Saturday, 22 August 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 22.08.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 22 August 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ ऑगस्ट २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      साखरेचे वाढते दर आणि साठेबाजीवर नियंत्रणासाठी केंद्र सरकारकडून नियमावली जारी

·      न्यायिक सेवा परीक्षेच्या अर्हतेत वकिली व्यवसायाची अट सर्वोच्च न्यायालयाकडून शिथिल

·      राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर-केजच्या कविता गित्तेंसह महाराष्ट्रातल्या ३ शिक्षकांचा समावेश 

·      मृद आणि जलसंधारण जनजागृतीसाठीच्या महावॉकेथॉनला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

·      जिगिषा नाट्यमहोत्सवाला छत्रपती संभाजीनगर इथं प्रारंभ

आणि

·      बी डब्‍ल्यू एफ अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद जोडीची उपांत्य फेरीत धडक

****

साखरेचे वाढते दर आणि साठेबाजीवर नियंत्रणासाठी केंद्र सरकारने नियमावली जारी केली आहे.  देशभरातील साखर व्यापाऱ्यांवर येत्या ३० नोव्हेंबरपर्यत ४०० टनांची साठा मर्यादा लागू करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात साखर वापरणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या १५ दिवसांच्या वापरापेक्षा अधिक साखरेचा साठा ठेवण्यास येत्या एक सप्टेंबरनंतर परवानगी दिली जाणार नाही. दरम्यान, देशांतर्गत साखरेची उपलब्धता वाढवण्यासाठी १० एलएमटी कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी देण्यात आली आहे. तसंच साखर कारखान्यांना येत्या १५ ऑक्टोबरपासून गाळप सुरू करण्याचा सल्ला सरकारने दिला आहे. यामुळे ऑक्टोबर महिन्यातील साखरेचे उत्पादन नेहमीच्या तीन ते चार एलएमटी वरून १० एलएमटीपेक्षा अधिक होण्याची अपेक्षा आहे. साखरेच्या दरवाढीला इथेनॉल उत्पादनासाठी साखरेचा वापर कारणीभूत असल्याचा दावा, चुकीचा असून, ग्राहक आणि ऊस उत्पादक शेतकरी या दोघांच्याही हितांचे संरक्षण करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

****

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 'मोबाईल फोन उत्पादन योजना' MPMS ला कालपासून प्रारंभ केला. केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या महिन्यात ६२ हजार ५०० कोटी रुपयांच्या तरतुदीसह या योजनेला मंजुरी दिली आहे. १ एप्रिल २०२६ पासून लागू झालेली ही योजना २०२६-२७ ते २०३०-३१ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी कार्यरत असेल. मोबाईल उत्पादनाची पुरवठा साखळी बळकट करणं, देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवून जागतिक स्पर्धात्मकता उंचावणं, मोबाईल फोन उत्पादनाला प्रोत्साहन देणं आणि भारतीय मोबाईल फोन ब्रँड्सना आधार देणं, हा या योजनेचा उद्देश आहे.

****

पुणे इथं सुरू असलेल्या पाच दिवसीय ब्रिक्स देशांच्या दूरसंवाद मंत्र्यांच्या बैठकीचा केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत काल समारोप झाला. 'डिजिटल इंडिया'च्या संकल्पनेवर आधारित दृष्टीकोन ठेऊन त्याद्वारे लवचिक, विश्वासार्ह, आणि सर्वसमावेशक भविष्य घडवण्याचं उद्दिष्ट असल्याचं शिंदे यांनी यावेळी सांगितले.

****

न्यायिक सेवा परीक्षा देण्याच्या अर्हतेत किमान तीन वर्षं वकिली व्यवसायाची अट सर्वोच्च न्यायालयाने शिथिल केली आहे. आता फक्त एक वर्ष वकिली व्यवसाय केलेले उमेदवार ही परीक्षा देऊ शकतील, मात्र त्यांना न्यायिक अकादमीत प्रशिक्षण पूर्ण करून एक वर्ष सहाय्यक म्हणून काम करावं लागेल. हा नियम १ एप्रिल २०२७ नंतर जारी होणाऱ्या अधिसूचनेतल्या परीक्षांना लागू होईल. त्यापूर्वीची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना पूर्वानुभवाची अट घातली जाणार नाही. त्यांना एका वर्षासाठी प्रशिक्षणार्थी न्यायिक अधिकारी म्हणून नेमणूक दिली जाईल. आणि नंतर एक वर्षभर न्यायालय सहाय्यक पदावर काम करावं लागणार आहे.

****

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार काल जाहीर झाले. महाराष्ट्रातल्या ३ शिक्षकांचा यात समावेश आहे. बीड जिल्ह्यातल्या केजच्या साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या शिक्षिका डॉक्टर कविता गित्ते, नाशिक महानगरपालिकेच्या शाळेतल्या शिक्षिका कुंदा बच्छाव आणि साताऱ्याच्या सैनिकी शाळेतले शिक्षक शिवप्रसाद टिंगरे यांना यंदा या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. येत्या ५ सप्टेंबर रोजी शिक्षकदिनी हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

****

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत नियमित शुल्कासह अर्ज भरता येणार आहे. त्यानंतर विलंब शुल्कासह १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत अर्ज स्वीकारले जातील.

