Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 12 August
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक १२ ऑगस्ट
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद
यांच्या ‘Triumph of the Indian Republic: My Life, My Struggles’ या आत्मचरित्राचं
प्रकाशन आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. राष्ट्रपती म्हणून
कोविंद यांचं कार्य पाहण्याची संधी, आपल्यासाठी शक्तीचा मोठा स्रोत आणि अनमोल आठवणी ठरल्या
असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. रामनाथ कोविंद यांचं आत्मचरित्र भारतीय लोकशाही
आणि भारतीय समाजासाठी एक मौल्यवान वारसा ठरेल, त्यांचा
जीवनप्रवास आणि समाज आणि राष्ट्रासाठी दिलेलं त्यांचं योगदान आपल्याला खूप प्रेरणा
देणारं आअसल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.
या आत्मचरित्रात रामनाथ कोविंद
यांच्या बालपणापासून सार्वजनिक जीवनापर्यंतचा प्रवास, त्यांचे
संघर्ष, अनुभव आणि देशाचे १४वे राष्ट्रपती म्हणून बजावलेल्या
सेवेचा आढावा घेण्यात आला आहे.
****
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात
आज लोकसभेत खाण आणि खनिजे (विकास आणि नियमन) सुधारणा विधेयक, २०२६ सादर
होण्याचं नियोजन आहे. तर राज्यसभेत केरळ नामांतर विधेयक, २०२६ विचार
आणि मंजुरीसाठी सूचीबद्ध आहे. केरळचं अधिकृत नाव ‘केरलम्’ करण्याचा प्रस्ताव या विधेयकात
आहे.
****
वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा
अवमान करणं हा गुन्हा ठरवणाऱ्या विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी
केली. यामुळे जन गण मन या राष्ट्रगीताचाच दर्जा वंदे मातरम या गीतालाही मिळाल्याचं
सरकारनं म्हटलं आहे. या नव्या कायद्यानुसार वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांना तीन वर्षांपर्यंत
तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही ठोठावला जाऊ शकतो. तसंच वारंवार हाच गुन्हा करणाऱ्यांना
प्रत्येक नव्या गुन्ह्यासाठी एका वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा देता येऊ शकते.
****
अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर
‘मकोका’ अर्थात संघटित गुन्हेगारी विरोधी कायद्याअंतर्गत अजामीनपात्र गुन्हे दाखल करावेत
अशी सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. विकसित महाराष्ट्र २०४७ अंतर्गत
२०२६-२७ साठी निश्चित करण्यात आलेले टप्पे आणि कार्यवाहीसाठी काल मुंबईत झालेल्या बैठकीत
ते बोलत होते. अन्नात भेसळ करणं हा साधा गुन्हा नसून, तो थेट नागरिकांच्या
जीवाशी खेळ आहे, अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या समाजकंटकांना कोणत्याही
प्रकारची नरमाई दाखवू नये असं ते म्हणाले. या प्रकरणांमधल्या कायदेशीर प्रक्रिया अधिक
बळकट करण्यासाठी ज्येष्ठ विधीतज्ज्ञांची मदत घेण्यात यावी आणि यासाठी तातडीने एक विशेष
लीगल टीम तयार करण्यात यावी, असं शिंदे यांनी यावेळी सांगितलं.
****
टीईटी परीक्षा पेपरफुटी प्रकरणात
भिवंडी पोलिसांनी काल सोलापूरहून प्रकाश पवार या आणखी एका आरोपीस अटक केली. प्रकाश
हा सोलापूर इथं पोलिस भरती प्रशिक्षण केंद्र चालवत होता. भिवंडी न्यायालयाने त्याला
१५ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत एकूण १६ आरोपींना
अटक करण्यात आली आहे.
****
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये
इयत्ता ११ वीच्या प्रवेशासाठी अंतिम विशेष फेरीला आजपासून सुरुवात झाली. अद्याप प्रवेश
निश्चित न केलेल्या विद्यार्थ्यांना या फेरीत सहभागी होता येणार आहे. या विशेष फेरीमध्ये
विद्यार्थ्यांना किमान १० कनिष्ठ महाविद्यालयांची पसंती नोंदवणं बंधनकारक आहे. इयत्ता
११ वीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत १५ लाख ४५ हजार ६४० विद्यार्थ्यांनी
नोंदणी केली असून, त्यापैकी १३ लाख २६ हजार ३९७ विद्यार्थ्यांनी प्रवेश
निश्चित केला आहे.
****
नांदेड महापालिकेची सर्वसाधारण
सभा काल पार पडली. या सभेत सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना मूलभूत प्रश्नही मांडू दिले नाहीत
या विषयावरून काँग्रेससह वंचित बहुजन आघाडीने या सभेवर बहिष्कार टाकत सभात्याग केला; पण त्याचवेळी
सत्ताधाऱ्यांनी ही सभा शहरातल्या वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा करत पूर्ण केली. महापौर
कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये २५ हून अधिक विषयांना मंजुरी
देण्यात आली.
****
बीड शहरातली वाढती वाहतूक कोंडी
आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नामलगाव फाटा – म्हसोबा फाटा ते पाली असा बाह्यवळण
मार्ग करण्याची मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग
मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीची दखल घेत संबंधित
यंत्रणेला तातडीने डीपीआर तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बीड शहरातली वाढती
वाहतूक, नागरिकांची होणारी गैरसोय आणि शहराचा भविष्यातला विस्तार
लक्षात घेता बाह्यवळण मार्गाची गरज असल्याचं या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.
****
सनदी अधिकारी तुकाराम मुंडे
यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘तुकाराम’ ग्रंथाचं लोकार्पण काल बीड इथं लेखक आणि वक्ते
संजय आवटे यांच्या हस्ते झालं. समाजाच्या प्रगतीसाठी नागरिकांनी सजग आणि सक्रिय भूमिका
बजावल्यास तुकाराम मुंडे यांच्यासारखे सनदी अधिकारी एकाकी राहणार नाहीत, असं आवटे
यांनी व्यक्त केलं.
****
वाशिम जिल्ह्यात मोफत अथवा
स्वस्त धान्य योजनेत पाच हजार १७१ जण अपात्र ठरले आहेत. सरकारी कर्मचारी, व्यावसायिक
आणि करदात्यांना योजनेतून वगळून त्यांची शुभ्र शिधापत्रिकेत वर्गवारी करण्यात आली आहे.
****
No comments:
Post a Comment