Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 06 August 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०६ ऑगस्ट २०२६ सायंकाळी
६.१०
****
· 'गोबर-धन'
या राष्ट्रीय चक्रीय जैव-ऊर्जा प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची
मंजुरी
· डॉक्टरांनी संप मागं घेऊन तत्काळ कामकाज सुरू करण्याचे मुंबई
उच्च न्यायालयाचे निर्देश
· एसआयआरमधून सुटलेल्या मतदारांनाही मतदारयादीत नावं समाविष्ट
करता येईल- निवडणूक आयोगाचा निर्वाळा
· ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचं निधन;आज अंत्यसंस्कार
आणि
· जायकवाडी धरणातून होणाऱ्या विसर्गात कपात
****
केंद्रीय मंत्रिमंडळाने 'गोबर-धन' या राष्ट्रीय चक्रीय जैव-ऊर्जा प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. माहिती आणि प्रसारण
मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही
माहिती दिली. सुमारे २३ हजार ७३१ कोटी रुपयांची तरतूद असलेली ही योजना दीड लाख रोजगार
निर्माण करेल,
असं वैष्णव यांनी सांगितलं. 'गोबर-धन' योजना हा भारताच्या स्वच्छ ऊर्जेच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. ही
योजना २०२६-२७ ते २०३५-३६ या कालावधीत राबवली जाईल. यामुळे देशात 'कॉम्प्रेस्ड बायोगॅस' हा एक प्रमुख ऊर्जाास्रोत म्हणून
प्रस्थापित होईल. देशभरात चक्रीय जैव-अर्थव्यवस्था विकसित करणं, मोठ्या प्रमाणावर खाजगी गुंतवणूक आकर्षित करणं आणि देशांतर्गत कॉम्प्रेस्ड बायोगॅसचे
उत्पादन सुमारे दहा पटीने वाढवणं, हे या योजनेचे उद्दिष्ट असल्याचं
वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले -
बाईट - माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी
वैष्णव
****
नीट पेपरफुटीप्रकरणी आंदोलकांवर झालेल्या कारवाईच्या मुद्द्यांवरुन
संसदेत विरोधकांनी आजही गदारोळ केला. या गदारोळातच लोकसभेत कररचना आणि इतर कायदेसुधारणा
विधेयक चर्चेविना मंजूर झालं. त्यानंतर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेत
आज विरोधकांच्या गदारोळातच वाणिज्य, उद्योग, तसंच रसायन आणि खते विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीचे अहवाल मांडण्यात आले.
****
वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाची नीट परीक्षा पुढच्या वर्षीपासून
संगणकआधारित घेण्याचं नियोजन आहे. त्यासंदर्भात केंद्र सरकारनं दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावर
याचिकाकर्त्यांनी आणि डॉक्टरांच्या संघटनांनी म्हणणं मांडावं असे निर्देश सर्वोच्च
न्यायालयानं आज दिले. नीट पेपर फुटीसंदर्भातल्या याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं
हे निर्देश दिले.
****
राज्यातल्या डॉक्टरांनी तातडीनं संप मागं घ्यावा आणि कामाला
सुरुवात करावी,
असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. या डॉक्टरांची
बाजू आपण ऐकून घेऊ, असं आश्वासनही प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती
रवींद्र घुगे यांच्या पीठानं दिलं. मेडिकल फार्माकॉलॉजीत प्रमाणपत्र अभ्यासक्रम केलेल्या
होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणी करायची परवानगी देण्याच्या
महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाविरोधात भारतीय वैद्यकीय संघटनेनं २४ तासांचा देशव्यापी
संप पुकारला होता.
सरकारच्या या निर्णयाबाबत बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
म्हणाले -
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
महाराष्ट्रात रोजगार करायचा असेल, तर
मराठीशी नाळ जोडलीच पाहिजे, मराठी ही सक्तीची नव्हे, तर आपुलकीची भाषा असल्याचं, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
यांनी म्हटलं आहे. मुंबई इथं हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाच्या
आढावा बैठकीत ते आज बोलत होते. या अभियानाअंतर्गत राज्यभरातील १ लाखांहून अधिक अमराठी
व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांनी व्यवहारिक मराठीचे धडे यशस्वीरित्या पूर्ण केले असून, उर्वरित चालकांनीही १५ ऑगस्टपूर्वी या संधीचा लाभ घेऊन मराठी शिकावं, असं आवाहन सरनाईक यांनी केलं. १७ ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या अभियानाचा
समारोप होणार आहे.
****
एसआयआर- अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या
मतदारांना नंतरही मतदारयादीत नावं समाविष्ट करता येईल, असं
निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. प्रारुप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना
नमुना ६,
घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करुन मतदार यादीत नाव समाविष्ट
करता येईल. त्यानंतर २७ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत संबंधित
मतदारांचं नाव समाविष्ट होऊ शकेल. अंतिम मतदार यादीतही नाव नसलेल्या मतदारांना त्यानंतर
सुद्धा नाव नोंदवता येईल, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट
केलं आहे.
