Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 15 September 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १५ सप्टेंबर २०२६
सायंकाळी ६.१०
****
· दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार पूर्ण ताकदीनं
शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
· साखर कारखान्यांना सॉफ्ट लोन अर्थात सवलतीच्या दरात कर्ज देण्याचा
राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
· सणाच्या काळात नागरिकांना त्रासदायक भूमिका घेऊ नये-मनोज जरांगे
यांना सरकारचं आवाहन-मोजक्या सहकाऱ्यांसह मनोज जरांगे यांचं मुंबईकडे प्रयाण
आणि
· राज्यभरात दीड दिवसाच्या गणपतींचं भक्तिमय वातावरणात विसर्जन
****
दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार पूर्ण ताकदीनं
शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली
आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. अवर्षणामुळे निर्माण
झालेल्या परिस्थितीचं सर्वेक्षण लवकरच सुरू करण्यात येईल, असं
मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले –
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
रायगड जिल्ह्यात दिघी इथे देशातलं सर्वात मोठं जहाजबांधणी केंद्र
उभं राहणार असून, यासाठी एकूण २७ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी
सामंजस्य करार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही माहिती दिली. या करारातून
दिघी इथे युद्धनौकांसह, व्यापारी आणि व्यावसायिक जहाजांच्या
निर्मितीचं काम सुरू होणार असून, जहाज बांधणी, जहाज तोडणी,
जहाज दुरुस्ती आणि पुनर्वापर अशी सर्व कामंही इथे होणार आहेत.
या प्रकल्पातून १५ हजार प्रत्यक्ष आणि ७५ हजार अप्रत्यक्ष, रोजगार
निर्माण होणार आहेत.
****
सहकारी साखर कारखान्यांची २०२५-२६ च्या गाळप हंगामातली एफ आर
पी ची थकबाकी देण्यासाठी आणि पुढच्या वर्षीच्या गाळप हंगामासाठी, या कारखान्यांना सॉफ्ट लोन अर्थात सवलतीच्या दरात कर्ज देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या
आजच्या बैठकीत घेण्यात आला. यासाठी सातशे अडोतीस कोटी रुपयांच्या तरतुदीलाही मान्यता
देण्यात आली. या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांना मोठा दिलासा
मिळणार आहे.
राज्य शासनाची पंचवीस प्रमुख धोरणं आणि पंचवीस प्रमुख योजनांचं
विश्लेषण आणि मूल्यांकन करण्यासाठी “महाराष्ट्र तांत्रिक सहाय्यता कक्ष- अर्थात महा-टॅक”
स्थापन करण्याला मंत्रिमंडळानं मान्यता दिली. मुंबईतली भारतीय व्यवस्थापन संस्था-आयआयएम
आणि,
योजना तसंच धोरणविषयक संशोधन केंद्र-क्रिस्प, यांच्या शिफारशींनुसार हे मूल्यांकन होणार आहे. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती तसंच औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५
मध्ये सुधारणा करण्यालाही आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात महसूल विभागाच्या
‘महाखनिज दोन’
या प्रणाली आणि मोबाईल ॲपचं लोकार्पण केलं, तसंच राज्य महाखनिज नियंत्रण कक्षाचं उद्घाटन केलं. महाखनिज दोन, या प्रणालीतल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे गौण खनिज क्षेत्राचं सर्वेक्षण, वाहतुकीवर देखरेख आणि परवान्यांची डिजिटल पडताळणी अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.
याशिवाय,
अनियमितता ओळखणं आणि महसुलातील तफावत व गळती कमी करण्यासाठीही
ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे.
****
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सणाच्या काळात लोकांना कुठलाही
त्रास होणार नाही अशा पद्धतीनं निर्णय घेणं अपेक्षित असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. आज मनोज जरांगे पाटील जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली
सराटी गावातून आंदोलन करण्यासाठी मुंबईकडे रवाना झाल्यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या
प्रश्नाला ते उत्तर देत होते. जरांगे यांनी केलेल्या तेरा मागण्यांपैकी बारा मागण्या
सरकारनं मान्य केल्या असून, राहिलेली मागणी पूर्ण करण्यात
कोणती कायदेशीर अडचण आहे, आणि न्यायालयाच्या विरोधात गेल्यास
मराठा समाजाचं संभाव्य नुकसान, याबाबत जरांगे यांना सांगितलं
असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. दरम्यान, सरकार
समाजाच्या हिताची सकारात्मक भूमिका घेत असताना, आंदोलकांनी
राजकीय भूमिका घेऊ नये, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांनी म्हटलं आहे.