****

माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची जयंती काल जलसंधारण दिन म्हणून साजरी करण्यात आली. मृद आणि जलसंधारणाबाबत जनजागृती करण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी राबवण्यात आलेल्या ‘महा वॉकेथॉन - वॉक फॉर वॉटर’ या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी मृद आणि जलसंधारणाची शपथ घेत, या अभियानात सक्रीय योगदानाचा संकल्प केला.

मुंबईत वरळी इथे झालेल्या राज्यस्तरीय ‘महा वॉकेथॉन: वॉक फॉर वॉटर २०२६’ या उपक्रमाला मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. युवकांनी या जलसंधारणाच्या चळवळीला बळ द्यावं, असं आवाहनही मंत्री राठोड यांनी केलं.

छत्रपती संभाजीनगर इथे क्रांती चौक ते महात्मा फुले पुतळा या दरम्यान निघालेल्या या जनजागृती पदयात्रेत शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला.

जालना शहरात काढण्यात आलेल्या 'महा वॉकेथॉन' ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हाधिकारी कार्यालयापासून पोलीस मैदानापर्यंत निघालेल्या या वॉकेथॉनमध्ये विविध शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत, पाणी बचत आणि जलसंवर्धनाबाबत जनजागृती केली.

परभणी इथं ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हा संदेश देत ‘महा-वॉकेथॉन - वॉक फॉर वॉटर’ पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत चित्ररथाच्या माध्यमातूनही जलसंधारणाबाबत जनजागृती करण्यात आली. प्रत्येक नागरिकाने आपल्या माती आणि जलसंवर्धनासाठी योगदान देण्याचं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांनी यावेळी केलं. त्या म्हणाल्या...

बाईट -  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर

हिंगोली इथं जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी वॉकेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. या महा-वॉकेथॉनमध्ये मुली, महिला अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले.

बीड इथं जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी हिरवा झेंडा दाखवून महा वॉकेथॉनला सुरूवात केली. या पदयात्रेत सहभागी झालेले विद्यार्थी, शासकीय अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांनी माती-पाणी संवर्धनाचा संदेश दिला.

नांदेड इथल्या शासकीय तंत्रनिकेतन मैदानावर काल जलसंधारण दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त तीन किलोमीटर पर्यंत महावॉकेथॉन काढण्यात आली. मृद आणि जलसंधारण विभागाच्या विविध कामाच्या चित्रांचं प्रदर्शन यावेळी भरवण्यात आलं.

लातूर इथं जिल्हा परिषद ते नवीन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या पदयात्रेत जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्यासह महाविद्यालयीन विद्यार्थी, खेळाडू, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसह सर्व वयोगटांतील नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ असा संदेश देत जलसंधारणासाठी जनजागृती करण्यात आली.

धाराशिव इथे तुळजाभवानी क्रीडा संकुलावर जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदा म्हाड-दळकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून वॉकॅथॉनला सुरुवात करण्यात झाली. सहभागी नागरिकांनी जलसंधारण, पाणी बचत आणि माती संवर्धनाचा संदेश देत उत्साहाने ही वॉकॅथॉन पूर्ण केली.

****

नाटकाने जगण्याचं भान दिलं, अशी भावना, ज्येष्ठ अभिनेत्री रत्ना पाठक शाह यांनी व्यक्त केली आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा गांधी मिशन विद्यापीठात जिगिषा नाट्यसहवास महोत्सवाचं उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या. महात्मा गांधी मिशन आणि मराठवाडा आर्ट अँड फिल्म फाउंडेशन यांच्या वतीने दिला जाणार मिलिंद सफई पुरस्कार अभिनेते योगेश शिरसाट यांना रत्ना पाठक यांच्या हस्ते काल प्रदान करण्यात आला. हॅनाची सुटकेस हा नाट्यप्रयोग काल सादर झाला. आज या महोत्सवात रत्ना पाठक यांची प्रकट मुलाखत, सवाल जवाब हा नाट्यप्रयोग आणि साहित्य ते नाटक-माध्यम रुपांतर या विषयावर परिसंवाद होणार आहे.

****

परभणी शहर वाहतूक शाखेनं केलेल्या विविध कारवायांदरम्यान २८ दुचाकी वाहनं ताब्यात घेतली. संबंधितांनी वाहनांच्या मालकी हक्काची कागदपत्रं आणि आवश्यक पुरावे घेऊन १२ सप्टेंबर पर्यंत शहर वाहतूक कार्यालयात उपस्थित राहण्याचं आवाहन वाहतूक शाखेतर्फे करण्यात आलं आहे.

****

विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी काल लातूर इथं जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेत, निवेदनं स्वीकारली. या निवेदनांवर तातडीने कार्यवाही करून, त्याची माहिती अर्जदारांसह विभागीय आयुक्त कार्यालयाला सादर करावी, असे निर्देश जी. श्रीकांत यांनी दिले.

****

छत्रपती संभाजीनगर इथं काल एकाच कुटुंबातील तिघांचा डोंगरावरुन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. कुणाल चांदवडे हा युवक नैराश्याच्या भरात डोंगरावरून उडी मारुन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असताना त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याचे वडील डोंगरावरून खाली पडले. त्यापाठोपाठ आईनेही डोंगरावरुन उडी मारल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

बॅडमिंटन जागतिक महासंघाच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आज उपांत्य फेरीच्या सामन्यात त्यांची चीनी जोडीसोबत लढत होणार आहे

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 01 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...