Saturday, 29 August 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 29.08.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 29 August 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ ऑगस्ट २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी नवं तंत्रज्ञान आणि संशोधनाचा उपयोग आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

·      कडधान्य बियाण्यांच्या अनुदानात केंद्र सरकारकडून भरीव वाढ

·      राज्य सरकारकडून साखर साठा मर्यादेबाबत सूचना जारी

·      रक्षाबंधनाचा सण सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून सर्वत्र उत्साहात साजरा

आणि

·      भारताच्या वेलावन सेंथिलकुमारनं पटकावलं बुडापेस्ट स्क्वॅश खुल्या स्पर्धेचं विजेतेपद; भालाफेकपटू नीरज चोप्रा २०२६ डायमंड लीगच्या अंतिम फेरीत दाखल 

****

शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी नवं तंत्रज्ञान आणि संशोधनाचा उपयोग आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नाशिकमध्ये कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन करताना ते बोलत होते. शेती आणि शेतकऱ्यांसमोरील समस्या सोडवण्यासाठी शेती पद्धतीत बदल, आधुनिकीकरण आणि तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यावर भर द्यावा लागेल, कृषी क्षेत्रातलं संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा प्रकारची आणखी महाविद्यालयं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आधुनिक यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञानात गुंतवणूक करणं कठीण ठरतं, त्यामुळे शेतीत आधुनिकीकरण आणि तंत्रज्ञान आणणं हा महत्त्वाचा मार्ग असल्याचं त्यांनी नमूद केलं.

**

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीनं नाशिकमध्ये सुरू झालेल्या तीन दिवसीय ‘सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम’ कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झालं. भारतीय संस्कृतीचा सर्वात मोठा अविष्कार असलेल्या सिंहस्थ कुंभमेळा या महासोहळ्याची सर्व कामं निर्धारीत वेळेत पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी मोठ्या संख्येने स्वयंसेवकांची गरज असल्याने ‘कुंभ दूत’ उपक्रमाचीही सुरुवात करण्यात आली.

****

 

नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर पर्यटनासाठी काठमांडू आणि चीनमधल्या सागा इथं गेलेल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांना सुरक्षितपणे राज्यात परत आणण्यासाठी केंद्र सरकार, नेपाळ आणि चीन सरकारच्या समन्वयाने आवश्यक कार्यवाही सुरू आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग संबंधित नागरिक आणि त्यांच्या नातेवाईकांच्या सातत्याने संपर्कात असून, त्यांच्या सुरक्षित परतीसाठी आवश्यक मदत आणि मार्गदर्शन केलं जात आहे. बिहारमधल्या सीतामढी जिल्हा प्रशासनाने नेपाळ सीमेवरून महाराष्ट्रातल्या १०६ यात्रेकरूंना सुरक्षितपणे सीतामढीला आणलं आहे.

दरम्यान, कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून परतीच्या प्रवासात तिबेटमधल्या सागा इथं अडकलेल्या राज्यातल्या ३७ भाविकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीच्या पुढाकारानंतर काठमांडूकडे सुरक्षित रवाना करण्यात आलं.

****

राज्यात राबवण्यात येत असलेल्या कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत प्रमाणित बियाणांच्या वितरणासाठी केंद्र सरकारनं अनुदानाच्या रकमेत मोठी वाढ केली आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केंद्र सरकारकडे याबाबत सातत्यानं पाठपुरावा केला होता. त्यानुसार यासंदर्भात काल केंद्र सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या. यानुसार आता तूर, उडीद आणि मसूरसाठी बियाणे किंमतीच्या १०० टक्के किंवा कमाल १२ हजार रुपये प्रतिक्विंटल अनुदान देण्यात येणार आहे. तर हरभरा आणि इतर कडधान्यांसाठी ७५ टक्के किंवा कमाल सहा हजार रुपये प्रतिक्विंटल अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे.

****

राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने साखर विक्रेते, वितरक आणि मोठ्या ग्राहकांसाठी साठा मर्यादेबाबत सूचना जारी केल्या आहेत. साखर विक्रेते आणि वितरकांना चारशे मेट्रिक टनांपेक्षा जास्त साखरेचा साठा ठेवता येणार नाही. तसंच, साखर प्राप्त झाल्यापासून तीस दिवसांपेक्षा अधिक काळ साठा ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. दरमहा दहा मेट्रिक टनांपेक्षा जास्त साखर वापरणाऱ्या मोठ्या ग्राहकांना साखर प्राप्त झाल्यापासून पंधरा दिवसांपेक्षा अधिक काळ साठा ठेवता येणार नाही. हे निर्बंध ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत लागू राहणार आहेत.

****

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, २०२६ कालपासून राज्यात लागू झाला. बळजबरी, फसवणूक किंवा आमिष दाखवून बेकायदा धर्मांतर करायला आळा घालण्यासाठी कठोर तरतुदींचा समावेश या कायद्यात आहे. असं करणाऱ्यांना सात वर्षांचा तुरुंगवास आणि पाच लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो, तर गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास १० वर्षं तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. स्वेच्छेनं धर्मांतर करायच्या किमान ६० दिवस आधी स्थानिक दंडाधिकाऱ्यांना पूर्वसूचना देणं या कायद्यामुळे बंधनकारक झालं आहे.

