Monday, 17 August 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 17.08.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 17 August 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १७ ऑगस्ट २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      SIR प्रक्रियेत अर्ज जमा करण्याचा आज अखेरचा दिवस; दोन कोटींहून अधिक मतदारांच्या अर्जांची अद्याप प्रतीक्षा

·      राज्यातल्या विविध प्रकल्पांसाठी आर्थिक सहाय्याची केंद्रीय वित्त मंत्रालयाकडे मागणी

·      आर्थिक विकासासाठी पायाभूत सुविधांचा विकास महत्त्वाचा-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन

·      नागपंचमी तसंच श्रावणी सोमवारी महादेव मंदिरात भाविकांची गर्दी

आणि

·      श्रीलंकेविरुद्धच्या क्रिकेट कसोटीत भारताला पहिल्या डावात १७८ धावांची आघाडी

****

राज्यात SIR अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेत अर्ज जमा करण्याचा आज अखेरचा दिवस आहे. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत २ कोटी ७ लाख ९३ हजार ९१६ मतदारांचे अर्ज BLO ला मिळालेले नाहीत. राज्यात एकूण ९ कोटी ७८ लाख ५४ हजार ४९ मतदार आहेत. त्यांच्या तुलनेत अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या २१ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. नागपूर, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, मुंबई शहर आणि उपनगर, पालघर या जिल्ह्यांमध्ये अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. तर १ लाख ७ हजार ८७१ मतदारांचा ठावठिकाणा लागत नसल्यानं त्यांना अर्ज वाटप झालेलं नाही.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातल्या विविध विकासप्रकल्पांविषयी यावेळी चर्चा झाल्याचं पंतप्रधान कार्यालयाच्या समाजमाध्यम खात्यावर सांगण्यात आलं आहे. केंद्र आणि राज्यसरकारच्या समन्वयाने राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पांसाठी सहकार्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं, तसंच पंतप्रधानांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल त्यांचे आभार मानले.

 

दरम्यान, फडणवीस यांनी आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचीही दिल्लीत भेट घेतली. मुंबई-वाढवण एक्सप्रेस-वे कनेक्टिव्हीटीकरता जायकामार्फत आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून परवानगी मिळावी, अशी विनंती  मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत केल्याचं, आणि याबाबत सीतारामन यांनी सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन दिल्याचं, या बाबतच्या बातमीत म्हटलं आहे.

****

आरक्षण रद्द करण्याची मागणी संविधान विरोधी असून ती करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असं मत केंद्रीय सामजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. ते आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. कालेलकर आयोगाच्या आकडेवारीनुसार अनुसूचित जाती जमाती तसंच इतर मागासवर्गियांचं  लोकसंख्येतलं प्रमाण ७७ टक्के असून आरक्षण ४९ टक्के आहे याकडे आठवले यांनी लक्ष वेधलं. केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार अपेक्षित असल्याचं, आठवले यांनी सांगितलं.

****

रेल्वे प्रवाशांना सुरक्षित आणि स्वच्छ पेयजल उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तात्काळ सुधारणा उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. जवळपास २० हजार ठिकाणी व्यापक जलशुद्धीकरण आणि देखरेख प्रणाली तात्काळ कार्यान्वित केली जाणार आहे. पाण्याच्या टाक्याही तातडीने बदलण्यात येणार असून, साठवणूक टाक्यांची नियमित स्वच्छता आणि देखभालीवर रेल्वे मंडळाच्या पातळीवर देखरेख ठेवली जाणार आहे. 

****

देशाच्या आर्थिक विकासासाठी पायाभूत सुविधांचा विकास अत्यंत महत्त्वाचा असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठातर्फे आयोजित ‘फेस्टिव्हल ऑफ थिंकर्स’ कार्यक्रमात बोलत होते. यावेळी सिंबायोसिसच्या प्रधान संचालिका आणि सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रामकृष्णन रमण तसंच इतर मान्यवर उपस्थित होते. दळणवळणाच्या सुविधांचं नियोजन करताना केवळ आजच्या गरजांचा विचार न करता पुढील २५ ते ५० वर्षांचा दृष्टिकोन ठेवून, दीर्घकालीन आणि भविष्यवेधी नियोजन आवश्यक असल्याचं गडकरी यांनी नमूद केलं.

****

छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा इथं भारतीय हस्तकला, हातमाग आणि स्वदेशी उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं आयोजित ‘स्वदेशी फॅशन अँड लाइफस्टाईल एक्स्पो २०२६’ ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्यम मंत्रालयाच्या सहकार्याने १४ ते १६ ऑगस्टदरम्यान झालेल्या या प्रदर्शनात देशाच्या विविध भागांतून आलेले कारागीर, विणकर, महिला उद्योजक आणि हस्तकला कलाकार सहभागी झाले होते. विविध राज्यांतील पारंपरिक हस्तकला, हातमाग वस्त्रे, फॅशन तसंच लाइफस्टाईल उत्पादनांचे वैविध्य हे प्रमुख आकर्षण ठरलेल्या या एक्स्पो ची काल सांगता झाली.

