Monday, 24 August 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.08.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 24 August 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २४ ऑगस्ट २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      UPI डिजिटल पेमेंटची दशकपूर्ती-वापरकर्त्यांच्या संख्येत १३ हजार पटींनी वाढ

·      पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता जमा 

·      मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांच्याशी चर्चेकरता सरकारचं शिष्टमंडळ दाखल

·      मराठी भाषा आणि व्याकरणतज्ज्ञ डॉ. यास्मिन शेख यांचं पुण्यात निधन

आणि

·      श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताच्या पहिल्या डावात ५०३ धावा

****

‘युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस’ UPI ने डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रात दहा वर्षे पूर्ण केली आहेत. २५ ऑगस्ट २०१६ रोजी सुरू झालेल्या UPI च्या व्यवहारांच्या संख्येत जवळपास १३ हजार पटींनी वाढ झाली आहे. UPI द्वारे होणाऱ्या वार्षिक व्यवहारांची संख्या २०१६-१७ मधील केवळ १ कोटी ७८ लाखांवरून २०२५-२६ मध्ये २४ हजार १६२ कोटींहून अधिक झाली असल्याची माहिती अर्थ मंत्रालयाने दिली आहे. तत्काळ खात्यात पैसे जमा करण्याच्या व्यवहारांपैकी जवळपास ४९ टक्के व्यवहार UPI द्वारे केले जात असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे.

****

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने अंतर्गत आज ६ लाख ३६ हजार ३६ शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार ८६ कोटींचा दुसरा हप्ता जमा करण्यात आला. सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा दुसरा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला. यापूर्वी ७ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं होतं. आतापर्यंत कर्जमुक्ती योजनेतील १२ लाख ५८ हजार २४३ पात्र शेतकऱ्यांना १० हजार ११५ कोटींचे वितरण करण्यात आलं आहे.

****

नागपूर इथं लता मंगशेकर विद्यापीठ स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अहिल्यानगर इथे डॉ. बाळासाहेब विखे पाटील आरोग्य विज्ञान विद्यापीठ उभारण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत इथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास तसंच त्यासाठीची पदे आणि अनुषांगिक खर्चाच्या तरतुदीस मंत्रिमंडळाने आजच्या मान्यता दिली.

****

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांशी संबधित वेगवेगळ्या प्रणालींचं एकत्रीकरण करुन तयार केलेल्या महा-ई एच आर एम एस प्रणालीचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत लोकार्पण झालं. ही प्रणाली प्रशासनाला गतीमान करण्यासाठी उपयोगी पडेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

****

वाहनाच्या मालकी हक्क हस्तांतरणासाठी तसेच ना हरकत प्रमाणपत्रासाठी संबंधित अर्जदाराचे आधार प्रमाणीकरण करणे, अनिवार्य करण्यात आले आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं देशभरात हे नियम लागू केले आहेत. परिवहन सह आयुक्त शैलेश कामत यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

****

मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चेसाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज दाखल झालं. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखेपाटील, मंत्री उदय सामंत तसंच मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह अनेक मान्यवरांचा या समितीत समावेश आहे. आंदोलन न होता सगळे प्रश्न सुटावेत, हाच या दौऱ्याचा उद्देश असल्याचं, सामंत यांनी सांगितलं. मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्यांवर सरकारने अंमलबजावणी केलेली असल्याचं विखे पाटील यांनी सांगितलं. ते म्हणाले –

बाईट – राधाकृष्ण विखे पाटील

****

अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेनं २०२६-२०२७ या शैक्षणिक सत्रात ‘गर्भिणी मित्र’ हा सहा महिन्यांचा नवीन अभ्यासक्रम सुरू केला आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून वरिष्ठ माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण झालेले आणि १८ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे उमेदवार ३१ ऑगस्टपर्यंत या अभ्यासक्रमासाठी अर्ज करू शकतात.

****

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने अकरावीच्या प्रवेशासाठी दहावी फेरी जाहीर केली आहे. २७ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना या फेरीत सहभागी होऊन प्रवेश घेता येणार आहे. राज्यात अद्यापही अकरावीच्या आठ लाख ९४ हजार जागा रिक्त आहेत.

