Saturday, 8 August 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 08.08.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 08 August 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०८ ऑगस्ट २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      हातमाग क्षेत्र भारताची असामान्य विविधता दर्शवतं असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन 

·      पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा पहिला हप्ता बँकखात्यात जमा

·      जालना जिल्ह्यात बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी अवघ्या ५७ दिवसांत निकाल

·      बीड जिल्ह्यात दोन कोटी रुपयांचा खाद्यतेल साठा जप्त-चार आस्थापनांचे परवाने निलंबित

आणि

·      मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यांना दोन दिवस पावसाचा यलो अलर्ट

****

हातमाग क्षेत्र भारताची असामान्य विविधता दर्शवतं असं प्रतिपादन राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांनी केलं आहे. बाराव्या राष्ट्रीय हातमाग दिना निमित्त काल केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे राष्ट्रपती भवनात घेण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात राष्ट्रपती बोलत होत्या. वीणकरांना त्यांच्या कष्टाचा मोबदला थेट प्राप्त होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं, राष्ट्रपतींनी सांगितलं. त्या म्हणाल्या....

बाईट - राष्ट्रपती दौपदी मुर्मू

या कार्यक्रमात देशभरातल्या तीन वीणकरांना संत कबीर हातमाग पुरस्कार आणि १९ कारागिरांना राष्ट्रीय हातमाग पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तसंच चार विशेष टपाल तिकिटांचं अनावरण करण्यात आलं.

७ ऑगस्ट १९०५ रोजी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग म्हणून स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली. त्याची आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा केला जातो.

नागरिकांनी हातमागावरील किमान एक तरी उत्पादन खरेदी करावं आणि त्याचा व्हिडीओ तयार करुन तो प्रसारित करावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त केलं आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथं केंद्रीय वस्‍त्रोद्योग मंत्रालय आणि आणि मुंबईच्या बुनकर सेवा केंद्रातर्फे राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करण्यात आला.

****

नीट परीक्षा मुद्द्यावरून विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज कालही बाधित झालं.

दरम्यान, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास सुधारणा विधेयक, लोकसभेनं काल मंजूर केलं.

लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी 'भारत छोडो' आंदोलनातल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. राज्यसभेतही 'भारत छोडो' आंदोलनातल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. उद्या नऊ ऑगस्ट रोजी भारत छोडो आंदोलनाला ८४ वर्षे पूर्ण होत आहेत.

****

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने अंतर्गत एकूण सहा लाख २२ हजार २०७ शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार २९ कोटी रुपयांचा पहिला हप्ता काल जमा करण्यात आला, मुंबईत कर्जमाफी योजनेच्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना ही माहिती दिली. ते म्हणाले.. 

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात कर्जमाफीची रक्कम आणि दुसऱ्या टप्प्यात प्रोत्साहन पर रक्कम जमा केली जाणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. आधार प्रमाणीकरण झालेल्या खात्यांमध्ये या योजनेचे पैसे जमा करण्यास सुरूवात झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३ लाख ५ हजार ५४० शेतकऱ्यांना काल २३१ कोटी १५ लाख रुपये कर्जमाफीचा पहिला हप्ता म्हणून जमा झाले. र्इ - केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांचा यात समावेश असल्याचं छत्रपती संभाजीनगर सहकारी संस्थेचे उपनिबंधक समृत जाधव यांनी सांगितलं आहे.

 

धाराशिव जिल्ह्यातील १२ हजार २२४ पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर १०५ कोटी ८६ लाख ५४ हजार ७०४ रुपये जमा करण्यात आले. त्यामुळे या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा दिलासा मिळाला असून, आगामी खरीप हंगामासाठी नव्या पीक कर्जाचा मार्गही मोकळा झाला आहे.

 

नांदेड जिल्ह्यात ३७ हजार ४७१ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप बाकी असून १४ हजार १५६ शेतकऱ्यांकडे अॅग्रीस्टॅक क्रमांक नसल्याचं निदर्शनास आले आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

****

पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी भारतात होणार आहे. मुंबई इथं ब्रिक्स वेव्हज बझारच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत काल ही घोषणा करण्यात आली. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदुम यांनी ही माहिती दिली. या दोन दिवसीय वेव्हज ब्रिक्स बझार उपक्रमाचा काल समारोप झाला. 