****
मनोरंजन क्षेत्रात गुंतवणूक आणि वृद्धीसाठी पोषक वातावरण निर्मिती
होत असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. मुंबईत २ दिवसीय
ब्रिक्स वेव्हज बाजार परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यंदा इफ्फीसोबतच ब्रिक्स
चित्रपट महोत्सव होणार असल्याचं, माहिती प्रसारण सचिव चंचल कुमार
यांनी यावेळी सांगितलं. ब्रिक्सच्या २० देशातले ५०० हून अधिक सदस्य या परिषदेत सहभागी
झाले आहेत. या देशांतल्या विविध भाषा, नागरीकरण, परंपरांची देवाणघेवाण होण्याला या परिषदेमुळे मदत होणार असल्याचं ते म्हणाले
****
भारताला सर्जनशील अर्थव्यवस्थेचं जागतिक केंद्र करण्याचं पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांचं स्वप्न साकार करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाच्या
पायाभूत सुविधा,
आवश्यकता असल्याचं, मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत गोरेगाव इथल्या फिल्मसिटी परिसरातील प्राइम
फोकसच्या नव्या अत्याधुनिक स्टुडिओच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते
झालं,
त्यावेळी ते बोलत होते. वेव्ह्स 2025 परिषदेदरम्यान झालेल्या सामंजस्य करारानंतर अवघ्या एका वर्षात
या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला, ही उल्लेखनीय बाब असल्याचं
मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
****
तहलका मासिकाचे मुख्य संपादक तरुण तेजपाल यांना लैंगिक अत्याचार
प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठानं १० वर्षं तुरुंगवास आणि आर्थिक दंडाची
शिक्षा ठोठावली. तेजपाल यांना निर्दोष ठरवणारा म्हापसा सत्र न्यायालयाचा निर्णय, उच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवला. तेजपाल यांना गोवा पोलिसांसमोर आत्मसमर्पण करायला
न्यायालयानं २ आठवड्यांची मुदत दिली आहे. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार
असल्याचं तेजपाल यांनी सांगितलं.
****
ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचं आज दुपारी
वृद्धापकाळाने निधन झालं ते ९१ वर्षांचे होते. फेब्रुवारीमध्ये खुब्याचे हाड मोडल्यानंतर
त्यांची प्रकृती क्षीण होत गेली. आज दुपारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
आज सायंकाळी कराड इथे त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कुलकर्णी यांच्या निधनाने मराठी साहित्य क्षेत्राची हानी झाल्याची
भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. खडतर परिस्थितीतून ते मौज
या प्रथितयश नियतकालिकाच्या संपादक पदापर्यंत पोहचले. मौज च्या माध्यमातून त्यांनी
अनेक नवोदितांना लिहीतं केल्याने मराठी वाचकांना सकस, दर्जेदार
साहित्यकृतींची मेजवानी मिळाली, या शब्दात मुख्यमंत्र्यांनी
श्रीविंच्या आठवणींना उजाळा देत, श्रद्धांजली वाहिली.
'श्रीवि'
यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, तर
मराठी साहित्यविश्वातील एक संवेदनशील, अभ्यासू आणि व्रतस्थ
साहित्यिक हरपल्याची शोक भावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केली.
****
छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे अग्निवीर
तंत्रज्ञ आणि अग्निवीर ट्रेडमन या पदांसाठी भरती केली जाणार आहे. ही भरती येत्या २९
ऑगस्ट ते ११ आक्टोबर दरम्यान होणार आहे. इच्छुकांनी ०२४०-२३ ७० ३१३ या क्रमांकवर संपर्क
करण्याचं आवाहन कार्यालयातर्फे करण्यात आलं आहे.
****
डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन-इंडिया, पुणे यांच्या वतीने लातूरच्या विलास सहकारी साखर कारखान्याला सर्वोत्कृष्ट सहकारी
साखर कारखाना - २०२६ हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या यशाबद्दल पंचायत समितीच्या
लोकप्रतिनिधींनी विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशाली देशमुख यांची बाभळगाव
निवासस्थानी भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.
****
बीड जिल्ह्यात विमानतळ प्रकल्प आणि टपाल विभागाच्या पायाभूत
सुविधांबाबत खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर
मोहोळ आणि केंद्रीय दुरसंचारमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेऊन विविध मागण्यांचं
निवेदन दिलं आहे. विमानतळासाठी आवश्यक जमीन अधिग्रहण, सर्व
शासकीय मंजुरी,
सर्वेक्षण आणि इतर प्रलंबित प्रक्रिया तातडीनं पूर्ण करून कामाला
गती देण्याची मागणी करण्यात आली आहे.
****
पैठणच्या जायकवाडी धरणातून होणाऱ्या विसर्गात कपात करण्यात आली
आहे. सध्या धरणातून सहा हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाच्या
सांडव्याद्वारे सुमारे चार हजार तीनशे घनफूट, उजव्या
कालव्यातून एक हजार, तर डाव्या कालव्यातून ७०० घनफूट प्रतिसेकंद
वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. धरणात सध्या १० हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची
आवक सुरू असून,
पाणी साठा सुमारे ९३ टक्क्यांवर स्थिर आहे.
दरम्यान, हवामान विभागाने मराठवाड्यात
सगळ्या जिल्ह्यांत पुढचे पाच दिवस जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment