Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 21 August
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ ऑगस्ट २०२६ सकाळी ७.१० मि.
****
· पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय सचिवांची बैठक- सरकारी विभाग, विद्यापीठं आणि तरुण यांच्यात
अधिक समन्वय साधण्याचं आवाहन
·
आगामी सणासुदीच्या काळात साखरेचा पुरवठा नियमित ठेवण्याकरता केंद्र सरकारकडून साखरेच्या
देशांतर्गत साठ्यावर निर्बंध लागू
·
राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी घालण्याचा अन्न आणि औषध प्रशासनाचा
निर्णय
आणि
·
मृद आणि जलसंधारणाबाबत जनजागृती करण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी आज महा वॉकेथॉनचं
आयोजन
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय सचिवांसोबत उच्चस्तरीय
बैठक घेतली. या बैठकीत देशाच्या पायाभूत सुविधा, संपर्क व्यवस्था, सुरक्षा, परराष्ट्र धोरण आणि सुशासन यासंबंधीच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात
आली. सरकारी विभाग, विद्यापीठं आणि तरुण यांच्यात अधिक समन्वय साधण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी
केलं. जटिल आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आणि देशाचं भविष्य घडवण्यासाठी अधिक समन्वय, नाविन्यपूर्ण विचार आणि सामूहिक
जबाबदारीच्या गरजेचा त्यांनी पुनरुच्चार केला.
****
आगामी सणासुदीच्या काळात साखरेचा पुरवठा नियमित ठेवण्याकरता केंद्र सरकारनं साखरेच्या
देशांतर्गत साठ्यावर निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार १० टनांची मासिक उलाढाल करणाऱ्यांना
आता १५ दिवस पुरेल त्यापेक्षा जास्त साखरेचा साठा करता येणार नाही. येत्या एक सप्टेंबरपासून
३० नोव्हेंबरपर्यंत हा आदेश लागू राहील.
****
राज्यात यंदाच्या पावसाळ्यात एक जून ते २० ऑगस्ट दरम्यान सरासरीच्या ९२ टक्के इतका
पाऊस झाला आहे. या कालावधीत ७२३ मिलीमीटर पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात
६६५ पूर्णांक एक शतांश मिलीमीटर पावसाची नोंद झाली. एक ते २० ऑगस्टदरम्यान राज्यात
१०४ पूर्णांक दोन शतांश मिलीमीटर पाऊस झाला असून, हे प्रमाण सरासरीच्या ५६ टक्के इतकं आहे. या कालावधीत
छत्रपती संभाजीनगर विभागात ३० पूर्णांक सहा शतांश टक्के पावसाची नोंद झाली. जुलैमध्ये
झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यातल्या एकूण हंगामी पावसाची स्थिती समाधानकारक
असल्याचं दिसून येत आहे.
****
राज्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई सुरू असून, सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर
पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे
यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गेल्या वर्षी खाद्यतेलाचे सुमारे
एक हजार २४७ नमुने तपासण्यात आले होते, त्यापैकी एक हजार १४२ नमुने मानकांनुसार आढळले, तर ७७ नमुने निकृष्ट दर्जाचे, १३ नमुने असुरक्षित आणि १५
नमुने चुकीच्या पद्धतीने लेबल केलेले असल्याचं निष्पन्न झालं. या निष्कर्षांच्या पार्श्वभूमीवर
विभागाने कारवाईत वाढ केली असून, सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरची बंदी हे सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यतेल नागरिकांना
उपलब्ध करून देण्याच्या दिशेने टाकलेलं महत्त्वाचं पाऊल असल्याचं मुंढे यांनी सांगितलं.
नियमांचं उल्लंघन करणाऱ्या उत्पादक आणि विक्रेत्यांवर कारावासासह १० लाख रुपयांपर्यंत
दंडाची कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. सुटं किंवा सीलबंद नसलेलं खाद्यतेल असुरक्षित असून, त्यात भेसळ आढळल्यानं ग्राहकांनी
ते खरेदी करू नये, असं आवाहन त्यांनी केलं. या आदेशामागचा उद्देश स्पष्ट करताना मुंढे म्हणाले:
बाईट – अन्न आणि
औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे
****
राज्यातल्या आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर देण्याचा निर्णय राज्य
सरकारनं घेतला आहे. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यासारख्या स्थानिक
स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल. यासाठी
१७४ कोटी रुपयांहून अधिक निधीला सरकारनं मंजुरी दिली आहे.
****
माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची जयंती आज जलसंधारण दिन म्हणून साजरी होत
आहे. मृद आणि जलसंधारणाबाबत जनजागृती करण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी आज ‘महा वॉकेथॉन
- वॉक फॉर वॉटर’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. राज्यभरात सुरू असलेल्या जलसंधारण जनआंदोलनात
सहभागी होऊन महाराष्ट्राच्या जल-सुरक्षित भविष्य घडवावं तसंच 'पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा' हा संदेश सर्वत्र पसरवण्याचं
आवाहन मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केलं.
छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांती चौक ते औरंगपुरा इथल्या जिल्हा परिषद मैदापर्यंत
वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे.
समाजामध्ये माती आणि जलसंवर्धनाचं महत्त्व रुजवण्यासह जलसंधारणाच्या उपक्रमांमध्ये
लोकसहभाग वाढवण्याच्या उद्देशानं नांदेड शहरात आज दींडी निघणार आहे.
