Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 13 August
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ ऑगस्ट २०२६ सकाळी ७.१० मि.
****
· एफसीआरए विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा लोकसभेचा निर्णय
· नीट पेपरफुटी आंदोलनाबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांचं आज लोकसभेत निवेदन
· राज्यातल्या सेवाभरतींसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीबाबत उच्चस्तरीय समिती स्थापन
· हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत देशभक्तीपर कार्यक्रमांचं आयोजन
आणि
· राज्यातल्या धरणांमध्ये सध्या सरासरी ७२ टक्के तर छत्रपती संभाजीनगर विभागात ४९
टक्के उपयुक्त पाणीसाठा
****
'परदेशी अंशदान सुधारणा
– एफसीआरए २०२६' हे विधेयक लोकसभेनं पुढील छाननीसाठी काल संयुक्त
संसदीय समितीकडे पाठवलं. या समितीत लोकसभेच्या २१ आणि राज्यसभेच्या १० सदस्यांचा समावेश
असेल. ही समिती हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याच्या अखेरीस आपला अहवाल सभागृहास
सादर करेल. 'परदेशी योगदान कायदा, २०१०'
मध्ये आणखी सुधारणा तसंच परदेशी योगदानाचा वापर अधिक पारदर्शक आणि जबाबदारीपूर्वक
करणं हा या विधेयकाचा
उद्देश आहे.
**
'राष्ट्रीय सहकारी
विकास महामंडळ विधेयक, २०२६' काल राज्यसभेने
संमत केलं. लोकसभेनं हे विधेयक यापूर्वीच मंजूर केलं आहे. या विधेयकाचा उद्देश 'राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ कायदा, १९६२'
मध्ये आणखी सुधारणा करणं, हा असून या विधेयकामुळे महामंडळाला औद्योगिक उत्पादनांशी
संबंधित कामकाज करण्याची मुभा मिळेल. सहकारी विकासाच्या कार्यात गुंतलेल्या कोणत्याही
संस्थेला महामंडळाकडून निधी उपलब्ध करून देण्याची तरतूदही या विधेयकात करण्यात आली असून, महामंडळ थेट
कोणत्याही सहकारी संस्थेला किंवा सहकारी विकासाच्या कार्यात गुंतलेल्या घटकाला कर्ज
आणि अनुदान देऊ शकते.
****
नीट पेपरफुटी आंदोलनाबाबत
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज दुपारी तीन वाजता लोकसभेत निवेदन करणार आहेत. शहा यांनी
संसद भवन परिसरात वार्ताहरांना ही माहिती दिली. ते म्हणाले…
बाईट - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमाराचे, कथित गोळ्या
झाडण्याचे आदेश कुणी दिले, असा प्रश्न लोकसभेतले विरोधी पक्षनेते
राहुल गांधी यांनी पुन्हा उपस्थित केला. जर अमित शहा यांनी हे आदेश दिले असतील,
तर ते अन्यायकारक असून त्याकरता त्यांनी राजीनामा द्यावा, आणि जर गृहमंत्र्यांच्या आदेशाविना पोलीसबळाचा वापर झाला असेल, तर अकार्यक्षमतेच्या कारणावरुन शहा यांनी राजीनामा द्यावा, या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला.
****
राज्यात विविध सेवा भरतींसाठी
होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक, अधिक सुरक्षित आणि सर्वसंमतीने सुधारणांसाठी
एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात येत आहे. यासंदर्भात काल झालेल्या विशेष बैठकीत मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला. ही उच्चस्तरीय समिती राज्यात प्रत्येक महसुली
विभागात जाऊन शिक्षण संस्थाचालक आणि संबंधित घटकांशी तसंच विद्यार्थ्यांशी संवाद साधेल,
आणि त्यांची मतं जाणून घेतल्यानंतर सर्वंकष सुधारणांबाबत अहवाल सादर
करेल. केंद्र सरकारने पेपरफुटी आणि परीक्षा गैरव्यवहारासंदर्भात नुकताच केलेला कायदा
अधिक कठोर असल्याने तो महाराष्ट्रातही लागू करण्यासंदर्भात येणाऱ्या पंधरवड्यात प्रक्रिया
पूर्ण करण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
****
राज्यातल्या शहरी भागांचा
सुनियोजित विकास व्हावा, यासाठी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या
विविध १० नगरपंचायतींच्या विकास आराखड्यांना मंजुरी दिली आहे. यामुळे या नगरपरिषदांच्या
सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्यातल्या सोयगाव, लातूर जिल्ह्यातल्या शिरूर अनंतपाळ आणि
रेणापूर, परभणी जिल्ह्यातल्या पालम आणि बीड या नगरपंचायतींचा
समावेश आहे.
****
राज्यात ज्या शेतकऱ्यांची
नावे सातबारा उताऱ्यावर नाहीत, अशा सर्व शेतकऱ्यांची अधिकृत नोंदणी करण्याचा
महत्त्वपूर्ण निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी
काल ही माहिती दिली. या निर्णयामुळे दोन लाख ३१ हजार शेतकऱ्यांना 'ॲग्रीस्टॅक' मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असून,
त्यांना कर्जमाफीसह विविध शासकीय योजनांचा थेट लाभ मिळणार आहे.
