Sunday, 30 August 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.08.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 30 August 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० ऑगस्ट २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      पंतप्रधान नरेंद्र मोदी उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर; आज राष्ट्राध्यक्ष शावकत मिर्झियोयेव्ह यांच्याशी द्विपक्षीय चर्चा

·      पंतप्रधान आज मन की बात मधून देशवासियांशी संवाद साधणार

·      महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कायद्यात सुधारणा; जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधल्या स्विकृत सदस्य निवडीचा मार्ग मोकळा

·      एव्हरेस्ट आणि एल जी या कंपन्यांच्या कंपाऊंडेड हिंगावर अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाकडून बंदी

·      राष्ट्रीय क्रीडा दिन विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा

आणि

·      मराठा आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला सुरुवात

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर असून, काल ते ताश्कंद इथं पोहोचले. उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शावकत मिर्झियोयेव्ह यांनी पंतप्रधान मोदी यांचं स्वागत केलं. ताश्कंदमधल्या यांगी पार्क इथं पंतप्रधानांनी पुष्पांजली अर्पण केली. हे पार्क शांतता, समृद्धी आणि स्वातंत्र्याचं प्रतीक मानलं जातं. आज पंतप्रधान मोदी उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शावकत मिर्झियोयेव्ह यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, डिजिटल संपर्क, ऊर्जा, शिक्षण आणि दोन्ही देशांच्या नागरीकांदरम्यान संपर्क वाढवणं, आदी मुद्यांवर या बैठकीत चर्चा होईल.

**

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ११ वाजता आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा १३७ वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनचं संपूर्ण नेटवर्क, न्यूज ऑन एआयआर वेबसाइट आणि मोबाइल ॲपवर प्रसारित केला जाईल.

****

राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधल्या स्विकृत सदस्य निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे आता फेब्रुवारी २०२६ मध्ये निवडणूक झालेल्या राज्यातल्या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांमध्ये स्विकृत सदस्यांची निवड केली जाणार आहे. यासाठी ग्रामविकास विभागाने महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कायद्यात सुधारणा केली असून, याबाबतची अधिसूचना राजपत्रात प्रकाशित करण्यात आली आहे. यानुसार जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमधल्या एकूण सदस्यांच्या किमान दहा टक्के किंवा सर्व जिल्हा परिषदांमध्ये प्रत्येकी किमान पाच आणि पंचायत समित्यांमध्ये किमान एका स्विकृत सदस्यांची नियुक्ती केली जाणार असल्याचं ग्रामविकास विभागातून सांगण्यात आलं आहे.

****

राज्यात तीन ठिकाणी उपोषण करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या सरकारनं मान्य केल्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केली. यासंदर्भात काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. आदिवासी समुदायातल्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकऱ्या देणं आणि आदिवासी आश्रमशाळांची परिस्थिती सुधारणं आदी मागण्या सरकारनं मान्य केल्या. गडचिरोली जिल्ह्यातल्या आदिवासी आश्रमशाळेत तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्यानंतर पुणे, नागपूर आणि नाशिक या तीन ठिकाणी विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केलं होतं.

****

अतिरिक्त संतृप्त मेद, अतिरिक्त साखर तसंच मिठाचं प्रमाण जास्त असलेल्या खादोत्पादनांच्या पाकिटाच्या दर्शनी भागावर लाल रंगात ठळक स्वरुपात इशारा लावण्याचा प्रस्ताव आपण मांडला असल्याचं भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण - FSSAI ने म्हटलं आहे. यासंदर्भात प्राधिकरणानं सर्वोच्च न्यायालयात अनुपालनविषयक प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. अशा पोषक घटकांचं जास्त प्रमाण असलेल्या खाद्योत्पादनांबद्दल ग्राहकांना सोप्या, ठळक आणि सहज समजू शकेल अशा भाषेत इशारा देता येणं हा या प्रस्तावाचा मुख्य उद्देश असल्याचं प्राधिकरणानं आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. याअंतर्गत ग्राहकांना अशी खाद्योत्पादनं सहज ओळखता यावीत यासाठी गरजेनुसार हाय फॅट, हाय शुगर, हाय सॉल्ट, किंवा हायली स्वीटन्ड बेव्हरेज असे ठळक शब्दांमध्ये दिसणारे इशारे या लेबलवर असतील असंही प्राधिकरणाने म्हटलं आहे.

**

दरम्यान, FSSAI नं एव्हरेस्ट आणि एल जी या कंपन्यांच्या कंपाऊंडेड हिंगावर बंदी आणली आहे. यासंदर्भात मिळालेल्या एका तक्रारीनंतर प्राधिकरणानं सर्व प्रमुख कंपन्यांच्या हिंग उप्तादनांची प्रयोगशाळेत चाचणी केली. त्यात या दोन्ही कंपन्यांची हिंग निकृष्ट दर्जाची आढळून आल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे. दुकानांमध्ये विक्री साठी ठेवलेली निकृष्ट दर्जाची उत्पादनं बाजारातून स्वतःहून परत घ्यावीत असा सल्ला देखील प्राधिकरणानं या कंपन्यांना दिला आहे.

****

राष्ट्रीय क्रीडा दिन काल विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. देशाचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा करण्यात येतो. यानिमित्त तंदुरुस्ती, शिस्त, सांघिक आणि उत्कृष्ट कामगिरी या क्रीडा क्षेत्रातल्या मूल्यांना प्रोत्साहन दिले जातं.

नवी दिल्लीत मेजर ध्यानचंद स्टेडियम परिसरातल्या मेजर ध्यानचंद यांच्या पुतळ्याला केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविय यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. ‘फिट इंडिया’ अभियानांतर्गत प्रत्येकाने दररोज किमान एक तास क्रीडांगणावर घालवण्याचा संकल्प करावा, असं आवाहन त्यांनी केलं.

बाईट - केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविय

**

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातल्या क्रीडा आणि शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीनं राष्ट्रीय क्रीडा दिनाचं औचित्य साधून मुला-मुलींची सहा किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतल्या खेळाडूंनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मुलांच्या गटात गंगाखेड इथला प्रतीक पवार यानं तर मुलींच्या गटात लातूर इथल्या पुष्पा राठोड हिनं प्रथम क्रमांक मिळवला.

****

मराठा आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथं कालपासून पुन्हा उपोषणाला सुरुवात केली. माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला आढळलेल्या कुणबी नोंदींनुसार प्रमाणपत्रे देण्यात यावीत, रद्द केलेली प्रमाणपत्रे पुन्हा वितरित करावीत, हैदराबाद गॅझेटियरनुसार कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करावं तसंच रद्द केलेली प्रमाणपत्रे तातडीने वितरित करावीत, सातारा आणि कोल्हापूर संस्थानच्या गॅझेटियरनुसार कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करावं यासह अन्य मागण्या त्यांनी केल्या आहेत. अंतरवाली सराटी इथं मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही जरांगे यांनी दिला. उपोषणस्थळी मराठा समाजबांधवांची मोठी गर्दी असून, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याचं आमच्या वार्ताहराने कळवलं आहे.

**

दरम्यान, इतर मागासवर्ग ओबीसींच्या आरक्षणाच्या संरक्षणाच्या लढाईसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी १ सप्टेंबर रोजी मुंबईच्या दिशेने मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. नवी मुंबईत वाशी इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातल्या पाटस टोलनाक्यावरून मुंबईच्या दिशेने ही संघर्ष यात्रा सुरू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

धाराशिव इथल्या कैलासवासी भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कार्यरत असलेले किरण झरकर यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. गेल्या १७ वर्षांपासून शिल्प निदेशक म्हणून कार्यरत असलेले झरकर यांनी कौशल्य विकास, व्यवसाय प्रशिक्षण, प्रशिक्षणार्थी कल्याण, संशोधन, तंत्रज्ञान, साहित्य आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल केंद्र शासनाने घेतली आहे. याबद्दल आकाशवाणीशी बोलताना ते म्हणाले,

बाईट - किरण झरकर

****

पावसानं ओढ दिल्यानं मराठवाड्यात झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे करावेत आणि पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहीलं आहे. मराठवाड्यातल्या काही भागांत गेल्या ४५ दिवसांपासून अत्यल्प पाऊस झाला आहे. पाणीटंचाईमुळे सोयाबीनचं पीक वाळून गेलं असून, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत असल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. नुकसानीचा योग्य अंदाज घेण्यासाठी महसूल आणि कृषी विभागाच्या माध्यमातून पंचनामे करण्याची गरजही त्यांनी या पत्रातून व्यक्त केली आहे.

****

बीड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रेशीम कोष खरेदी केंद्रात झालेल्या लिलावात रेशीम कोषाला तब्बल ९३ हजार रुपये प्रतिक्विंटल असा विक्रमी भाव मिळाला आहे. आजपर्यंतचा हा सर्वोच्च दर ठरल्याने रेशीम उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे.

****

जालना शहरातली अनधिकृत बांधकामं आणि अतक्रिमणांविरोधात महानगरपालिकेने मोहीम तीव्र केली आहे. काल जुन्या जालन्यातल्या भाग्यनगर उड्डाणपुलाखाली असलेली १९ अनधिकृत अतक्रिमणं महापालिका पथकाने हटवली.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 01 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...