Friday, 11 September 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 11.09.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 11 September 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ११ सप्टेंबर २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी जगभरातल्या नेत्यांचं नवी दिल्लीत आगमन

·      ग्राहकहिताकडे दुर्लक्ष न करता तंत्रज्ञानाचा अवलंब करावा-ग्लोबल Fintech फेस्टच्या समारोप सत्रात केंद्रीय अर्थमंत्र्याचं आवाहन

·      युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या वतीने विविध मागण्यांसाठी संप-तीव्र आंदोलनाचा इशारा

·      आगामी ‘विश्व मराठी साहित्य संमेलन’ लंडनमध्ये आयोजित करण्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

आणि

·      डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जिल्हा युवक महोत्सवाला प्रारंभ

****

१८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी जगभरातल्या नेत्यांचं नवी दिल्लीत आगमन होत आहे. या परिषदेत विविध महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक आणि फलदायी चर्चा होईल आणि या परिषदेचा मुख्य उद्देश जागतिक कल्याण हाच असेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ‘भारत मंडपम’ इथं आयोजित या दोन दिवसीय शिखर परिषदेत ११ प्रमुख विकसनशील आणि उदयोन्मुख अर्थव्यवस्था एकत्र येणार आहेत.

या परिषदेसाठी विविध देशांचे राष्ट्रप्रमुख, परराष्ट्रमंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि प्रमुख प्रतिनिधी भारतात दाखल होत आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामाफोसा, युगांडाच्या उपराष्ट्रपती जेसिका अलुपो, ब्राझीलचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मॉरो व्हिएरा, नायजेरिया च्या परराष्ट्र मंत्री बियांका ओडुमेग्वु-ओजुक्वु आणि उरुग्वेच्या परराष्ट्रमंत्री मारियो लुबेत्किन आज दिल्लीत दाखल झाले.

****

दरम्यान, ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत, ब्रिक्स व्यापार मंच २०२६ चं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन झालं. आपल्या आर्थिक शक्तीचं रुपांतर आपल्या लोकांसाठी रोजगार, धन आणि समृद्धीमध्ये करण्यासाठी एकत्र काम करण्याचं आवाहन त्यांनी, ब्रिक्स शिखर संमेलनात सहभागी होत असलेल्या देशांना केलं.

****

ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर, भारताचे डीप-टेक नवोपक्रम प्रदर्शित करण्यासाठी आजपासून नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे दोन दिवसीय ‘भारत इनोव्हेट्स एक्स्पोझिशन’चं आयोजन करण्यात आलं आहे. हे प्रदर्शन भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या ‘लवचिकता, नवोपक्रम, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी’ या संकल्पनेशी सुसंगत असलेले भारताचे ३७ डीप-टेक स्टार्टअप्स आणि उपक्रम प्रदर्शित करत आहे. या कार्यक्रमामुळे व्यवसाय-ते-व्यवसाय संबंध, तंत्रज्ञान भागीदारी, गुंतवणुकीवरील चर्चा, व्यावसायिक संबंध आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश मिळवण्याच्या संधी सुलभ होतील.

****

सुरक्षा आणि ग्राहकहिताकडे दुर्लक्ष न करता नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केलं. मुंबईत ग्लोबल Fintech फेस्टच्या समारोप सत्रात त्या बोलत होत्या. AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता ही दुधारी तलवार असल्याने तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वेग कमी न करताना सुरक्षेची काळजी घेण्याचं आवाहनही सीतारामन यांनी यावेळी केलं.

****

‘बँकर्स बुक्स एव्हिडन्स ॲक्ट, २०२६’ येत्या १ ऑक्टोबरपासून अंमलात येणार आहे. राष्ट्रपतींनी १३ ऑगस्ट रोजी या कायद्याला मंजुरी दिली होती. हा नवीन कायदा १८९१ च्या ‘बँकर्स बुक्स एव्हिडन्स ॲक्ट’ची जागा घेईल. या कायद्यांतर्गत कागदी, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल, आभासी आणि क्लाउड-आधारित स्वरूपांसह इतर आधुनिक माध्यमांमधील बँकिंग नोंदींना मान्यता देण्यात आली आहे. बँकेच्या नोंदींचा कोणताही इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल रेकॉर्ड, पुरावा म्हणून ग्राह्य, आणि कायदेशीररित्या अंमलबजावणीयोग्य असेल.

****

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या वतीने बँक कर्मचाऱ्यांनी आज विविध मागण्यांसाठी तीव्र आंदोलन केलं. पाच दिवसांचा आठवडा लागू करावा, जुन्या पेन्शन योजनेचा लाभ द्यावा, प्रोत्साहनपर भत्ता देताना कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव करू नये, यांसह विविध मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांनी आज संप पुकारला. छत्रपती संभाजीनगर इथे अनेक कर्मचारी या संपात सहभागी झाले.

नांदेड जिल्ह्यातील विविध बँकांतील ४०० हून अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही आज सहभाग नोंदवला. शहरातील शिवाजीनगर मधल्या स्टेट बँक ऑफ इंडियासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं.

