Wednesday, 19 August 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 19.08.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 19 August 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ ऑगस्ट २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      जायकवाडी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सहा हजार ४७७ कोटीहून अधिकच्या आर्थिक तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

·      राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांची वाढ

·      नीट पेपरफुटी प्रकरणी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाई प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समिती स्थापन

·      २०२५ चे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर, ग्रँडमास्टर दिव्या देशमुखसह १७ खेळाडुंचा अर्जुन पुरस्काराने गौरव

आणि

·      लातूर, धाराशिव, बीड, जालना जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट

****

जायकवाडी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सहा हजार ४७७ कोटी ८८ लाख रुपयांच्या आर्थिक तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. यामुळे गोदावरी खोऱ्यातल्या सिंदफणा नदीवरच्या माजलगाव धरणाच्या कामाला गती मिळणार असून, यातून छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, परभणी आणि नांदेड या पाच जिल्ह्यातल्या सुमारे एक लाख ३१ हजार ६५२ हेक्टर जमिनीला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे या भागातला औद्योगिक पाणी पुरवठा, मत्स्य व्यवसाय आणि विद्युत निर्मितीलाही चालना मिळणार आहे.

श्री क्षेत्र पंढरपूर इथल्या विशेष पुनर्वसन धोरणालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या निर्णयामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आणि वाणिज्य संकुल आराखड्यातल्या तीन हजार ९९३ कोटी ९० लाख रुपयांच्या विकास कामांना गती मिळणार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये ट्रेडस प्लॅटफॉर्म प्रणालीचा वापर करण्याला, किमान आधारभूत किंमत योजनेत २०२४-२५ हंगामात खरेदी करण्यात आलेल्या धान आणि भरडधान्याच्या वाहतूक खर्चाकरता ३२८ कोटी ४७ लाख रुपयांची तरतूद करण्याला, महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन विकास आणि विनियमन नियम २०१३ मध्ये सुधारणा करण्याला तसंच वित्त आणि नियोजन विभागांची पुनर्रचना करण्यालाही कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

****

राज्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून उत्तम कार्यवाही सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. अन्नपदार्थांशी संबंधित नियमांचं उल्लंघन झाल्यास नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कठोर कारवाईची आवश्यकता होती आणि त्यानुसार कारवाई सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यापुढेही एफडीएची ही कार्यवाही सुरूच राहील, असं त्यांनी सांगितलं.

****

राज्य सरकारनं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांची वाढ केली आहे. राज्य सरकारच्या सेवेतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता ६० टक्के महागाई भत्ता मिळेल. जानेवारी ते जुलैची थकबाकी ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत दिली जाणार आहे.

****

राज्य शासनानं 'महाराष्ट्र शासन कामकाज नियम २०२६' लागू केले आहेत. या नवीन नियमावलीमुळे, न्यायप्रविष्ट प्रकरणं वगळता, इतर कोणत्याही प्रकरणी, कोणत्याही मंत्र्यानं घेतलेला निर्णय फिरवण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे. याशिवाय, मुख्यमंत्री प्रशासकीय कामकाजाबाबत कोणतीही माहिती कोणत्याही मंत्री, राज्यमंत्री किंवा सचिवांकडून मागवू शकतील, आणि ती त्वरित पुरवणं संबंधित विभागाला बंधनकारक राहणार आहे.

****

नीट पेपरफुटी प्रकरणी नवी दिल्लीत आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाई प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. महिला आंदोलकांवर झालेल्या कारवाईची चौकशीही ही समिती करेल. संसदेवर झालेल्या मोर्चाचं व्हिडीओ चित्रण या समितीकडे देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत.

****

छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भूमरे यांनी रेल्वे स्थानकाच्या विकासासंदर्भात केलेल्या मागण्यांवर दक्षिण मध्य रेल्वेकडून कार्यवाही सुरू आहे. त्यांच्या मागणीनुसार १६ डब्यांच्या पिटलाईनचं काम पूर्ण झालं असून, विद्युतीकरण आणि इतर आवश्यक कामं प्रगतिपथावर असल्याची माहिती, विभागीय आयुक्त कार्यालयानं दिली. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाच्या पायाभूत सुविधा आणि प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी खासदार भूमरे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

****

२०२५ च्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची काल घोषणा करण्यात आली. ग्रँडमास्टर विदित गुजराथी, दिव्या देशमुख, बॅडमिंटन महिला दुहेरी जोडी ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद, अॅथलेटिक्स खेळाडू तेजस्विन शंकर, मोहम्मद अजमल व्ही. आणि प्रियांका गोस्वामी, मुष्टीयोद्धा नरेंद्र, दिव्यांग नेमबाज धनुष श्रीकांत यांच्यासह एकूण १७ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे.

