Tuesday, 1 September 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.09.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 01 September 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ सप्टेंबर २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर सात पूर्णांक आठ दशांश टक्के

·      राज्यात एसआयआर अंतर्गत तयार करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

·      अनुदानित खासगी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहयोगी प्राध्यापकांची पाच हजार १२ पदं भरण्यासाठी राज्य सरकारची मंजुरी

·      मराठा आरक्षण आंदोलकांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक, मंत्री उदय सामंत यांची माहिती

आणि

·      नांदेड तसंच लातूर जिल्ह्यातल्या अपघातात सात जणांचा मृत्यू

****

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादन -  जीडीपीत सात पूर्णांक आठ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत GDP वाढीचा दर सहा पूर्णांक नऊ टक्के इतका होता. जागतिक आर्थिक आव्हानं आणि भू-राजकीय अनिश्चितता असतानाही भारतीय अर्थव्यवस्थेनं विकासाची गती कायम राखली आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने एप्रिल ते जून या कालावधीचे GDP चे तिमाही अंदाज काल जाहीर केले.

जीपडीपीच्या या वाढीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केलं. निराशावादींचा अंदाज चुकला आणि भारत पुन्हा एकदा प्रगतीच्या दिशेने झेपावला, असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****

राज्यात मतदार याद्यांचं विशेष सखोल पुनरिक्षण - एसआयआर अंतर्गत तयार करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी काल प्रसिद्ध करण्यात आली. नागरिकांनी या यादीत आपलं नाव असल्याची तसंच इतर तपशील अचूक असल्याची खात्री करावी, असं आवाहन राज्य निवडणूक आयोगानं केलं आहे.

विशेष सखोल पुनरीक्षणानंतर राज्याच्या प्रारुप मतदार यादीत सात कोटी ७१ लाख ६५ हजार ५६२ मतदारांचा समावेश आहे, तर २ कोटींहून अधिक मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत. पुणे, ठाणे, मुंबई उपनगर, नागपूर, नाशिक या जिल्ह्यातून सर्वाधिक तर सिंधुदुर्ग, हिंगोली आणि गडचिरोलीतून सर्वात कमी मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत.

मतदार यादीतून नाव वगळलेल्या मतदारांना आजपासून ३० सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. सर्व कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर चार नोव्हेंबर रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होईल. याविषयी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम म्हणाले,

बाईट- राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम

****

राज्यातल्या अनुदानित खासगी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहयोगी प्राध्यापकांची पाच हजार १२ पदं भरण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली आहे, तसंच भरतीच्या वेळी मुलाखतीचं सीसीटीव्ही चित्रीकरण अनिवार्य करण्यात आलं आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं काल यासंदर्भातली अधिसूचना जारी केली. विद्यार्थी पटसंख्या आणि कार्यभार यासंबंधी ऑक्टोबर २०२५ मध्ये तयार केलेल्या समीकरणानुसार ही पदं मंजूर केली आहेत. संबंधित महाविद्यालयांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांनुसार पदभरतीची प्रक्रीया करावी असं या अधिसूचनेत म्हटलं आहे.

****

मागण्या पूर्ण झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही आणि आंदोलनासाठी मुंबईला जाणारच, असा निर्धार मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी काल पुन्हा व्यक्त केला. जरांगे यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. त्यांच्याशी चर्चा करतानाच ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नसल्याचं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत दिलं. तर जरांगे यांना मुंबईत यायची गरज भासणार नाही, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं आमदार प्रसाद लाड म्हणाले.

****

समृद्धी महामार्गावर २७ ऑगस्टच्या मध्यरात्री प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीला नाशिक पोलिसांनी जेरबंद केलं. धाराशिव पोलिसांच्या मदतीनं कळंब आणि वाशी तालुक्यात विशेष मोहीम राबवून सहा संशयितांना ताब्यात घेण्यात आलं. नाशिक ग्रामीण पोलिसांनी १० पथकांच्या मदतीनं ४८ तास शोधमोहीम राबवली. २७ ऑगस्टच्या रात्री समृद्धी महामार्गावर सिन्नर तालुक्यातल्या वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुशिंगपूर आणि मलढोण शिवारात छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली इथल्या प्रवाशांची वाहनं पंक्चर करून लाखोंची लूट करण्यात आली होती.