****
दरम्यान, मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी
मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथून मोजक्या दहा सहकाऱ्यांसमवेत आज साडे अकराच्या
सुमारास मुंबईकडे प्रयाण केले आहे. दोन वाहने आणि दोन रुग्णवाहिका त्यांच्यासोबत आहेत.
त्यांच्या उपोषणाचा आज १८ वा दिवस आहे. मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी जरांगे यांच्या
प्रकृतीची जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांनी तपासणी केली.
****
आज दूरदर्शनचा ६७ वा स्थापना दिवस आहे. १९५९ मध्ये आकाशवाणीअंतर्गत
प्रायोगिक दूरचित्रवाणी सेवा म्हणून दूरदर्शनची सुरुवात झाली. गेल्या ६७ वर्षांत दूरदर्शन
हे माहिती प्रसार, संस्कृतीचं जतन आणि राष्ट्रीय एकात्मतेचं
महत्त्वाचं माध्यम बनलं आहे.
****
आज अभियंता दिन आहे. भारतरत्न सर एम.विश्वेश्वरैया यांच्या जन्मदिनाच्या
औचित्यानं हा दिवस साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांनी एम. विश्वेश्वरैया यांना
आदरांजली वाहिली आहे.
****
दीड दिवसाच्या गणपतींचं भक्तिमय वातावरणात विसर्जन झालं. यासाठी
मुंबई,
पुणे, ठाणे, नाशिक आणि कोकणासह राज्यभरातल्या प्रमुख नद्या, नैसर्गिक
आणि मुद्दाम तयार केलेले जलाशय, या ठिकाणी विसर्जनासाठी विशेष
व्यवस्था करण्यात आली होती.
****
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत, येत्या १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अभियान राबवण्यात येणार आहे. जालना जिल्ह्यातल्या सर्व गावांमधल्या नागरिकांसह
शाळा-महाविद्यालयं, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट आणि विविध विभागांनी यात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं, असं आवाहन जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर कृष्णकांत कनवारिया
यांनी केलं आहे. याशिवाय, येत्या १ ऑक्टोबरला ‘एक दिवस,
एक तास, एक सोबत’ या संकल्पनेतून स्वच्छतेसाठी देशव्यापी श्रमदान करण्यात येणार असल्याचंही कनवारिया
यांनी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातली पर्जन्यमानाच्या स्थितीत अपेक्षित
बदल नसल्याने,
त्यामुळे कृषी, महसूल, ग्रामविकास तसंच अन्य सर्व यंत्रणांनी पर्यन्यमान आणि पीक स्थितीवर बारकाईने लक्ष
ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले आहेत. यासंदर्भात आज झालेल्या
आढावा बैठकीत ते बोलत होते. दरम्यान, आज सकाळी जिल्हाधिकारी गौडा यांनी गंगापूर तालुक्यातल्या
खडकनारळा इथे जाऊन प्रत्यक्ष पिकांची पाहणीही केली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र वितरणासाठी
आज झालेल्या १५ विशेष मंडळस्तरीय शिबिरांमध्ये एकूण ३१ अर्ज प्राप्त झाले. यामध्ये, छत्रपती संभाजीनगर तालुक्यात १, पैठण तालुक्यात ११, वैजापूर तालुक्यात ४, गंगापूर तालुक्यात ५ आणि खुलताबाद
तालुक्यात १० अर्ज प्राप्त झाले आहेत.
****
जालना शहरातल्या शास्त्रीनगर भागातला स्वस्त धान्य दुकानदार
शैलेश कक्कड याला दोन हजार रुपशे लाच घेताना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली.
तक्रारदाराचं बंद असलेलं रेशनकार्ड सुरू करून त्यावर धान्य देण्यासाठी त्यानं ही लाच
मागितली होती.
****
येत्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी, म्हणजे सतरा तारखेला, नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड
तालुक्यातल्या बारड इथे प्रशासनातर्फे विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मराठवाडा
मुक्तिसंग्रामात बारड इथल्या तेहतीस स्वातंत्र्यसैनिकांनी सहभाग घेऊन मोलाचं योगदान
दिलं होतं,
या शूर स्वातंत्र्यसैनिकांचं स्मरण करण्यासाठी आणि त्यांच्या
कुटुंबियांचा सन्मान करण्यासाठी हा विशेष कार्यक्रम होणार आहे.
****
No comments:
Post a Comment