****

मराठी भाषा आणि व्याकरणतज्ज्ञ डॉ. यास्मिन शेख यांचं आज पुण्यात निधन झालं, त्या १०१ वर्षांच्या होत्या. भाषाशास्त्र आणि प्रमाण मराठीच्या समर्थनासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या मिलिंद महाविद्यालयात अध्यापन केलेल्या यास्मिन शेख यांनी मुंबईतल्या एस आय ई एस महाविद्यालयातही मराठीच्या प्राध्यापक म्हणून तसंच मराठी विभागप्रमुख म्हणूनही काम केलं. मराठी लेखन मार्गदर्शिका, मराठी शब्दलेखन कोश, सुगम मराठी व्याकरण कोश ही त्यांची काही पुस्तकं मराठी अभ्यासकांमध्ये प्रसिद्ध आहेत. यास्मिन शेख यांच्या निधनानं मराठी भाषा विश्वातील एक व्रतस्थ, अभ्यासू आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

छत्रपती संभाजीनगर इथले सरस्वती भुवन महाविद्यालयातले प्राध्यापक नागेश अंकुश यांच्या ‘मागोवा’ या पुस्तकाला यास्मीन शेख यांनी प्रस्तावना लिहिली होती. नागेश अंकुश यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला –

बाईट – प्रा.नागेश अंकुश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ अभ्यासक यास्मिन शेख यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. शब्दांशी त्यांचं नातं हे केवळ अभ्यासापुरतं नव्हतं, तर मराठीवरील निस्सीम प्रेमाचं नातं होतं, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात डॉ. यास्मिन शेख यांच्या निधनाने मराठी भाषाविश्वाची मोठी हानी झाली असून मराठी भाषेचा ज्ञानवृक्ष कोसळला, अशा शब्दांत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

****

अमरावतीमधल्या स्त्री जिल्हा रुग्णालयातल्या अग्निकांडात दगावलेल्या अर्भकांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने पाच लाख रुपये मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. जखमी अर्भकांवर शासकीय खर्चाने उपचाराचे निर्देशही अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून, या प्रकरणी दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आज पहाटेच्या सुमारास घडलेल्या या अग्निकांडात तीन अर्भकांचा होरपळून मृत्यू झाला.

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सदर रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दुर्घटनेच्या वेळी कक्षात ३९ अर्भकांवर उपचार सुरू होते. त्यापैकी ३६ अर्भकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं असून सहा अर्भकांना पुढील उपचारासाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

****

आरक्षण उपवर्गीकरणासाठीच्या आंदोलनात कथित जातीय तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्यं करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी डॉ आंबेडकर सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. सदर मागणीचं निवेदन संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री सचिवालयासह पोलिस तसंच विभागीय आयुक्त कार्यालयात सादर करण्यात आलं आहे.

****

साखरेच्या दरवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार युवक काँग्रेसच्या वतीने आज छत्रपती संभाजीनगर इथं आंदोलन करण्यात आलं. साखरेच्या वाढत्या दराच्या निषेधार्थ राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना चहाचा रिकामा कप आणि एक किलो साखर पोस्टाने पाठवण्यात आली. साखरेच्या वाढत्या दरावर नियंत्रण आणून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

****

आज श्रावण महिन्यातल्या दुसऱ्या सोमवारी, अनेक शिव मंदिरांमध्ये पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. वेरुळ इथल्या घृष्णेश्वर, बीड जिल्ह्यात परळी इथल्या वैद्यनाथ तसंच हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ मंदिरात प्रशासनाकडून दर्शन रांगा, पिण्याचं पाणी आणि सावलीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

 

हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी इथून आज कावड यात्रा काढण्यात आली. आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात चिंचाळेश्वर महादेव मंदिरापासून दुपारी बारा वाजता यात्रेला सुरूवात झाली. जिल्हाभरातून या यात्रेसाठी भाविकांनी गर्दी केली.

****

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताने पहिल्या डावात नऊ बाद ५०३ धावा केल्या. देवदत्त पडिक्कलने ११७, ध्रूव जुरेल नाबाद ११५, ऋषभ पंत ६३ तर कर्णधार शुभमन गिलने ५० धावा केल्या. आजचा खेळ थांबला तेव्हा श्रीलंकेच्या दोन बाद आठ धावा झाल्या होत्या.

****

नेदरलँड्समध्ये सुरू असलेल्या पुरुषांच्या एफआयएच हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारताचा सामना आज अर्जेंटिनाविरुद्ध होणार आहे. संध्याकाळी सव्वा सहा वाजता सामन्याला सुरुवात होईल. उपांत्य फेरीच्या शर्यतीत भारतासाठी हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 01 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...