Wednesday, 12 August 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 12.08.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 12 August 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १२ ऑगस्ट २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी देशातलं आघाडीचं आणि सर्वाधिक पसंतीचं ठिकाण बनवण्याचा राज्य शासनाचा निर्धार

·      भूसंपादन मोबदल्यास विलंब झाल्यास वाढीव दराने व्याज देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

·      न्यायाधिकरण सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी

·      परभणी तसंच जालना इथं तिरंगा यात्रेत नागरीकांचा उत्स्फुर्त सहभाग

आणि

·      मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यात आज जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता 

****

महाराष्ट्राला जीसीसी अर्थात जागतिक क्षमता केंद्रांसाठी देशातलं आघाडीचं आणि सर्वाधिक पसंतीचं ठिकाण बनवण्याचा राज्य शासनाचा निर्धार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुण्यात काल आयोजित जीसीसी प्रोज नेतृत्व शिखर परिषदेत ते बोलत होते. राज्यात ४०० नवीन जागतिक क्षमता केंद्रे,  चार लाख उच्च कौशल्याधारित रोजगाराच्या संधी आणि ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचं महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या शहरांमध्येही जागतिक क्षमतेची विशेषीकृत केंद्रे विकसित करण्याची क्षमता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात केवळ एका शहरात गुंतवणूक करण्याची संधी नसून, विविध शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या प्रतिभा, कौशल्य आणि औद्योगिक क्षमतांचा एकत्रित लाभ घेण्याची संधी असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्रात केवळ एक चांगले शहर नाही,  तर शहरांचे, प्रतिभेचे आणि क्षमतांचे संपूर्ण जाळे उपलब्ध असल्याचं त्यांनी नमूद केलं.

****

राज्यात भूसंपादन, पुनर्वसन किंवा पुनर्स्थापनेसाठीचा मोबदला देण्यात विलंब झाला, तर भूधारकांना त्यावरच्या व्याजाचा दर वाढवून देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. हा दर रेपो दरापेक्षा एक टक्के जास्त असेल.

राज्यात नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी जमीन खरेदीच्या व्यवहारांवर हस्तांतरण शुल्कात २५ टक्के सवलत देण्याचा निर्णयही कालच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र संबंधित जमिनीचा वापर अन्य कारणांसाठी वापरली गेल्यास हस्तांतरण शुल्काची रक्कम व्याजासह वसून करण्यात येणार आहे. नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पासाठी स्थापन झालेल्या कंपन्यांमध्ये अंतर्गत जमीन हस्तांतरण झाल्यास त्या व्यवहारावर मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे.

राज्यातल्या महाविद्यालयांमधे वेगळी समाजकार्य विद्याशाखा, नवीन अभ्यासक्रम आणि अतिरिक्त तुकडी विना अनुदान तत्वावर सुरु करणं, तसंच कृषीविभागात संचालक आणि सहसंचालक मिळून चार नवीन पदनिर्मिती करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. नांदेड जिल्ह्यात हदगाव इथं जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय तसंच सरकारी वकीलांचं कार्यालय सुरु करणं, आणि लातूर जिल्ह्यातल्या नीळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्यास भांडवली खर्च तसंच खेळत्या भांडवलासाठी कर्ज घेण्यास मंजुरी देण्याचा निर्णयही कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

****

राज्यभरातल्या ५०० पेक्षा जास्त आश्रमशाळांचं त्रयस्थ संस्थेकडून लेखापरिक्षण करुन घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी आश्रम शाळेत सर्पदंशामुळे तीन मुलींचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे निर्देश दिले. याप्रश्नी एक बैठक बोलावून आश्रमशाळांसाठी एक सर्वंकष तपासणी यंत्रणा स्थापन करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिल्या. दरम्यान, गडचिरोलीतल्या संबंधित शाळेचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात आला आहे. या शाळेची अलिकडेच तपासणी करुन त्रुटी असतानाही अनुकूल अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

****

एसटी महामंडळाच्या जागांचा सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या माध्यमातून विकास करताना त्या ठिकाणी उभारण्यात येणारी नवीन बसस्थानके आणि इतर वास्तू केवळ आधुनिक सुविधांनी युक्त न राहता ‘आयकॉनिक’ आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या असाव्यात असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. काल मुंबईत याबाबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. प्रवाशांना अत्याधुनिक, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा देतानाच एसटी महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या मालमत्तांचा योग्य आणि नियोजनबद्ध वापर करावा, असंही शिंदे यांनी सांगितलं.

****

'न्यायाधिकरण सुधारणा विधेयक' काल संसदेत मंजूर झालं. लोकसभेत संमत झालेल्या या विधेयकाला काल राज्यसभेने मंजुरी दिली. विविध न्यायाधिकरणांचे अध्यक्ष आणि सदस्य यांची पात्रता तसंच नियुक्ती, प्रशासन आणि कामकाज याबाबत एकसूत्रता सुनिश्चित करणे हा या विधेयकाचा उद्देश आहे. 'राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोगा'च्या स्थापनेबाबतही या विधेयकात तरतूद आहे.

