Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 23
August 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ ऑगस्ट २०२६ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रीय अंतराळ दिवस आज
साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैज्ञानिकांह सर्व
देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी नवी दिल्लीत ‘सेवा तीर्थ’ इथं वीस अंतराळ नवोन्मेषी
उद्योग अर्थात स्टार्टअप्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ आणि संस्थापकांशी संवाद
साधला.
नव्या जागतिक व्यवस्थेत भारत
निरंतर आपल्या अंतराळ क्षेत्राचा विस्तार करत असून नव्या पिढीतील अभियंते, संगणक माहिती
तंत्रज्ञ आणि वैज्ञानिक नविन तंत्रज्ञान विकसित करत असल्याबद्दल पंतप्रधानांनी गौरवौद्गार
काढले. ते म्हणाले..
बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी
भारताच्या २०४७ मध्ये विकसीत
राष्ट्र बनण्याच्या संकल्पामध्ये अंतराळ क्षेत्र महत्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचं
पंतप्रधानांनी यानिमित्त नमुद केलं आहे.
****
तिस-या राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त
आज गुजरातच्या अहमदाबाद इथं केंद्रीय संस्कृती
आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम झाला.
अंतराळ क्षेत्रातल्या सुधारणांमुळं नवोद्योग - स्टार्टअप आणि उद्योग जगतासाठी नव्या
संधी उपलब्ध झाल्यानं,अंतराळ तंत्रज्ञान भारताला ४५ अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यात
महत्वपूर्ण भूमिका निभावणार असल्याचं शेखावत यांनी यावेळी नमूद केलं.
****
दूरचित्रवाणी वाहिन्यांसाठी
बारा मिनिटांच्या जाहीरात अवधीची मर्यादा आता केंद्र सरकारनं हटवली आहे. निकोप आणि
तुल्यबळ स्पर्धेला वाव आणि उद्योगस्नेही वातावरणाच्या दृष्टीनं असं करण्यात आलं. केबल
टेलिव्हिजन नेटवर्क्स नियम १९९४ मधील सुधारणेची अधिसूचना, राजपत्रात प्रसिद्ध झाल्यामुळे
हा निर्णय अंमलात आला आहे.
****
राज्यात शिक्षण व्यवस्थेत
परिवर्तनासाठी शिक्षण विभाग करत असलेलं चांगलं काम प्रत्येक शाळेपर्यंत आणि विद्यार्थ्यापर्यंत
पोहोचवण्यासाठी सतर्कपणे अभियान राबवावं असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
दिले आहेत. शिंदे यांनी काल मुंबईत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंसह शिक्षण विभागातील
वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन शिक्षण क्षेत्राचा सविस्तर आढावा घेतला. शाळांचं आधुनिकीकरण, शिक्षक सक्षमीकरण
आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याचे आदेश
शिंदे यांनी यावेळी दिले. आपल्या मुलांच्या आकांक्षा बदलत आहेत, त्यांची स्वप्ने
बदलत आहेत. त्यानुसार आपल्या शाळाही बदलल्या पाहिजेत. महाराष्ट्रातील प्रत्येक मुलाला
भविष्यातील संधी आणि आव्हानांसाठी तयार करणारी आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि भविष्यवेधी
शिक्षणव्यवस्था आपण निर्माण केली पाहिजे अशी अपेक्षा उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त
केली. विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, पोषण, मध्यान्ह भोजन
योजना, विद्यार्थ्यांच्या मानसिक - भावनिक स्वास्थ्यासाठी आवश्यक उपक्रम यांना अधिक महत्त्व
देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. या अनुषंगानं आमदार-खासदारांसह, खासगी क्षेत्राचं
व्यावसायिक सहकार्य घेणार असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
****
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री
गिरिराज सिंह यांनी काल मुंबईत राष्ट्रीय फॅशन
तंत्रज्ञान संस्था निफ्टला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना
रोजगारनिर्मिती, परकीय चलनवाढ आणि निर्यातीला चालना देण्यासाठी योगदान देण्याचं आवाहन केलं.
****
भारतानं श्रीलंकेविरुद्धच्या
दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात कोलंबो इथं आज पहिल्या दिवशी २९ षटकांत दोन बाद ९८
धावा केल्या आहेत. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी पत्करली. सलामीवीर यशस्वी
जैस्वाल ४५ तर के. एल. राहूल १८ धावांवर बाद झाले. उपाहाराला खेळ थांबला तेंव्हा भारताच्या
दोन बाद ८८ धावा होत्या. या सामन्यासाठी भारतानं कुलदीप यादवऐवजी ३३ वर्षीय अष्टपैलू
फिरकी गोलंदाज सारांश जैन याला प्रथमच संधी दिली आहे. दोन सामन्यांच्या या मालिकेत
पहिला सामना भारतानं जिंकला आहे.
****
महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत
आज भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होत आहे. उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारताला
हा सामना अनिवार्य असणार आहे. स्पर्धेत ई गटातील हा सामना नेदरलँडच्या ॲमस्टलव्हीन
इथं भारतीय वेळेनुसारा रात्री साडे दहा वाजता खेळला जाईल.
****
परभणी जिल्ह्याच्या पूर्णा
तालुक्यात नैसर्गिक शेती प्रोत्साहनासाठी विविध गावांमध्ये एकाच वेळी जीवामृत पोषणाबद्द्ल काल प्रात्यक्षिकं
सादर करण्यात आली. राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान आणि परभणीचा आत्मा विभाग यांच्यातर्फे
कातनेश्वर, माटेगाव, खांबेगावसह अनेक गावात जीवामृत प्रात्यक्षिकं देण्यात आली. एकात्मिक पद्धतीनं प्रत्येक
गावात दोन हजार लिटर जीवामृत तयार करण्यात येणार आहे.
****
No comments:
Post a Comment