Monday, 31 August 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.08.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 31 August 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ दुपारी १.०० वा.

****

किर्गिस्तान दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिश्केक इथं विविध समुदायांच्या प्रतिनिधींशी भेट घेऊन संवाद साधला.या भेटीदरम्यान विविध क्षेत्रांतल्या समुदायांच्या सदस्यांशी पंतप्रधानांनी चर्चा केली.या संवादातून भारत आणि किर्गिस्तानमधले मैत्रीपूर्ण संबंध, सांस्कृतिक जिव्हाळा आणि लोकांमधील परस्पर संबंध अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात आला.

दरम्यान, पंतप्रधान आज आणि उद्या बिश्केक इथं आयोजित शांघाय सहकार्य संघटनेच्या २६व्या शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत.

****

स्वदेशी बनावटीचं INS निपुण हे जहाज आज भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झालं. खोल समुद्रातली डायव्हिंग, पाण्याखालची तपासणी आणि संकटात सापडलेल्या पाणबुड्यांच्या बचावासाठी हे जहाज महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. INS निपुणमध्ये अत्याधुनिक डायव्हिंग उपकरणं, पाण्याखालील रोबोट्स, वैद्यकीय सुविधा आणि पाणबुडी बचाव यंत्रणा उपलब्ध आहेत. सॅच्युरेशन डायव्हिंगच्या क्षमतेमुळे नौदलाचे पाणबुडे अत्यंत खोल पाण्यात दीर्घकाळ काम करू शकणार आहेत. पाणबुडी अपघाताच्या किंवा आपत्कालीन परिस्थितीत बचावकार्य जलद आणि प्रभावीपणे करण्यासाठी INS निपुणची क्षमता अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. भारताच्या सागरी सुरक्षा, खोल समुद्रातील कारवाया आणि पाणबुडी बचाव क्षमतेला यामुळे मोठी चालना मिळणार आहे.

****

नेपाळमधल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर चिलिमे आणि लांगटांग इथल्या जलविद्युत प्रकल्पांच्या बोगद्यांमध्ये भारत-नेपाळच्या पथकांकडून शोध आणि बचावकार्य सुरू आहे. त्रिशुली-३ ए प्रकल्पासह विविध जलविद्युत प्रकल्पांच्या बोगद्यांमध्ये अडकलेल्या शेकडो नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. बेपत्ता असलेल्या सुमारे अडीच हजार नागरिकांपैकी शेकडो जण नेपाळमधल्या जलविद्युत प्रकल्पांमध्ये कार्यरत असल्याचं सांगितलं जात आहे. या आपत्तीत नेपाळमध्ये किमान ७९४ जणांचा मृत्यू झाला. तिबेटमध्ये मृतांची संख्या १६ असून ५४६ जण बेपत्ता आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार,४०३ भारतीय नागरिक चीनमधून सुरक्षितपणे नेपाळमध्ये पोहोचले आहेत, तर ५०० भारतीय नागरिक सध्या चीनमध्ये सुरक्षित आहेत. महाराष्ट्रातल्या नागरिकांनाही सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नेपाळमधल्या आपत्तीग्रस्त भागातून ६९ नागरिक मुंबईत पोहोचणार आहेत.

दरम्यान, नेपाळमधला भीषण पूर आणि पाणलोट क्षेत्रातल्या मुसळधार पावसाचा परिणाम बिहारमधल्या गंडक आणि कोसी नद्यांवरही झाला आहे. नदीचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी वाल्मिकीनगर बॅरेजचे सर्व ३६ दरवाजे आणि कोसी बॅरेजचे २० दरवाजे उघडण्यात आले आहेत. मात्र, गेल्या २४ तासांत दोन्ही नद्यांची पाणीपातळी आणि विसर्गाचा प्रवाह कमी झाल्याची माहिती आहे.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीने मानद डी.लिट. उपाधी प्रदान करण्यात आली. मराठवाडा कृषी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ नुकताच पार पडला, त्यावेळी काही अपरिहार्य कारणांमुळे मुख्यमंत्री फडणवीस यांना उपस्थित राहता आलं नव्हतं. त्यामुळे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इंद्र मणी यांनी काल नागपूर इथं एका छोटेखानी समारंभात त्यांना सन्मानपूर्वक ही उपाधी प्रदान केली.

****

राज्यात एसआयआर अर्थात मतदार याद्यांची फेरतपासणी आणि सुधारणा मोहिमेअंतर्गत तयार करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नागरिकांनी प्रारूप मतदार यादीत आपलं नाव समाविष्ट असल्याची खात्री करून घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. ही प्रारूप मतदार यादी जिल्हाधिकारी तसंच जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. त्याचबरोबर राजकीय पक्षांची कार्यालयं, तहसील कार्यालयं आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्येही नागरिकांना ही यादी पाहता येणार आहे.

****

आज तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त विविध शिव मंदिरांमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. बीड जिल्ह्यात परळी इथल्या वैद्यनाथ मंदिरासह जिल्ह्यातल्या विविध महादेव मंदिरांमध्ये भाविक मोठ्या संख्येनं दाखल होत आहेत. गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख मंदिर परिसरात पोलिस प्रशासनाकडून बंदोबस्त ठेवण्यात आला असून, भाविकांची सुरक्षितता आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यावर लक्ष देण्यात येत आहे.

नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर इथल्या ज्योर्तिंलींगाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक दाखल होत आहे. काल रात्रीपासून ब्रह्मगिरीला महाप्रदक्षिणा म्हणजेच फेरीला प्रारंभ झाला. तिसऱ्या श्रावणी सोमवारी या ज्योर्तिलिंगाचं विशेष महत्व असल्याने यंदा तीन लाखाहून अधिक भाविक दाखल होतील असा अंदाज आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या २८० अतिरीक्त बसगाड्या त्र्यंबकेश्वरसाठी सोडण्यात आल्या आहेत.

****

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त बीड इथल्या फाउंडेशन स्कूल इथं क्रीडा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. या उपक्रमांतर्गत आयोजित सायकल रॅलीचा शुभारंभ नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. या सायकल रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवत ‘फिटनेस, आरोग्य आणि क्रीडा संस्कृती’ चा संदेश दिला.

****

 

  

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 01 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...