****

जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यातील प्राचीन अमरनाथ मंदिरासाठीची १२ दिवसांची वार्षिक 'श्री बुढा अमरनाथ यात्रा' आज सकाळी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत सुरू झाली. येत्या २८ ऑगस्टला श्रावण पौर्णिमेला यात्रेची सांगता होईल. या यात्रेसाठी प्रशासनानं राजौरी, पूंछ आणि प्रवासाच्या मार्गांवर कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.

****

खान्देशातल्या कानबाई मातेच्या उत्सवाची आज सांगता झाली. श्रावण महिन्याच्या पहिल्या रविवारी घरोघरी विराजमान झालेल्या कानबाई मातेच्या विसर्जनानिमित्त आज नंदुरबार शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वाद्यांचा निनाद आणि ‘कानबाई मातेचा जयघोष’ यामुळे संपूर्ण शहर दुमदुमून गेलं होतं. कानबाई उत्सवाला खान्देशाच्या धार्मिक परंपरेसोबतच सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. नोकरी, व्यवसायानिमित्त देशाच्या विविध भागांत स्थायिक झालेले खान्देशवासी या उत्सवासाठी आवर्जून आपल्या गावी परततात.

****

नागपंचमीचा सण आज पारंपरिक रितीने उत्साहात साजरा झाला. घरोघरी महिलांनी नागाची पूजा केली. सांगली जिल्ह्यातील मौजे बत्तीस शिराळा इथं ४१ ग्रामस्थांना केवळ शैक्षणिक उद्देशासाठी नाग पकडण्याची परवानगी देण्यात आली. दरम्यान, बत्तीस शिराळा इथं नागपंचमी सणानिमित्त अंबामता देवी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली असून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

****

श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारनिमित्त आज राज्यभरातल्या शिवमंदिरांमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. त्र्यंबकेश्वर आणि भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिरांमध्येही पहाटेपासून भाविक मोठ्या संख्येनं दाखल होत आहेत.

 

बारावं ज्योतिर्लिंग असलेल्या वेरूळच्या घृष्णेश्वर दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली आहे. छत्रपती संभाजीनगर ते खुलताबाद रस्त्यावर सकाळपासून मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मंदिरामध्ये भक्तांनी सकाळपासून पूजा आरती सह इतर धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत.

 

बीड जिल्ह्यात परळी इथल्या वैद्यनाथ मंदिरातही भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी वैजनाथ देवस्थान ट्रस्टकडून विशेष दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त असून १०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे आणि बॅरिकेडिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

 

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ इथं भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमी हा दुहेरी योग आल्याने पहाटेपासूनच मंदिर खुले करण्यात आलं. संस्थांनचे अध्यक्ष तहसीलदार हरीश गाडे, पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे, व्यवस्थापक सुरेंद्र डफळ यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलं. याठिकाणी महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, तेलंगणा, राजस्थान, आंध्रप्रदेश, पंजाब, गुजरात या राज्यातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे

****

बीड जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत २७३ पुर्णांक २ शतांश मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, जून ते सप्टेंबर या कालावधीतील वार्षिक सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण ४८ पुर्णांक ३ शतांश टक्के आहे. जिल्ह्यात केज तालुक्यात सर्वाधिक ४१४ पुर्णांक ६ शतांश मिलिमीटर तर आष्टी तालुक्यात सर्वांत कमी २०८ पुर्णांक ६ शतांश मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या तुलनेत पावसाची तूट कायम असल्यानं आगामी काळातील पावसाकडं शेतकरी आणि नागरिकांचं लक्ष लागल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

दक्षिण मुंबईच्या चर्चगेट परिसरातील आयकर भवनात आज दुपारी अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच आयकर विभागाच्या तळमजल्यावरील लोक तत्काळ इमारतीबाहेर पडले. अग्निशमन दलाच्या सुमारे आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचं काम सुरू आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. ही आग इतर मजल्यांपर्यंत पसरण्यापासून रोखण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत आहेत.

****

नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, दिंडोरी आणि पेठ अशा तीन तालुक्यात काही गावांमध्ये आजही भूकंपाचे सौम्य धक्के बसले. हे धक्के अत्यंत सौम्य असल्याने कोणतंही नुकसान झालं नाही, असं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे.

****

लातूर इथं येत्या २४ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचं आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील गुंतवणूक वाढवण्यासोबतच नवउद्योजकांना प्रोत्साहन देणं तसंच गुंतवणूकदार आणि व्यावसायिकांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देणं, हा या परिषदेचा प्रमुख उद्देश आहे. या परिषदेमुळे जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रात नव्या गुंतवणुकीच्या संधी निर्माण होण्याबरोबरच स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीलाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

****

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला पहिल्या डावात १७८ धावांची आघाडी मिळाली आहे. आज सामन्याच्या तिसऱ्या दिवशी, भारताने नऊ बाद ४६० धावांपासून खेळ पुढे सुरु केला, अवघ्या दोन धावांची भर घालून भारताचा पहिला डाव ४६२ धावांवर आटोपला. त्यानंतर श्रीलंकेचा पहिला डाव २८४ धावांवर संपुष्टात आला. भारताकडून मानव सुतारने चार, रविंद्र जडेजाने तीन तर मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 01 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...