Friday, 14 August 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 14.08.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 14 August 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १४ ऑगस्ट २०२६ दुपारी १.०० वा.

****

देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन उद्या साजरा होत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आज संध्याकाळी सात वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्राला संबोधित करणार आहेत. राष्ट्रपतींचं हे संबोधन आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून प्रसारित केलं जाईल.

****

स्वातंत्र्यदिनानिमित्त राजधानी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या सकाळी सात वाजता ध्वजारोहण होणार आहे. त्यांनतर पंतप्रधान राष्ट्राला संबोधित करतील.

**

राज्यात जिल्हा मुख्यालयांवर संबंधित पालकमंत्री आणि मंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार असून, सामान्य प्रशासन विभागाने याबाबत परिपत्रक जारी केलं आहे. मुंबईतील मंत्रालयात सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी राज्याचा मुख्य शासकीय स्वातंत्र्यदिन समारंभ होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. पुण्यात राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. राज्यातल्या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी एकाचवेळी ध्वजारोहण करण्यात येणार आहे.

****

विभाजन विभीषिका स्मृति दिन देशभरात आज पाळला जात आहे. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं, मात्र त्यासाठी देशाची फाळणी होऊन मोठी किंमत मोजावी लागली. या फाळणीमुळे कोट्यवधी बंधू-भगिनी विस्थापित झाले आणि हिंसाचारात अनेकांनी प्राण गमावले. त्यांच्या या त्यागाची, संघर्षाची आणि बलिदानाची आठवण ठेवण्यासाठी हा दिवस पाळला जातो.

विभाजन विभीषिका स्मृति दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फाळणीच्या वेळी प्राण गमावलेल्या नागरीकांना आदरांजली वाहिली आहे. फाळणीच्या भीषण शोकांतिकेत असंख्य कुटुंबे उध्वस्त झाली, प्रियजन दुरावले आणि अनंत वेदना सहन कराव्या लागल्या. मात्र, या संकटावर मात करत लोकांनी शून्यातून विश्व निर्माण केलं, अशा शब्दांत पंतप्रधानांनी पीडितांच्या धैर्याचं स्मरण केलं.

****

स्वातंत्र्यदिना निमित्त पोलीस, अग्निशमन, गृहरक्षक आणि नागरी संरक्षण तसंच सुधारात्मक सेवा दलाच्या एकूण एक हजार ५७ जणांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर झाली आहेत. यात एकूण ३०१ शौर्य पदकं जाहीर झाली असून, यात २७२  पोलिस कर्मचारी आणि २९ अग्निशमन दलाच्या जवानांचा समावेश आहे. विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक ९२ जणांना जाहिर झाले असून, यामध्ये पोलीस सेवेसाठी ८३, अग्निशमन सेवेसाठी चार, नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेसाठी तीन आणि सुधार सेवेसाठी दोन पदकांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, ६६४ गुणवत्तापूर्ण सेवा पदकंही प्रदान करण्यात आली आहेत. यामध्ये पोलीस सेवेतल्या ६०६, अग्निशमन सेवेतल्या २८, नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेतल्या १८ आणि सुधार सेवेतल्या १२ जवानांचा समावेश आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. औरंगपुरा इथल्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापासून क्रांती चौकापर्यंत ही यात्रा काढण्यात येणार आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांचं आज सकाळी छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आगमन झालं. मंत्री अतुल सावे यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी आणि शासकीय ओधिकार्यांनी त्यांचं स्वागत केलं. विमानतळावरुन मुख्यमंत्री मोटारीने जालन्याकडे पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले.

****

देशातल्या ज्या कंपन्या बंद होतात, त्यातील ७६ टक्के या डिफंक्ट कंपनी म्हणजेच अश्या कंपन्या ज्या कधी सुरुच झाल्या नाहीत, आणि याबद्दलची संपूर्ण माहिती उपलब्ध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खसदार राजाभाऊ वाजे यांनी संसदेत प्रश्न विचारल्यानंतर केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातल्या ३६ हजार २११ कंपन्या बंद झाल्याची माहिती देण्यात आली, याबाबत प्रसारित झालेल्या चुकीच्या बातम्या आणि समाजमाध्यमावरच्या पोस्ट मुळे मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिलं. त्यांनी यासंदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावे पत्र लिहिलं. माध्यमांमध्ये प्रसारित झालेल्या बातम्यांमुळे अनेक कंपन्या बंद झाल्या असा आभास निर्माण झाला, मात्र त्यात तथ्य नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

धाराशिव जिल्हा प्रशासन आणि उत्स्फूर्त लोकसहभागातून शिंगोली इथल्या वन विभागाच्या जागेवर हरित धाराशिव अभियानाअंतर्गत १० लाख वृक्ष लागवडीला आज सुरुवात झाली. या अभियानात जिल्हा प्रशासनातले अधिकारी - कर्मचारी, वनस्पती शास्त्रज्ञ, विविध विद्यालयाचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था तसंच स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

****

श्रावण मासानिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरूळ इथल्या श्री घृष्णेश्वर महादेव मंदिर परिसरात शनिवार, रविवार आणि सोमवारी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. या दिवसात वेरूळ मधल्या भगवान महावीर चौक ते मालोजीराजे भोसले चौक हा रस्ता ठराविक कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. श्रावण महिन्यातल्या प्रत्येक शनिवार, रविवार आणि सोमवारी हा बदल लागू असेल.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 01 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...