Regional Marathi Text Bulletin,
Chhatrapati Sambhajinagar
Date – 13 September 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १३ सप्टेंबर २०२६
सायंकाळी ६.१०
****
· भू-राजकीय आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकजुटीनं प्रयत्न आवश्यक, पंतप्रधान मोंदींचं ब्रिक्स देशांना आवाहन, १८व्या
ब्रिक्स शिखर परिषदेचा यशस्वी समारोप
· इतिहास भारतीय दृष्टीकोनातून प्रामाणिकपणाने मांडणं हीच वसाहतवादापासून
मुक्ती मिळविण्याची प्रक्रिया - गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन
· केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ वायू सर्वेक्षणात छत्रपती संभाजीनगरचा
१८ वा क्रमांक
आणि
· उद्या घरोघरी येणार सर्वांचा लाडका गणपती बाप्पा, बाप्पांना आणण्यासाठी बाजरपेठ गजबजली
****
भारताच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत आयोजित १८वी ब्रिक्स शिखर
परिषद २०२६ ची आज यशस्वी सांगता झाली. दोन दिवस चाललेल्या या परिषदेत जागतिक अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि सहकार्यावर महत्त्वाच्या चर्चा झाल्या. ब्रिक्स परिषदेच्या समारोपप्रंसगी
भारताने अध्यक्षपदाची सूत्रे पुढील अध्यक्ष चीनकडे सोपवली आहेत. दरम्यान, नवी दिल्लीत सुरू असलेल्या ब्रिक्स परिषदेत काल सर्व सदस्य देशांनी नवी दिल्ली
जाहीरनामा स्वीकारल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनं सदस्य देशांची प्रशंसा केली आहे.
****
ब्रिक्स हा फक्त देशांचा समूह नसून समस्यांवरचे तोडगे आणि चर्चांची
एक परिसंस्था आहे आणि गेल्या २ दिवसांमध्ये हीच धारणा आणखी बळकट झाली आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. लवचिकता, नवोन्मेष,
सहकार्य आणि शाश्वतता या विषयावरच्या सत्राचा समारोप करताना
ते बोलत होते. नवी दिल्लीत होत असलेल्या ब्रिक्स परिषदेत संमत झालेला नवी दिल्ली जाहीरनामा, सामायिक दृष्टिकोन आणि भविष्यातल्या सहकार्याला एक स्पष्ट दिशा देईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
****
वाढत्या भू-राजकीय तणावाचा जगभरातल्या सामान्य नागरिकांच्या
जीवनावर विपरीत परिणाम होत असून या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आणि विशेषतः ग्लोबल
साऊथ मधे सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी ब्रिक्स देशांनी एकजुटीनं काम करणं
आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स शिखर परिषदेच्या खुल्या सत्रात
सांगितलं. ‘तंत्रज्ञान तसंच महत्त्वपूर्ण खनिजांचा हत्यार म्हणून वापर’ ही गंभीर बाब
असून सर्वसमावेशक प्रगती आणि समृद्धीच्या मार्गात यामुळे अडथळा येऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी सध्या युद्धांमध्ये गुंतलेल्या रशिया, इराण यासह चीनसारख्या राष्ट्रांचे राष्ट्रप्रमुख या शिखरपरिषदेत हजर होते. भारताच्या
अध्यक्षतेखाली लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या चार मुद्यांवर ब्रिक्सने लक्ष केंद्रित केलं आहे. आपल्या
सहकार्य आणि पाठिंब्यामुळे आपल्या सामायिक दृष्टिकोनाचं ‘सर्वांच्या हिताचं’ रूपांतर
करण्यात यशस्वी झालो आहोत, याचा आनंद असल्याचं मोदी यांनी
सांगितलं.
बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी
****
केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन
आणि हवामान बदल मंत्रालयाच्या ‘स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२६ मध्ये छत्रपती संभाजीनगर
महानगरपालिकेनं उल्लेखनीय कामगिरी करत १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ४८ शहरांच्या
श्रेणीत देशात १६ वा क्रमांक पटकावला आहे. शहराला २०० पैकी १७८ गुण प्राप्त झाले आहेत.
विशेष म्हणजे,
मागील वर्षी छत्रपती संभाजीनगरचा ३४ वा क्रमांक होता. यंदा शहराने
तब्बल १८ क्रमांकांची सुधारणा करत देशातील आघाडीच्या शहरांच्या यादीत स्थान मिळवलं
आहे. ही कामगिरी शहरातील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी महानगरपालिकेमार्फत सातत्यानं
राबवण्यात येत असलेल्या विविध उपाययोजना, प्रभावी कचरा व्यवस्थापन, धूळ नियंत्रण, कचरा जाळण्यास प्रतिबंध, पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांमध्ये करण्यात आलेल्या जनजागृतीचं फलित
असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
आपला इतिहास, परंपरा आणि ज्ञानाचं जतन करणाऱ्या
देशाला कायमचं गुलाम बनवता येत नाही आणि भारत याचं उत्तम उदाहरण असल्याचं केंद्रीय
गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईतल्या ऐतिहासिक एशियाटिक सोसायटीत
आयोजित कार्यक्रमात बोलत होते. इतिहास पुसून टाकला जात असल्याचा आरोप करणाऱ्यांचं म्हणणं
यावेळी त्यांनी खोडून काढलं. ते म्हणाले -
बाईट - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
भविष्याचा वेध घेण्यासाठी इतिहास माहीत असणं अत्यंत गरजेचं असतं.
एशियाटिक सोसायटीच्या रूपानं अशा प्राचीन इतिहासाचं जतन आणि संवर्धन होत आहे असं मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
भावी पिढ्यांना आपला समृद्ध इतिहास समजला पाहिजे, यासाठी एशियाटिक सोसायटीतल्या प्राचीन वारशाचं जतन आणि संवर्धन करणं हे आपलं कर्तव्य
आहे,
असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
****
गणेशेत्सवाची तयारी सर्वत्र उत्साहानं सुरु आहे. विघ्नहर्ता
श्री गणरायाचं उद्या उत्साहात, आनंदात आगमन होणार आहे. घरगुती
गणपतींसह सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशांचंही ढोलताशांच्या गजरात आगमन होणार आहे.
राज्यात अनेक ठिकाणी सार्वजनिक उत्सवांच्या मोठमोठ्या मूर्ती आधीच मंडपात विराजमान
झाल्या आहेत. त्यानिमित्ताने छत्रपती संभाजीनगर आणि जिल्हाभरात उद्याच्या गणेश चतुर्थी
निमित्त बाजारपेठा गजबजल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील संभाजीपेठ, गजानन महाराज मंदिर, सिडको, हडकोसह शहरातील विविध भागांमध्ये गणेश मूर्तींची विक्री केंद्र थाटली आहेत. यावेळी
पर्यावरणपूरक गणेश मूर्ती, मखर तसंच सजावटीचं साहित्य खरेदीसाठी
अबालवृद्धांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. पोलिस दलाकडून गणेशोत्सवाच्या
काळात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
****
नांदेड इथं आज अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ
मोर्चा काढण्यात आला. शहरातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापासून निघालेला
हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गेला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्याचे
निवेदन देण्यात आलं. सचिन साठे यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं.
****
जालना शहरातल्या चंदनझिरा परिसरात महापालिकेच्या पथकानं आज उघड्यावर
मांस विक्री करणाऱ्यांवर कारवाई करत १४ दुकानांना कुलूप ठोकले. महापालिका आयुक्त अंजली
शर्मा यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. शहरात उघड्यावर होणाऱ्या मांस विक्रीसह
नियमबाह्य व्यवसायांविरोधात ही कारवाई यापुढंही सातत्यानं सुरू राहणार असल्याचं महापालिका
आयुक्त अंजली शर्मा यांनी सांगितलं आहे.
****
बीड शहरातील ‘कल्पतरू प्रतिष्ठान’च्या पुढाकारातून सार्वजनिक
गणेशोत्सव मंडळांसाठी उत्कृष्ट देखावा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेमध्ये
सांस्कृतिक,
ऐतिहासिक, धार्मिक, आध्यात्मिक,
शैक्षणिक, वैज्ञानिक तसेच सामाजिक संदेशाला
प्राधान्य दिलं जाणार आहे. यात प्रथम क्रमांकास १ लाख, द्वितीय
क्रमांकास ७५ हजार, तर तृतीय क्रमांकास ५१ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह
देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी मंडळांनी नाव नोंदणी करावी, असं आवाहन आयोजक डॉ. योगेश क्षीरसागर आणि डॉ. सारिका क्षीरसागर यांनी केलं आहे.
****
राज्यात स्वयंसहायता समूहातील महिलांचे काम उल्लेखनीय असून या
महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं सामाजिक
न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी म्हटलं
आहे. स्वयं सहायता समूह सक्षम करण्यासाठी जिल्ह्यातील पर्यटनस्थळी समूहाने तयार केलेले
अन्न विक्रीसाठी फूड व्हॅन जिल्हा नियोजन समितीमधून मंजूर करणार असल्याचंही ते म्हणाले.
ते आज छत्रपती संभाजीनगर इथं, उमेद स्वयंसहायता समूह, ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या गणपतीची मूर्ती विक्री करण्यासाठी जिल्हा
परिषदेच्या वतीनं आयोजित गणपती महोत्सव २०२६ मध्ये बोलत होते.
****
No comments:
Post a Comment