धाराशिव इथं तुळजाभवानी स्टेडियम येथून वॉकेथॉनला सुरुवात होत आहे. ‘पाण्यासाठी पाऊल’ या संकल्पनेवर आधारित
या मोहिमेत सहभागी होऊन पर्यावरण रक्षणाची शपथ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
जालना इथं जिल्हाधिकारी कार्यालयापासून वॉकॅथॉनला सुरुवात होईल. घाटी-अंबड चौफुली
मार्गे पोलीस मैदान परिसरात या उपक्रमाची सांगता होईल.
परभणीत जिल्हाधिकारी कार्यालय ते क्रीडा संकुलापर्यंत आयोजित या वॉकेथॉनचं उद्घाटन
पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते होणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद इथं प्रसिद्ध हजरत ख्वाजा शेख मुंतजबोद्दीन उर्फ
जर जरी बक्ष यांच्या ७४० व्या उरुसास काल संदल मिरवणुकीने सुरुवात झाली. २६ ऑगस्ट रोजी
ईद-ए-मिलाद च्या दिवशी या उर्सची सांगता होईल. यादिवशी मोहम्मद पैगंबर यांच्या पवित्र
पोशाखाचं आणि केसांचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक खुलताबाद इथं येतात.
****
जालना इथं ऊसतोड हंगामी स्थलांतराचा परिणाम झालेल्या मुलांसाठी राबवण्यात येणाऱ्या
युनिसेफच्या 'कुटुंब आणि समुदायआधारित काळजी
आणि संरक्षण' उपक्रमाला युनिसेफ इंडियाचे
राष्ट्रीय राजदूत तथा अभिनेते आयुष्मान खुराना यांनी नुकतीच भेट दिली. ऊसतोडीसाठी होणाऱ्या
हंगामी स्थलांतरामुळे मुलांचं शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षितता प्रभावित होऊ नये, यासाठी समाज आणि प्रशासनाने
एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.
****
आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातली आरोग्य व्यवस्था
अधिक सक्षम करण्यासाठी पैठण इथं १०० खाटांचं उपजिल्हा रुग्णालय आणि पाचोड इथं ५० खाटांचं
ग्रामीण रुग्णालय उभारण्यासाठी विशेष बाब म्हणून प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश आरोग्य मंत्री
प्रकाश आबिटकर यांनी दिले. मंत्रालयात काल आमदार विलास भुमरे यांच्या उपस्थितीत यासंदर्भात
बैठक झाली.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथल्या
४०० खाटांच्या महिला रुग्णालयाचं लवकरच लोकार्पण करण्याच्या दृष्टीनं मनुष्यबळ, उपकरणं आणि पायाभूत सुविधांची
तयारी पूर्ण करण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या.
****
छत्रपती संभाजीनगरमध्ये काल राज्यस्तरीय आकाशवाणी श्रोता संमेलन पार पडलं. राज्याच्या
विविध भागांतून जमलेल्या श्रोत्यांशी आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी सुजीत बनसोडे यांनी
संवाद साधला तसंच आकाशवाणीच्या कार्यक्रमांविषयी श्रोत्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.
नियमितपणे अशा प्रकारच्या संमेलनाचं आयोजन करावं अशी भावना आकाशवाणी तसंच श्रोता संघाकडून
व्यक्त करण्यात आली.
****
सरकारी शाळांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत
दिपके यांनी काल लातूर जिल्ह्यातल्या विविध जिल्हा परिषद आणि महानगरपालिका शाळांची
पाहणी केली. औसा तालुक्यातल्या उजनी, एकम्बी, चिंचोली काजळे, यासह लातूर शहरात लेबर कॉलनी परिसरातल्या महानगरपालिका शाळेला त्यांनी भेट दिली.
शाळेतल्या पायाभूत सुविधा, स्वच्छतागृह, पिण्याचं पाणी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत त्यांनी माहिती घेतली. सरकारी
शाळांची परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षण विभागातले अधिकारी आणि प्रशासनाने गांभीर्याने
काम करण्याची गरज असल्याचं सांगत, शिक्षणमंत्र्यांनी शाळांची अवस्था पाहून राजीनामा द्यावा, अशी मागणीही दिपके यांनी केली.
****
सायबर गुन्हेगारीचं प्रमाण सध्या वाढलं असून, नागरिकांनी आपले डिजिटल व्यवहार अत्यंत सजगतेने करावे, असं आवाहन सायबर सुरक्षातज्ञ
डॉ. धनंजय देशपांडे यांनी केलं आहे. धाराशिव इथं काल जिल्हा
व्यापारी महासंघाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विविध प्रकारच्या सायबर
गुन्ह्यांची माहिती देऊन त्यांनी, वेळेत यंत्रणेशी संपर्क साधण्याचं आवाहन केलं.
****
ज्येष्ठ मराठी साहित्यीक बी. रघुनाथ यांच्या पुण्यतिथीनिमित्त परभणीकर मित्र मंडळ
आणि साहित्य संगीत कला मंचच्या वतीने दिला जाणारा बी. रघुनाथ पुरस्कार नांदेडचे व्यंकटेश
सोळंके यांच्या 'अरसड' या कादंबरीला जाहिर झाला आहे.
पुरस्कार निवड समितीच्यावतीने संयोजक श्रीकांत उमरीकर यांनी ही माहिती दिली. येत्या
१३ सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगर इथं या पुरस्काराचं वितरण होणार आहे.
****
येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता
हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
****
No comments:
Post a Comment