फुटबॉल क्षेत्रातल्या भरीव योगदानासाठी इसायाह अरुमैना यागम यांना अर्जुन जीवनगौरव  पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे. एथलेटिक्स कोच परवीर सिंह, बॉक्सिंग कोच छोटेलाल यादव आणि शूटिंग कोच नेहा नंदकुमार चव्हाण यांना द्रोणाचार्य पुरस्कार  जाहीर  झाला आहे. याशिवाय, क्रीडाक्षेत्राच्या प्रोत्साहन आणि विकासात उल्लेखनीय भूमिका बजावणाऱ्या संस्था आणि संघटनांना दिला जाणारा राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार पुण्यातल्या आर्मी पॅरालंपिक नोडला दिला जाणार आहे.

****

गॉल इथं सुरु असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात चार बाद ८४ धावा झाल्या. विजयासाठी त्यांना आणखी २८८ धावांची गरज आहे. भारताचा दुसरा डाव काल १९३ धावात आटोपला. ऋषभ पंतनं सर्वाधिक ६६ धावा केल्या.

दरम्यान, ऋषभ पंतनं या सामन्यात कसोटी क्रिकेटमधले आपले शंभर षट्कार पूर्ण केले. ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय आणि जगातला चौथा खेळाडू ठरला आहे.

****

नेदरलँड्समध्ये सुरू असलेल्या एफआयएच महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने दक्षिण आफ्रिकेचा सहा-एक असा एकतर्फी पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने 'पूल डी'मध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. भारताकडून सुनेलिता टोप्पो, नवनीत कौर, दीपिका सेहरावत, लालरेमसियामी आणि साक्षी राणा यांनी गोल केले.

****

छत्रपती संभाजीनगर शहरात सातारा परिसरातल्या हायकोर्ट कॉलनी आणि हर्सुल भागातल्या Blinkit च्या दोन आस्थापनांवर अन्न आणि औषध प्रशासनाने धडक कारवाई केली. या तपासणीदरम्यान अन्नसुरक्षा, स्वच्छता आणि साठवणुकीसंदर्भातल्या अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्याने ब्लिंक कॉमर्स प्रायवेट लिमिटेडचा अन्न परवाना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे. प्रशासनाच्या तपासणीत संबंधित ठिकाणी अन्नपदार्थांसोबत सिगारेट विक्री, कालबाह्य अन्नसाठा तसंच शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची योग्य नियमांचं पालन न करता एकत्रित साठवणूक केल्याचं निदर्शनास आलं.

****

हिंगोली तालुक्यातल्या लिंबाळा मक्ता इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या शिक्षकांच्या रिक्त जागा भराव्यात आणि विद्यार्थ्यांकरता आवश्यक त्या सोयी- सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी क़ॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी ग्रामस्थांसोबत शाळेसमोर आंदोलन सुरू केलं आहे. त्यांच्या मागणीनुसार या शाळेचे मुख्याध्यापक विनोद कटके यांच्यावर शिक्षण विभागानं निलंबनाची कारवाई केली, मात्र, शिक्षकांची पदे भरली जाईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचं दीपके यांनी सांगितलं आहे.

****

नांदेड शहरात लवकरच घरगुती पीएनजी गॅस पुरवठा सुरू होणार असून, पहिल्या टप्प्यात चार हजार घरांना जोडणी दिली जाणार आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड आणि बीपीसीएलच्या संयुक्त उपक्रमातून सिटी गॅस वितरण प्रकल्पांतर्गत पीएनजी गॅस नेटवर्क उभारणीचं काम शहरात सुरू आहे.

****

परभणी जिल्ह्यात राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगत असलेली अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमणे ३० ऑगस्टपर्यंत निष्कासित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत.  सर्वोच्च न्यायालयाने १३ जुलै २०२६ रोजी स्वत:हून दखल घेतलेल्या याचिकेच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. अतिक्रमणे नियोजनबद्ध पद्धतीने हटवण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करावं, असंही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केलं.

****

लातूर महापालिकेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारल्यानं कामकाज ठप्प झालं आहे. सत्ताधारी गटातल्या चार नगरसेवकांकडून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.

****

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेनंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सहा लाख १२ हजार ७०१ मतदारांची नावं अंतिम यादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे. शहरातल्या तीन लाख ४३ हजार ९६३ मतदारांची माहिती उपलब्ध झालेली नाही. नाव वगळलं गेल्यास नागरिकांना फॉर्म-६ भरून पुन्हा मतदार यादीत नाव नोंदवता येणार आहे.

****

महाराष्ट्र विधानमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीचा आजपासून नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहे. जिल्ह्यात अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना, विकासकामं, कल्याणकारी उपक्रम तसंच विभागनिहाय प्रलंबित बाबींचा सविस्तर आढावा ही समिती घेणार आहे.

****

येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मराठवाड्यात आज लातूर, धाराशिव, बीड, जालना या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 01 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...