Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 08
August 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ ऑगस्ट २०२६ दुपारी १.०० वा.
****
“विकसीत भारताच्या यात्रेत तरुण जेवढे सशक्त होतील, तेवढा देश सक्षम होईल”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
म्हटलं आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात आयआयटी दिल्लीच्या ५७ व्या दीक्षांत समारंभात
ते बोलत होते. पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना पंतप्रधानांनी यावेळी मार्गदर्शन केलं.
पदवी प्राप्त करणारे विद्यार्थी केवळ त्यांचं शिक्षणच पूर्ण करत नाहीत, तर ते त्यांच्या आयुष्यात एका नवीन अध्यायाची सुरुवात
करत असल्याचं ते म्हणाले. देशातील तरुण मोठी आशा असून त्यांच्यावर मोठी जबाबदारी असल्याचंही
त्यांनी म्हटलं. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते एआय-सक्षम, उच्च क्षमतेच्या ‘परम प्रज्ञा’ सुपरकंप्युटिंग सुविधेचं लोकार्पण यावेळी करण्यात आलं. हे तंत्रज्ञान
कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय, डेटा सायन्स आणि प्रगत संशोधनाला नवी गती देण्यास मदत करेल.
****
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा थोड्याच
वेळात मुंबईतील राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या नवीन
कार्यालयाचं उद्घघाटन करणार आहेत. या कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांच्यासह
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं काही वेळापुर्वी
आगमन झालं. अमित शहा राज्यातील शहरी सहकारी बँक महासंघ तसंच जिल्हा संघटनांच्या
प्रतिनिधींशीही यावेळी संवाद साधतील.
****
ब्रिक्स देशांच्या सांस्कृतीक मंत्र्यांची बैठक आज मध्य
प्रदेशातील भोपाळ इथं होत आहे. या बैठकीत सांस्कृतिक वारसा, संग्रहालयं, सर्जनशीलतेशी संबंधित अर्थकारण आणि सहभागी देशांतील संस्कृतिक
आदान प्रदान यावर या बैठकीत चर्चा प्रस्तावित आहे. ब्रिक्स देशातील संस्कृती आणि व्यक्ती-व्यक्तीतील
परस्पर संवाद वृद्धींगत होण्यावर विचार मांडण्यात येतील.
****
हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात आज सकाळी एका खासगी
बसचा अपघात झाल्यानं सात जणांचा मृत्यू झाला आणि ११ जण जखमी झाले आहेत. हा अपघात आज
सकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास चुरा विधानसभा मतदारसंघातील बैरागढ इथल्या चालुआंज
मोरजवळ घडला. खासगी बस बैरागढहून चंबाच्या दिशेने जात असताना चालुआंज मोरजवळ रस्त्यावरून
घसरून खाली असलेल्या दुसऱ्या रस्त्यावर कोसळली. या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी मृतांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला. तसंच, जखमी झालेल्यांच्या शीघ्र आरोग्यासाठी प्रार्थना केली.
****
आसाममध्ये आलेली विनाशकारी पूरस्थिती ओसरत असली तरीही
सद्यस्थिती अद्यापही गंभीर असून जनजीवन मोठ्या प्रमाणात प्रभावित झालं आहे. या आपत्तीतून
पूर्णपणे सावरण्यासाठी लोकांना बराच काळ लागणार असून सरकार सर्वोतोपरी नुकसान भरपाईसाठी
प्रयत्नशील आहे. पुरामुळे आसाममधील मृतांची एकूण संख्या ९८ वर पोहोचली असून १३ जिल्ह्यांतील
एकूण ४६४गावं प्रभावित झाली आहेत.
****
जम्मु आणि काश्मीर मधील पवित्र श्री अमरनाथ यात्रेत जम्मु
ते बालताल दरम्यानचा प्रवास आज रद्द करण्यात आला आहे. खराब हवामान आणि जम्मु-काश्मीर
महामार्गावर ठिकठिकाणी रस्त्यांची झालेली दुरावस्था लक्षात घेवून हा निर्णय घेण्यात
आला. मात्र, यात्रेतील बालताल ते पवित्र गुहेपर्यंतचा
प्रवास आजही सुरुच असून बाराशेहून अधिक भाविकांनी आज सकाळपासून तिथं दर्शन घेतलं असून
त्यांना बालताल सोडून जम्मुकडे पाठवलं जात आहे.
****
अमेरिकेच्या सिनेटने रशियाच्या तेल आणि वायू विक्रीवरील
निर्बंधांशी संबंधित प्रलंबित विधेयकाला मंजुरी दिली आहे. या विधेयकाच्या अंमलबजावणीचा
सर्वाधिक परिणाम प्रमुख खरेदार असलेल्या भारतासह चीन, जपान आणि काही युरोपीय देशांवर होऊ शकतो. या देशांमधून येणाऱ्या
वस्तूंवर शंभर टक्क्यांपर्यंत आयात शुल्क अमेरिका लावू शकतो. हे विधेयक सप्टेंबरमध्ये
प्रतिनिधीगृहात सादर होण्याची शक्यता आहे. तिथल्या मंजुरीनंतर हे निर्बंध लागू होतील.
****
सातारा जिल्ह्यातलं कोयना धरण ८८ टक्के भरलं असून सकाळी
धरणात सोळा हजार ४६८ घनफुट प्रतिसेकंद इतक्या वेगानं पाणी आवक सुरु होती. त्यानुसार, नियंत्रित स्वरुपात विसर्ग करण्यात येत असल्याचं वृत्त
आहे. पैठणच्या जायकवाडी धरणातून सहा हजार २२८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग
सुरू आहे. धरणात सध्या १० हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू असून, पाणी साठा ९३ टक्क्यांवर पोहोचला आहे.
****
दरम्यान, हवामान विभागाने मराठवाड्यात सगळ्या जिल्ह्यांत पुढचे तीन दिवस
जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. जालना, परभणी, हिंगोली, नांदेड तसंच लातूर जिल्ह्यांना आज तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर तसंच धाराशिव जिल्ह्यांना उद्या पावसाचा यलो अलर्ट देण्यात
आला आहे, तर कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा
अंदाज आहे.
****
भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद यानं अमेरिकेतील सेंट
लुईस इथं आयोजित रॅपिड आणि ब्लिट्झ स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. २० वर्षीय प्रज्ञानंद
यानं एक फेरी आधीच २३ पूर्णांक ५ गुण मिळवून हा विजय निश्चित केला. उझबेकिस्तानचा जावोखिर
सिंदारोव्ह दुसऱ्या आणि अमेरिकेचा वेस्ली सो तिसऱ्या स्थानी राहिले.
****
No comments:
Post a Comment