Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati
Sambhajinagar
Date – 31 August 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ ऑगस्ट २०२६ सायंकाळी ६.१०
****
· चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात ७
पूर्णांक ८ टक्क्यांनी वाढ
· वस्त्र आणि वस्त्रप्रावरण क्षेत्रामुळं लाखो नागरिकांना उपजीविका-
राष्ट्रपतींचं प्रतिपादन
· नेपाळच्या पुरात अजूनही ४ हजारांहून अधिक नागरिक बेपत्ता, मदत
आणि बचावकार्य सुरु
· राज्यातल्या अनुदानित खासगी वरिष्ठ महाविद्यालयांमधे सहयोगी प्राध्यापकाची ५
हजार १२ पदं भरण्यासाठी राज्य सरकारची मंजुरी
आणि
· जालना जिल्ह्यातील मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन बाजार संकुलासाठी ३
हेक्टरहून अधिक शासकीय गायरान जमीन मिळणार
****
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत
देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात ७ पूर्णांक ८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या
आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीतील ६ पूर्णांक ९ टक्के वाढीच्या तुलनेत यंदाची
कामगिरी लक्षणीय आहे. केंद्र सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी
मंत्रालयानं एप्रिल ते जून या कालावधीतील जीडीपीचे तिमाही अंदाज आज जाहीर केले. या
तिमाहीत नॉमिनल जीडीपीमध्ये १० पूर्णांक ३ टक्के, तर वास्तविक सकल वाढ
८.२ टक्के झाली. जागतिक आर्थिक आव्हानं कायम असतानाही भारतीय अर्थव्यवस्थेनं
विकासाची गती कायम राखल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. अर्थव्यवस्थेच्या वाढीवर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केलं आहे. निराशावादींचा अंदाज चुकला
आणि भारत पुन्हा एकदा प्रगतीच्या दिशेने झेपावला, असं पंतप्रधानांनी
आपल्या संदेशात म्हटलं आहे. तेलाच्या किमतीतील धक्के, पुरवठा
साखळीतील अडचणी आणि जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवरही देशाने ही वाढ साध्य
केल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले.
****
वस्त्र आणि वस्त्रप्रावरण क्षेत्र हा
देशाच्या केवळ सांस्कृतिक वारशाचाच महत्त्वाचा भाग नाही तर त्याचं लाखो नागरिकांना
उपजीविका देण्यात महत्त्वपूर्ण योगदान आहे, असं राष्ट्रपती द्रौपदी
मुर्मू यांनी म्हटलं आहे. त्या आज नवी दिल्लीत राष्ट्रीय फॅशन टेक्नॉलॉजी संस्थेच्या
पदवीदान समारंभात बोलत होत्या. देशाचा उच्च सांस्कृतिक वारसा आणि मूल्य यांच्या
आधारे जागतिक दृष्टिकोन अंगीकारण्याचं आवाहन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केलं.
सध्या या क्षेत्रात महिलांचं प्राबल्य वाढल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं.
देशभर पसरलेल्या फॅशन टेक्नॉलॉजी संस्थेच्या १८ संकुलांमधल्या विद्यार्थ्यांना
यावेळी पदवी प्रदान करण्यात आली.
****
देशात चिप उत्पादनाला चालना देण्यासाठी
केंद्र सरकारनं सेमीकॉन योजनेचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. यासाठी १ लाख २७ हजार
कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भारतीय कंपन्यांनी या चिप्सची रचना करणं, त्यांच्या
उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या उपकरणांसाठी उत्पादन केंद्रं उभारणं, सेमींकडक्टर
फॅब्स, चिप्सची जोडणी,
पॅकेजिंग आणि चाचण्या अशा सहा भागांचा समावेश या योजनेत करण्यात
आला आहे. सेमीकंडक्टर उद्योगाच्या संपूर्ण मूल्यसाखळीला आर्थिक पाठबळ देण्यात येईल, असं
सरकारनं याबाबतच्या अधिसूचनेत म्हटलं आहे.
****
नेपाळमध्ये आलेल्या पुरानंतर मदत, बचाव
आणि शोधकार्य आजही सुरू आहे. आतापर्यंत ९०३ जणांचे मृतदेह सापडले असून ४
हजारांपेक्षा जास्त नागरिक अद्याप बेपत्ता असल्याची माहिती नेपाळच्या आपत्ती
व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे. ज्या मृतदेहांची ओळख पटवणं शक्य नसेल, त्यांच्यावर
अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती नेपाळचे परराष्ट्र सचिव अमृत बहादूर राय
यांनी दिली आहे.
****
राज्यातल्या अनुदानित खासगी वरिष्ठ
महाविद्यालयांमधे सहयोगी प्राध्यापकाची ५ हजार १२ पदं भरण्यासाठी राज्यशासनाने
मंजुरी दिली आहे,
तसंच भरतीच्या वेळी मुलाखतीचं सीसीटीव्ही चित्रीकरण
अनिवार्य करण्यात आलं आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं आज यासंदर्भातली
अधिसूचना जारी केली. विद्यार्थी पटसंख्या आणि कार्यभार यासंबंधी ऑक्टोबर २०२५
मध्ये तयार केलेल्या समीकरणानुसार ही पदं मंजूर केली आहेत. संबंधित
महाविद्यालयांनी विद्यापीठ आयोगाच्या नियमांनुसार पदभरतीची प्रक्रीया करावी असं
अधिसूचनेत म्हटलं आहे. मुलाखतीचं चित्रीकरण मुलाखतीच्या दिवसापासून एक वर्षासाठी
सांभाळून ठेवावं असंही अधिसूचनेत नमूद केलं आहे.