****

धाराशिव इथं केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देणारं मल्टिमीडिया छायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन आज खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे. केंद्र सरकारला १२ वर्ष पूर्ण झाल्याच्या औचित्यानं केंद्रीय संचार ब्युरोचं सोलापूर क्षेत्रीय कार्यालय आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमानं हे दोन दिवसीय प्रदर्शन आयोजित केलं आहे.

****

कार्यालयीन वेळेत गैरहजर असलेल्या नांदेड महापालिकेच्या ५४ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. प्रशासकीय कामकाजात गतिशीलता आणण्यासाठी नियुक्त तपासणी पथकाने काल सकाळी कार्यालयीन वेळेत महापालिकेच्या विविध विभागांची पाहणी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

****

श्रावणी सोमवारनिमित्त नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यातल्या कैलास टेकडी आणि सहस्त्रकुंड इथल्या महादेवाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या जीपला अपघात होऊन चार जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. दीपला नाईक तांडा इथं काल संध्याकाळी हा अपघात झाला. हे सर्व भाविक तेलंगणा राज्यातले रहिवासी आहेत.

****

लातूर जिल्ह्यात रेणापूर ग्रामीण रुग्णालयासमोर भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत तीन जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतरही प्रशासनाने रस्ते सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना न केल्याचा आरोप करत काल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. ग्रामीण रुग्णालय, पंचायत समिती, तहसील कार्यालय आणि न्यायालय यासारखी महत्त्वाची ठिकाणं याच मार्गावर असतानाही गतिरोधक का नाहीत, असा प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केला.

****

ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसांपासून जालना इथं अन्नत्याग उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते दीपक रणनवरे यांच्या उपोषणाची राज्य सरकारनं तातडीने दखल घेऊन त्यांच्या मागण्या मंजूर कराव्यात, अशी मागणी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी केली आहे. त्यांनी काल रणनवरे यांची भेट घेतली. ब्राह्मण समाजातल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, भिक्षुकी करणाऱ्यांना मानधन आणि परशुराम आर्थिक विकास महामंडळाला भरीव निधी, आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या मागण्यांसाठी हे उपोषण सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण तातडीने लागू करण्याच्या मागणीसाठी जालना जिल्हा मातंग समाजाच्या वतीनं काल महामोर्चा काढण्यात आला. आरक्षण उपवर्गीकरण समर्थन संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात जिल्हाभरातून आलेल्या समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

****

बीड जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागातल्या प्रशासकीय गैरकारभाराच्या चौकशीचे आदेश विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी नुकतेच दिले. त्या पार्श्वभूमीवर चौकशी निष्पक्ष होण्यासाठी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विभागातून हटवण्यात यावं, अशी मागणी राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेनं केली आहे.

****

खासगी कोचिंग क्लासेसवर नियंत्रण आणण्यासाठी आणि नोंदणी अनिवार्य करण्यासाठी राज्य शासनाकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या नव्या कायद्याला लातूर जिल्ह्यातल्या कोचिंग क्लासेस चालक आणि शिक्षकांनी विरोध दर्शवला आहे. या निर्णयाच्या विरोधात काल लातूर क्लासेस असोसिएशन आणि प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततापूर्ण धरणे आंदोलन करण्यात आलं.

****

गणेश मंडळांना बीड जिल्हा पोलीस दलानं ऑनलाइन पोलीस परवानगीची सुविधा उपलब्ध केली आहे. मंडळांनी नागरिक सेवा संकेतस्थळावर ‘गणेश फेस्टिव्हल परमिशन ॲप्लिकेशन’द्वारे अर्ज करावा. अर्जानंतर संबंधित पोलीस ठाण्याचे अंमलदार प्रत्यक्ष भेट देऊन आवश्यक पूर्तता करतील आणि ऑनलाइन परवाना देण्यात येईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यांनी दिली.

****

श्री क्षेत्र तुळजापूर इथं होणारा श्री तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव ११ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. परंपरेनुसार त्याआधी तीन ऑक्टोबरला देवीची मंचकी निद्रा सुरू होणार असून,११ ऑक्टोबर रोजी घटस्थापना होईल. भाविकांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक काल पार पडली. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून विद्युत विभागाकडून २४ तास वीजपुरवठा करण्यात येणार आहे, तसंच आरोग्य विभागाकडून शहरात येणाऱ्या सहा प्रमुख मार्गांवर २२ प्रथमोपचार केंद्रं उभारण्यात येणार आहेत.

****

हवामान

राज्यात पुढील दोन दिवस बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागनं व्यक्त केली आहे. विदर्भात भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाची, तर मराठवाड्यात हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 01 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...