Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 11
September 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ सप्टेंबर २०२६ दुपारी १.०० वा.
****
उद्यापासून सुरू होणाऱ्या १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी
जगभरातले नेते नवी दिल्लीत एकत्र येत आहेत. या परिषदेत विविध महत्त्वाच्या विषयांवर
सकारात्मक आणि फलदायी चर्चा होईल आणि या परिषदेचा मुख्य उद्देश जागतिक कल्याण हाच असेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. 'भारत मंडपम' इथं आयोजित या दोन दिवसीय शिखर परिषदेत ११ प्रमुख विकसनशील आणि
उदयोन्मुख अर्थव्यवस्था एकत्र येणार आहेत.
या परिषदेसाठी विविध देशांचे राष्ट्रप्रमुख, परराष्ट्रमंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि प्रमुख प्रतिनिधी भारतात दाखल होत आहेत.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामाफोसा, युगांडाचे उपराष्ट्रपती जेसिका अलुपो, ब्राझीलचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मॉरो व्हिएरा, नायजेरिया च्या परराष्ट्र मंत्री बियांका ओडुमेग्वु-ओजुक्वु
आणि उरुग्वे च्या परराष्ट्र मंत्री मारियो लुबेत्किन आज दिल्लीत दाखल झाले.
****
दरम्यान, ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत आयोजित ब्रिक्स
व्यापार मंच २०२६ चं उद्घाटन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या
हस्ते झालं. आपल्या आर्थिक शक्तिचं रुपांतर आपल्या लोकांसाठी रोजगार, धन आणि समृद्धिमध्ये करण्यासाठी एकत्र काम करण्याचं आवाहन
त्यांनी, ब्रिक्स शिखर संमेलनात सहभागी होत
असलेल्या देशांना केलं.
केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांनी यावेळी बोलताना, संतुलित व्यापार आणि सेवा तसंच डिजिटल क्षेत्रात अधिक
सहकार्याची गरज अधोरेखित केली. ग्लोबल साऊथमधल्या देशांना संगणकीय संसाधनांची उपलब्धता, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातलं सहकार्य, तंत्रज्ञानाची देवाणघेवाण आणि सर्वसमावेशक डिजिटल विकासावर
त्यांनी भर दिला.
****
उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी नांदेड इथं झालेल्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त करून
मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. मृतांच्या वारसांना पंतप्रधान
राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपयांची सानुग्रह मदत, तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.
नांदेड - भोकर रस्त्यावर सीताखंडी घाटात काल संध्याकाळच्या
सुमारास एका ट्रकने मॅजिक ऑटोला धडक देऊन झालेल्या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले.
****
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी
यांनी आज मुंबईत One Tag या सुविधेची सुरुवात
केली. यात fast tag
portability ची सुविधा असून बँक
खातं बदललं तरी जुन्याच fast tag ला ते सहज जोडण्याची सुविधा देण्यात आली आहे. राजमार्ग ॲप द्वारे
ही सुविधा उपलब्ध करता येणार आहे. या सुविधेअंतर्गत चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत
सर्व टोल नाक्यावर वाहनांना न थांबता टोल भरला जाईल अशी यंत्रणा कार्यान्वित होईल.
त्यामुळे टोल नाक्यावरचा वाहनाचा वेळ १० सेकंद किंवा त्यापेक्षाही कमी होणार असल्याचं
मंत्री गडकरी यांनी सांगितलं.
**
दरम्यान, मुंबईत सुरू असलेल्या सातव्या ग्लोबल फिनटेक फेस्टच्या समारोप
सत्रात मंत्री गडकरी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सहभागी होणार आहे.
****
गर्भाशय मुखाचा कर्करोग प्रतिबंधक - एचपीव्ही लसीकरणाचा
८० लाखांहून अधिक टप्पा भारताने पार केला आहे. प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा अधिक बळकट
करण्यासोबतच एचपीव्ही संसर्ग आणि एचपीव्हीशी संबंधित कर्करोगापासून संरक्षणाच्या दिशेने
हा महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
****
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या उपोषणाला
पाठिंबा देण्यासाठी लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यातल्या निटूर इथं आज सकल मराठा समाजाच्या
वतीने लातूर-जहीराबाद महामार्गावर टायर जाळून रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. त्यामुळे
या महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती.
दरम्यान, लातूर-बार्शी महामार्गावर साखरा पाटी इथंही सकल मराठा समाजाच्या
वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं.
****
भंडारा जिल्ह्यात नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावर
पिंपळगाव सडक इथं आज पहाटे ट्रक आणि पिकअप व्हॅनमध्ये झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा
मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये
तीन बालकांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी साकोली इथल्या उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात
आलं आहे.
****
उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने २०२१ ते २०२५ या कालावधीसाठीचे
महाराष्ट्र राज्य महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार काल जाहिर केले. यात मराठवाड्यातल्या
छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ. अरुणा शामराज, डॉ. अशोक देव, डॉ. पंकजा वाघमारे, परभणी इथले चंद्रशेखर महाराज देगलुरकर, उमेश टाकळीकर, कृष्ण पळसकर, नांदेड इथले डॉ. गणंजय कहाळेकर, पैठण इथले दत्तात्रय पोहेकर, अंबाजोगाई इथल्या खोलेश्वर महाविद्यालयातले संस्कृत विभाग प्रमुख
डॉ. दिगंबर मुडेगांवकर यांचा समावेश आहे.
****
No comments:
Post a Comment