बीड जिल्ह्यात सर्व तालुक्यांतील सार्वजनिक बँकांचे २०० हून अधिक अधिकारी कर्मचारी आजच्या संपात सहभागी झाले. मागण्या मान्य न झाल्यास २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान तीन दिवसांचा संप आणि २६ ऑक्टोबरपासून बेमुदत संपाचा इशारा संघटनांनी दिला.

****

आगामी ‘विश्व मराठी साहित्य संमेलन’ लंडनमध्ये आयोजित करण्याची, घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. लंडन इथं महाराष्ट्र मंडळाने शिंदे यांचा ‘ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कार देऊन सन्मान केला, त्यावेळी शिंदे बोलत होते. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांचा हा गौरव करण्यात आला. उपस्थित तरुणांनी ढोल-ताशांच्या गजरात उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं. यावेळी जय महाराष्ट्र, जय भवानी-जय शिवाजीच्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला होता. या सत्काराच्या उत्तरात शिंदे यांनी, महाराष्ट्राने विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला.

****

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये कथित पेपरफुटी, आणि इतर मागण्यांसाठी छत्रपती संभाजीनगर इथे विद्यार्थी कृती समितीच्या वतीने आज आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मार्गदर्शन केलं.

परीक्षेत पारदर्शकता आणावी, पेपरफुटीला जबाबदार असणाऱ्यावर कठोर कारवाई करावी. विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करू नये. यासह इतर मागण्या मोर्चेकऱ्यांनी मांडल्या.

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी इथेही संबंधित उमेदवारांनी तहसील कार्यालयावर आज शांततेत मोर्चा काढला. सरकारने पेपरफुटी संदर्भात योग्य निर्णय घ्यावा आणि पारदर्शक परीक्षा घ्याव्यात यासह इतर मागण्या विद्यार्थ्यांनी यावेळी केल्या.

****

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी उद्या आंतरवाली सराटी इथं मराठा समाज बांधवांची बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर आंदोलनाची पुढील दिशा तसंच मुंबई मोर्चाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मराठा समाजबांधवांनी आजपासून आंतरवाली इथं येण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनात आज कुंभारपिंपळगाव ग्रामस्थांनी घनसावंगी-अंबड मार्गावर रास्तारोको आंदोलन केलं.

लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यातल्या निटूर इथं आज सकल मराठा समाजाच्या वतीने लातूर-जहीराबाद महामार्गावर टायर जाळून रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. लातूर-बार्शी महामार्गावर साखरा पाटी इथंही रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं.

****

कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र वितरणासाठी जालना जिल्ह्यात मंडळस्तरावर घेण्यात आलेल्या आतापर्यंतच्या १२ विशेष शिबिरांमध्ये १२६ अर्ज प्राप्त झाल्याची माहिती जिल्हाधिकारी आशिमा मत्तिल यांनी दिली. प्राप्त अर्जांपैकी ७८ अर्ज समितीअंतर्गत, तर अठ्ठेचाळीस अर्ज गॅझेटअंतर्गत आहेत. काही अर्जांची ऑनलाइन प्रक्रिया अद्याप बाकी आहे. उर्वरित प्रकरणांवर तालुकास्तरीय वंशावळ समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार असून, त्यानंतर तातडीने पुढील कार्यवाही करून अर्ज निकाली काढण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी मत्तिल यांनी दिली आहे.

****


छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जिल्हा युवक महोत्सवाचं उद्घाटन इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आज करण्यात आलं. शंभर वर्षाची उज्वल परंपरा असलेलं शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय आणि सात दशकांची परंपरा असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने अनेक ज्ञानवंत आणि गुणवंत विद्यार्थी घडवले असल्याचं मंत्री अतुल सावे यावेळी म्हणाले. आज विद्यार्थी दशेत असलेल्या सर्वांना देश आणि समाज पुढे न्यायचा असल्याचं प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर विजय फुलारी यांनी यावेळी केलं. यावर्षी या जिल्हा युवक महोत्सवात १ हजार ५१८ युवक कलावंत सहभागी झाले आहेत.

****

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात आठ वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पाटोदा तहसील कार्यालयावर आज जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. चिमुकलीला न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. सामाजिक कार्यकर्ते बाळा विजयसिंह बांगर यांच्या नियोजनाखाली हा मूक मोर्चा काढण्यात आला.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी पुण्यश्वोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्ज मुक्ती योजनेअंतर्गत आज कर्ज माफी योजनेची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत सर्व बँकांनी जिल्ह्यातील १ लाख ९ हजार ७०१ शेतकऱ्यांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली असून या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या, जिल्ह्यातील १ हजार १०५ गावातील एकूण १९ हजार २४३ शेतकऱ्यांचा या तिसऱ्या यादीत समावेश आहे.

****

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूरमधल्या लांजी परिसरातील खरीप पीक परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांकडून पिकांबाबत माहिती घेतली. नैसर्गिक संकटामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांनी काळजी करू नये, राज्य सरकार संपूर्ण संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. चाकूर तालुक्यातील पीक परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेणार असल्याचं बाबासाहेब पाटील यांनी सांगितलं.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...