****

केंद्र सरकारनं राष्ट्रीय परीक्षा संस्था - एनटीएकडून आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षांसह देशातल्या सार्वजनिक परीक्षा प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था आणि इतर भागधारकांकडून सूचना मागवल्या आहेत. १३ सप्टेंबर पर्यंत आपले अभिप्राय आणि सूचना 1 8 0 0 1 8 0 4 7 4 7 या टोल फ्री क्रमांकावर तसंच 91 78 27 04 28 30 या व्हॉटसअप क्रमांकावर पाठवता येतील.

****

देशभरात काल रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. दिल्ली इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध शाळा आणि संस्थांमधल्या मुलांसोबत आणि विद्यार्थ्यांसोबत राखी पौर्णिमा साजरा केली.

सांगली इथंल्या शांतिनिकेतन मध्ये शिकत असलेल्या मुलींनी परिसरातील वृक्षांना राख्या बांधून पर्यावरणपूरक पद्धतीने हा सण साजरा केला.

छत्रपती संभाजीनगर इथं आमदार अंबादास दानवे यांनी दामिनी पथकातल्या पोलीस भगिनींसोबत राखी पौर्णिमा साजरी केली.

लातूर इथं ग्रीन लातूर वृक्ष फाऊंडेशनच्या वतीने ‘वृक्ष रक्षाबंधन’ उपक्रम राबवण्यात आला. झाडांना राखी बांधून त्यांच्या संवर्धनाची शपथ यावेळी घेण्यात आली.

****

आगामी खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांना खतांचा सुरळीत पुरवठा व्हावा, यासाठी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाने मिश्र खतांचं उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार खत उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल पुण्यात व्यक्त केला.

****

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे आज जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी इथं पुन्हा उपोषणा सुरु करणार असून, त्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. आंतरवाली सराटी इथं एक हजारांहून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, हे आंदोलन निर्णयाक राहणार असून, सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांबाबत आवश्यक निर्णय तातडीने घ्यावेत, अन्यथा मुंबईत मोर्चा काढण्यात येईल, असं जरांगे यांनी म्हटलं आहे.

****

बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी काल ताडसोन्ना आणि पिंपळनेर इथल्या जिल्हा परिषद शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांनी त्यांचा उत्साह वाढवला. यावेळी शैक्षणिक कामकाजाचा आढावा घेत शिक्षक आणि मुख्याध्यापकांशी चर्चा केली. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, अध्यापनाची गुणवत्ता आणि शाळांमधल्या भौतिक सुविधांबाबत रहमान यांनी माहिती घेतली.

****

नांदेड जिल्ह्यात माहूर गडावर मातृतीर्थ कुंडात एका भाविकाचा बुडून मृत्यू झाला. वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड तालुक्यातला अनिकेत तूरक हा युवक नारळी पौर्णिमा परिक्रमा यात्रेसाठी माहूर इथं आला होता. मातृतीर्थ कुंडात अंघोळ करण्यासाठी गेला असताना त्याचा बुडून मृत्यू झाला. जीव रक्षक दलाच्या जवानांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो खोल गाळात रुतला गेल्यानं त्याला वाचवण्यात यश आलं नाही.

****

बँकिंग क्षेत्रातल्या कर्मचार्यांसाठी कामकाजाचा पाच दिवसांचा आठवडा करण्याच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यात बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काल आंदोलन केलं. स्टेट बँक ऑफ इंडिया ऑफिसर्स असोसिएशन आणि स्टाफ युनियनच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात विविध बँकांमधले अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते. जुन्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्‍ती वेतनाचं अद्ययावतीकरण करावं, राष्ट्रीय निवृत्‍ती वेतन प्रणालीतल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा पर्याय द्यावा, यासारख्या मागण्या यावेळी करण्यात आल्या.

****

छत्रपती संभाजीनगर शहरात वाहतूक पोलीस प्रशासनातर्फे विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाईची विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. शहराच्या विविध भागांत राबवलेल्या या मोहिमेत काल एक हजार १३० दुचाकीस्वारांवर कारवाई करत ११ लाख ३० हजार रुपयांचा दंड आकारला आहे.

****

भारताच्या वेलावन सेंथिलकुमारनं पीएसए बुडापेस्ट स्क्वॅश ओपन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. काल झालेल्या अंतिम सामन्यात त्याने यजमान हंगेरीच्या बालाझ फार्कसचा तीन - शून्य असा पराभव केला.

****

भालाफेकपटू नीरज चोप्रानं २०२६ डायमंड लीगच्या अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी चार आणि पाच सप्टेंबर रोजी ब्रुसेल्स इथं होणार आहे. नीरजने डायमंड लीगच्या दोन टप्प्यांमध्ये सहभाग घेतला.

****

हवामान

राज्यात पुढील तीन दिवस सर्वत्र हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 01 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...