे विद्यार्थी,
रुग्ण, शेतकरी तसंच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या
त्रासाला सामोरं जावं लागत असून, प्रशासनानं तातडीनं दखल घेण्याची
मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
****
भारत आणि श्रीलंका यांच्यात श्रीलंकेत सुरु असलेल्या पहिल्या
कसोटी क्रिकेट सामन्याच्या कालच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताने नऊ गडी गमावून ४६० धावा
केल्या आहेत. पावसाच्या व्यत्ययामुळे कालचा खेळ काहीसा उशिरा सुरू झाला. पहिल्या दिवशी
१३१ धावांवर नाबाद असलेल्या देवदत्त पडिक्कलने शानदार फलंदाजी करत १६७ धावांची खेळी
केली. सध्या कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा नाबाद असून, तिसऱ्या दिवशी भारताचा डाव पुढे नेतील.
****
येत्या दोन दिवसांत कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी,
तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाउस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त
केली आहे. या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता
आहे.
****
No comments:
Post a Comment