**
दरम्यान, नागरिकांना
अधिक पारदर्शक, कालबद्ध आणि पूर्णतः डिजिटल स्वरूपात सेवा देण्यासाठी
नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या सेवांमध्ये शासन प्रक्रिया पुनर्रचना राबवण्याची घोषणाही
बावनकुळे यांनी केली. या विभागांच्या पूर्वीच्या १५ सेवांचं सुसूत्रीकरण करून त्यांची
संख्या आता १० करण्यात आली आहे. ज्या सेवांसाठी कायद्याने प्रतिज्ञापत्र अनिवार्य नाही,
तिथे स्वयंघोषणापत्र स्वीकारण्यात येणार आहे.
****
हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत
राज्यात सर्वत्र विविध देशभक्तीपर उपक्रम राबवण्यात येत आहेत.
छत्रपती संभाजीनगर इथल्या
सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतर्फे काल तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीत संस्थेच्या
शाळांचं बॅण्ड पथक आणि एनसीसी कॅडेट्स सहभागी झाले होते. महापौर समीर राजूरकर यांनी
या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला.
बीड शहरातून काल तिरंगा रॅली
काढण्यात आली. भाजपा युवा नेते डॉ. योगेश क्षीरसागर आणि डॉ. सारिका क्षीरसागर यांच्या
प्रमुख मार्गदर्शनाखाली निघालेल्या या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
परभणी शहर महानगरपालिकेच्या
वतीने तिरंगा रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. महापौर सय्यद इकबाल यांच्या हस्ते या स्पर्धेचं
उद्घाटन झालं. या स्पर्धेत शालेय तसंच खुल्या गटातल्या स्पर्धकांनी भारतीय संस्कृती
आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयांवर आकर्षक आणि संदेशपूर्ण रांगोळ्या साकारल्या.
हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत
धाराशिव इथं आज सायकल आणि ई-बाईक रॅली काढण्यात येणार आहे.
**
युवकांसह आबालवृद्धांनी देशभक्ती, देशप्रेमाची
भावना तेवत राहण्यासाठी हर घर तिरंगा या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगर
इथले व्यावसायिक व्यंकटेश कमळू यांनी केलं आहे. ते म्हणाले,
बाईट - व्यंकटेश कमळू
****
अनुसुचित जातीच्या उपवर्गीकरण
विरोधात छत्रपती संभाजीनगर इथं काल आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला. रिपब्लिकन सेनेचे
प्रमुख आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात आंबेडकरवादी विविध
पक्षाचे नेते आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
****
नांदेडच्या स्वामी रामानंद
तीर्थ मराठवाडा विद्यापीठात काल, महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायदा,
१९९९ च्या अनुषंगाने ‘रॅगिंग प्रतिबंध आणि पोक्सो’ या विषयावर कायदेविषयक
मार्गदर्शन शिबिर घेण्यात आलं. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर तसंच प्र-कुलगुरू
डॉ. अशोक महाजन यावेळी उपस्थित होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद देशपांडे
यांनी विद्यार्थ्यांना रॅगिंगचे दुष्परिणाम, कायदेशीर कारवाई
आणि विद्यार्थ्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत मार्गदर्शन केलं.
**
दरम्यान, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या
शैक्षणिक वर्ष २०२६ - २७ साठी पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठीची अंतिम मुदत २० ऑगस्ट पर्यंत
वाढवण्यात आली आहे.
****
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात लातूर जिल्ह्यातल्या २२ हजार ९६३
पात्र शेतकऱ्यांसाठी १५९ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. पात्र शेतकऱ्यांच्या
कर्जखात्यावर ही रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू असून, उर्वरित पात्र
लाभार्थ्यांचा निधीही लवकरच प्राप्त होणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी
संस्था व्ही. एल. पोतंगले यांनी दिली.
****
हिंगोली इथं काल वसंतराव नाईक
शेती स्वावलंबन मिशनची जिल्हास्तरीय आढावा बैठक मिशनचे अध्यक्ष निलेश हेलोंडे पाटील
यांच्या उपस्थितीत झाली. जिल्ह्यातल्या प्रत्येक आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या
घरी भेट देऊन त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, तसंच पात्र कुटुंबांना आवश्यक त्या योजनांचा
लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश दिले.
****
धाराशिव जिल्ह्यात वार्षिक
योजनेतून नागरी परिक्षेत्रात भटक्या-मोकाट कुत्र्यांसाठी निवारा तयार करणं तसंच पाळीव-मोकाट
प्राण्यांसाठी अंत्यविधी केंद्र उभारण्याच्या कामास पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी
परवानगी दिली आहे. यासाठी २३
कोटी १४ लाख ५८ हजार रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
****
राज्यातल्या धरणांमध्ये सध्या
सरासरी ७२ पूर्णांक १८ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातल्या
सर्व प्रकल्पांमध्ये सुमारे २९ हजार ४४२ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.
सध्या छत्रपती संभाजीनगर विभागात
४९ टक्के, पुणे विभागात ८६ टक्के, कोकण ८७ टक्के,
नाशिक ७५ टक्के, अमरावती ५९ टक्के, तर नागपूर विभागात ५८ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागातल्या
जायकवाडी धरणात ९३ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे, धरणाच्या उजव्या कालव्यातून चौदाशे तर
डाव्या कालव्यातून सोळाशे असं एकूण दोन हजार नऊशे घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडण्यात
येत आहे. धरणात सध्या चार हजार १८७ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक सुरू आहे.
**
हवामान
राज्यात आज कोकण तसंच विदर्भातल्या
काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात लातूर तसंच नांदेड
जिल्ह्यात जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
****
No comments:
Post a Comment