****
राज्यात एसआयआर अर्थात मतदार याद्यांची
फेरतपासणी आणि सुधारणा मोहिमेअंतर्गत तयार करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी आज
प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिकांनी प्रारूप मतदार यादीत आपलं नाव समाविष्ट
असल्याची खात्री करून घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं
आहे. ही प्रारूप मतदार यादी voters.eci.gov.in या संकेतस्थळावर
तसंच संबंधित जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
****
राज्यातील भटके-विमुक्त समाजाच्या
सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, कौशल्य विकास, स्वयंरोजगार
आणि आर्थिक सक्षमीकरणाला प्राधान्य देण्याची गरज असल्याचं राज्यपाल जिष्णु देव
वर्मा यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजित, ‘भटके-विमुक्त दिवस’ निमित्त राज्यस्तरीय कार्यक्रमात मार्गदर्शन करत होते.
आदिवासी कुटुंबं वास्तव्यास असलेल्या ठिकाणी मुलांच्या शिक्षणाची सुविधा उपलब्ध
करून द्यावी तसंच वसतिगृह,
आश्रमशाळा, शिष्यवृत्ती, डिजिटल
शिक्षण, उच्च आणि व्यावसायिक शिक्षण तसंच संशोधनाच्या संधी वाढवण्याची आवश्यकता
असल्याचं प्रतिपादन राज्यपालांनी केलं.
****
जालना जिल्ह्यातील मंठा कृषी उत्पन्न
बाजार समितीच्या नवीन बाजार संकुलासाठी मौजे ठेंगेवडगाव येथील ३ हेक्टर ९५ आर
शासकीय गायरान जमीन देण्यास राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय
घेतला. नाममात्र १ रुपया कब्जेहक्क रकमेवर जमीन बाजार समितीला देण्यात येणार आहे.
ही जमीन केवळ बाजार संकुलासाठी वापरता येणार असून, मोजणी, हद्द
निश्चिती आणि आवश्यक परवानग्या घेणं बंधनकारक राहणार आहे.
****
धाराशिव इथं उद्या १ आणि परवा २
सप्टेंबर रोजी,
केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देणारं ‘मल्टिमीडिया
छायाचित्र प्रदर्शना’चं आयोजन करण्यात येणार आहे. केंद्र सरकारला १२ वर्षे पूर्ण
झाल्याच्या औचित्यानं केंद्रीय संचार ब्युरोच्या सोलापूर क्षेत्रीय कार्यालय आणि
जिल्हा प्रशासनानं हे प्रदर्शन आयोजित केलं आहे. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर
यांच्या हस्ते उद्या सकाळी १० वाजता या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात येणार आहे.
****
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी
कर्जमुक्ती योजनेअंतर्गत वयस्कर तसंच बोटांचे ठसे न जुळणाऱ्या शेतकऱ्यांना आधार
प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करता यावी, यासाठी विशेष कार्यपद्धती
निश्चित करण्यात आली आहे. संबंधित शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात
जाऊन आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, असं आवाहन सहकार
विभागाचे विभागीय सहनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील
गड-किल्ले आणि राज्य संरक्षित स्मारकांचे संरक्षण, संवर्धन आणि
परिसरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली
ही समिती कार्यरत राहणार आहे. विविध प्रशासकीय विभागांच्या समन्वयातून ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यावर भर दिला जाणार
आहे. या समितीत महसूल,
पोलिस, वन, पुरातत्त्व, भूमी
अभिलेख, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकाऱ्यांचा तसंच अशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश
केला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या ऑरिकच्या
शेंद्रा आणि बिडकीन औद्योगिक क्षेत्रात भूखंड वाटपाची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली
आहे. इच्छुकांना ४ सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. याअंतर्गत बिडकीनमधील
३० तर शेंद्रा इथल्या ११ अशा एकूण ४१ भूखंडांसाठी ऑरिक प्रशासनानं ऑनलाइन अर्ज
मागवले आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर
इथं समृद्धी महामार्गावर हडस पिपंळगावजवळ ट्रॅव्हल्स कंटेनरवर आदळली. या अपघातात
एक जण जागीच ठार झाला. तर १५ जण जखमी झाले.
आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. हेमंत हरिश्चंद्र दाभाडे असं
अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे.
****
आज तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त विविध
शिव मंदिरांमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. बीड जिल्ह्यात परळी इथल्या
वैद्यनाथ मंदिरासह जिल्ह्यातल्या विविध महादेव मंदिरांमध्ये भाविक मोठ्या संख्येनं
दाखल होत आहेत. गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख मंदिर परिसरात पोलिस प्रशासनाकडून
बंदोबस्त ठेवण्यात आला असून, भाविकांची सुरक्षितता आणि वाहतूक सुरळीत
ठेवण्यावर लक्ष देण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर इथल्या
ज्योर्तिंलींगाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक दाखल होत आहे. काल रात्रीपासून
ब्रह्मगिरीला महाप्रदक्षिणा म्हणजेच फेरीला प्रारंभ झाला. तिसऱ्या श्रावणी सोमवारी
या ज्योर्तिलिंगाचं विशेष महत्व असल्याने यंदा तीन लाखाहून अधिक भाविक दाखल होतील
असा अंदाज आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या २८० अतिरीक्त बसगाड्या त्र्यंबकेश्वरसाठी
सोडण्यात आल्या आहेत.
दरम्यान, वेरुळ इथल्या श्री
घृष्णेश्वर मंदिरात होणारी भाविकांची गर्दी पाहता भगवान महावीर चौक ते मालोजीराजे
भोसले चौक हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी
विनय गौडा जी.सी. यांनी जारी केले आहेत.
****
No comments:
Post a Comment