****

मराठवाड्याची 'मागास' प्रतिमा बदलून विकासाचं नवं पर्व सुरू करण्यासाठी प्रत्येक विभागाने जबाबदारी आणि एकात्मतेने कार्य करणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी केलं आहे. विकसित महाराष्ट्र कृती आराखडा 2030 अंमलबजावणी अंतर्गत "विकसित मराठवाडा" संकल्पना राबवण्याबाबत काल छत्रपती संभाजीनगर इथं स्मार्ट सिटी कार्यालयात सर्व प्रादेशिक विभाग प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. प्रत्येक विभागाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी "वॉर रूम" तयार करण्यात येणार असून त्या माध्यमातून प्रलंबित तथा प्राध्यान्याच्या विषयांचे निराकरण केलं जाणार असल्याचं, यावेळी सांगण्यात आलं.

****

जालना इथल्या विशेष जिल्हा आणि सत्र न्यायालयाने बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या आरोपीला अवघ्या ५७ दिवसांत आजन्म कारावास आणि ५० हजार रुपये दंड ठोठावला आहे. जिल्हा आणि विशेष सत्र न्यायाधीश कृपेश विजय मोरे यांनी हा निकाल दिला. 'मनोधैर्य' योजनेअंतर्गत पीडित बालिकेला तीन लाख रुपये अतिरिक्त भरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. १० जून रोजी ही घटना घडली होती. नसरापूर प्रकरणापेक्षाही कमी कालावधीत हा निकाल लागल्याने जिल्ह्यातला हा सर्वात जलदगतीने निकाली निघालेला खटला ठरला आहे.

****

खाद्यतेलाचं रिपॅकिंग तसंच साठवणूक नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी बीड जिल्ह्यात चार आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, सुमारे दोन कोटी रुपयांचा खाद्यतेल साठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये बीड शहरातील दोन ऑईल रिपॅकिंग युनिट, वडवणी इथली एक आस्थापना तसंच माजलगाव इथल्या एका गोदामाचा समावेश आहे. या कारवाईत तब्बल १ कोटी ९३ लाख रुपये किमतीचा १ लाख १८ हजार ९४० किलोहून अधिक खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे.

****

धाराशिव जिल्ह्यात ‘हरित धाराशिव अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात दहा लाख वृक्षलागवड करण्यात येणार आहे. शासनाच्या ३३ हेक्टर क्षेत्रात येत्या १४ ऑगस्ट रोजी अवघ्या १२ तासांत १० लाख वृक्षांची घन-वन पद्धतीने लागवड करून जागतिक विक्रम प्रस्थापित करण्याचा निर्धार जिल्हा प्रशासनाने केला आहे.

****

लातूर जिल्ह्यातल्या चाकूर इथं पाच उपविभागांमधील पोलीस पाटील यांचा महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. लातूर, निलंगा, उदगीर, औसा-रेणापूर आणि अहमदपूर या पाच उपविभागांतील पोलीस पाटील यांचा यात समावेश आहे.

****

जालना जिल्ह्यातल्या अंबड इथल्या उपकृषी अधीक्षक विश्वनाथ गावित याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल सतरा हजार ५०० रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडलं. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत ठिबक सिंचनची मोका तपासणी करून अहवाल सादर करण्यासाठी गावित याने या लाचेची मागणी केली होती.

****

संत शिरोमणी रोहिदास महाराजांच्या साडेसहाशेव्या जयंतीनिमित्त वाराणसी इथून निघालेली कलश यात्रा काल छत्रपती संभाजीनगर इथं पोहोचली. देशभरात आयोजित समरसता संकल्प अभियानांतर्गत  भारतीय जनता पक्षातर्फे याचं आयोजन करण्यात आलं. काल सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात कलशाचं पुजन करुन विविध जिल्ह्यांकडे ही यात्रा रवाना झाली. येत्या फेब्रुवारी २०२७ पर्यंत देशभरात ही यात्रा मार्गक्रमण करणार आहे.

****

दक्षिण कोरियात आसान इथं सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताच्या रक्षिता रामराज तसंच अस्मिता चलिहा या दोघींमध्ये उपांत्य फेरीचा एक सामना होणार आहे.  पुरुष दुहेरीत कृष्णप्रसाद गर्ग आणि पृथ्वी रॉय यांचं आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आलं.

****

पैठणच्या जायकवाडी धरणातून सहा हजार २२८ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणात सध्या १० हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक सुरू असून, पाणी साठा ९३ टक्क्यांवर स्थिर आहे.

**

दरम्यान, हवामान विभागाने मराठवाड्यात सगळ्या जिल्ह्यांत पुढचे तीन दिवस जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. जालना, परभणी, हिंगोली, नांदेड तसंच लातूर जिल्ह्यांना आज तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर तसंच धाराशिव जिल्ह्यांना उद्या पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

****

 

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 01 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...