दरम्यान, लोकसभेत काल राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ सुधारणा विधेयक आणि केरळचं नाव बदलून केरलम् करण्यासाठीचं विधेयक चर्चेविना मंजूर झालं. त्यामुळे चालू अधिवेशनात सदनात चर्चेविना मंजूर झालेल्या विधेयकांची संख्या आता नऊ झाली आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महामार्ग सुरक्षा बळकटीकरणासाठी जिल्हा कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी याबाबतचे आदेश जारी केले. या कृती दलामार्फत महामार्गांवरील अतिक्रमणे हटवणे, अनधिकृत पार्किंगला आळा घालणे, धोकादायक रस्त्यांवर आवश्यक उपाययोजना, रस्ते आणि पथदिव्यांची सुधारणा, आपत्कालीन वैद्यकीय सेवा सक्षम करणे तसेच महामार्ग सुरक्षेबाबत शून्य सहिष्णुता धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

****

हर घर तिरंगा मोहिमेत विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काल तिरंगा यात्रा काढण्यात आली. काही दिव्यांग नागरिकही दुचाकींसह या यात्रेत सहभागी झाले होते. प्रत्येक नागरिकाने हातात तिरंगा घेतल्यावर देशाप्रती आपलं कर्तव्य लक्षात ठेवावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.

परभणी इथं काल तिरंगा दुचाकी फेरी काढण्यात आली. जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण आणि जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी या फेरीत वाहने चालवून सहभागी होत देशभक्तीचा संदेश दिला.

जालना जिल्ह्यात मंठा इथं काल आमदार बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीत नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात तिरंगा घेऊन सहभागी झालेल्या नागरिकांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. उपस्थितांना यावेळी व्यसनमुक्तीची शपथही देण्यात आली.

****

येत्या १७ तारखेपर्यंत चालणाऱ्या या उपक्रमांमध्ये विद्यार्थी तसंच नागरिकांनी सक्रीय सहभाग घेण्याचं आवाहन राष्ट्रीय छात्र सेना एनसीसीचे छत्रपती संभाजीनगर इथले अधिकारी कॅप्ट्न गजानन सानप यांनी केलं आहे.

बाईट- कॅप्ट्न गजानन सानप

 

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथं, राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने आज सकाळी तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे.

****

नांदेड जिल्ह्यात नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीतील ४४ उमेदवारांना तीन वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात आलं आहे. या उमेदवारांनी निवडणूकीत केलेल्या खर्चाचा हिशोब विहीत मुदतीत संबंधित कार्यालयाकडे सादर न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. यात हिमायतनगर नगरपरिषदेतल्या १४, किनवट सात, उमरी तसंच धर्माबाद प्रत्येकी सहा, कंधार पाच, मुखेड तीन, भोकर दोन, आणि लोहा नगरपरिषदेतल्या एका उमेदवाराचा समावेश आहे.

****

लातूर इथं काल वंचित बहुजन आघाडीची कार्यकर्ता संवाद बैठक पार पडली. पक्षाचे प्रमुख मार्गदर्शक सुजात आंबेडकर यावेळी उपस्थित होते. आगामी काळातील राजकीय वाटचाल, तसंच संघटनात्मक विस्तार आदी मुद्यांवर या बैठकीत चर्चा झाली.

****

छत्रपती संभाजीनगर इथं विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या २६ पोलिस अधिकारी तसंच अंमलदारांवर दंडात्मक कारवाई करत २६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी सर्व पोलिस अधिकारी आणि अंमलदारांना दुचाकी वापरताना सक्तीने हेल्मेट वापरण्याचे आदेश दिले आहेत.

****

लातूर इथल्या नवीन अद्ययावत आधार सेवा केंद्राचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्तेवाड यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं. नागरिकांना जलद, सोयीस्कर आणि पारदर्शक आधार सेवा मिळावी यासाठी हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रामध्ये नवीन नोंदणी, ५ ते १७ वयोगटातील मुलांसाठी मोफत बायोमेट्रिक अपडेट, डेमोग्राफिक दुरुस्ती आणि घटनास्थळीच तक्रार निवारणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

****

महाराष्ट्राच्या प्रगत उत्पादन विकासाला चालना देण्याची क्षमता छत्रपती संभाजीनगरमध्ये असल्याचं, भारतीय उद्योग महासंघ-सीआयआयचे पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष मिलन नाग यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं काल झालेल्या माध्यम संवाद बैठकीत ते बोलत होते. जागतिक उत्पादन क्षेत्रात छत्रपती संभाजीनगरला अधिक मोठी भूमिका बजावण्याची संधी असल्याचं, नाग यांनी नमूद केलं.

****

हवामान

राज्यात पुणे तसंच सातारा जिल्ह्यातल्या घाटमाथा परिसराला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यात आज जोरदार वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठणच्या जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यातून तेराशे, तर डाव्या कालव्यातून अकराशे घनफूट असे एकूण दोन हजार चारशे घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. धरणात सध्या सुमारे चार हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक सुरू असून, धरणाचा पाणीसाठा सुमारे ९३ टक्क्यांवर स्थिर आहे. धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 01 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...