Sunday, 6 September 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 06.09.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 06 September 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०६ सप्टेंबर २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरातील मृतांचा आकडा १ हजार ३४४ वर पोहचला आहे. सुमारे पाच हजार जण अद्याप बेपत्ता असून, यामध्ये जवळपास ५९० परदेशी नागरिकांचा समावेश आहे. आतापर्यंत १३ हजार १०० हून अधिक नागरिकांची सुटका करण्यात आली. २६ ऑगस्ट रोजी नेपाळ-तिबेट सीमेवर हिमसख्खलन झाल्यानं नेपाळमध्ये महापूर आला होता.

****

निकृष्ट दर्जा, बनावट स्वरुप आणि चुकीची माहिती लावलेली औषधे तयार करणाऱ्या आणि वितरित करणाऱ्यांविरोधात केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था, राज्य औषध नियंत्रण प्राधिकरण आणि कायदा अंमलबजावणी यंत्रणांनी संयुक्त कारवाई तीव्र केली आहे. याच निर्देशांतर्गत संबंधित यंत्रणांनी देशभरात संयुक्त कारवाईचा सुरु केली आहे. याच मोहिमेदरम्यान दिल्लीत परवानाविरहित ठिकाणी तयार केलेली आणि चुकीचे लेबल असलेली रेबीज लसीची एक तुकडी जप्त करण्यात आली असून, या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून कायदेशीर कारवाई केली जात आहे.

****

झारखंड सरकारचे नगरविकास मंत्री सुदिव्य कुमार सोनू यांचं गिरिडीह इथल्या रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्यानं आज पहाटे निधन झालं. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना काल रात्री उशिरा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी दुःख व्यक्त केलं आहे. सुदिव्य कुमार सोनू यांनी आपलं आयुष्य झारखंडची अस्मिता, हक्क आणि स्वाभिमान यांच्या लढ्यासाठी समर्पित केलं होतं. त्यांच्या निधनानं 'वैयक्तिक हानी' झाल्याची भावना सोरेन यांनी व्यक्त केली.

****

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज गोव्यात पश्चिम विभागीय परिषदेच्या २८व्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. तसंच, ते गृहमंत्रालयाच्या बैठकीत सहभाग घेणार असून, त्यानंतर पत्रकार परिषदेलाही संबोधित करणार आहेत.

****

राज्यातील मेळघाट आणि पेंच व्याघ्र प्रकल्पांमध्ये बंदिस्त प्रजननातून तयार केलेल्या गिधाडांचं पुनर्वसन यशस्वी ठरलं आहे. 'बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'च्या माहितीनुसार, डिसेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत दोन्ही व्याघ्र प्रकल्पांमध्ये सोडण्यात आलेल्या २९ गिधाडांमध्ये ७८ टक्क्यांपर्यंत जगण्याचा दर नोंदवण्यात आला आहे.

****

सांस्कृतिक पैलू आणि तर्कावर आधारित विधायक प्रथा-परंपरांमागील विज्ञान, हे नव्या पिढीपर्यंत पोहोचायला हवं, असं प्रतिपादन राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या डॉक्टर जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्काराचं वितरण पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात त्यांच्या हस्ते करण्यात आलं, यावेळी पाटील बोलत होते.

****

यंदाच्या महाराष्ट्र उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी ही माहिती दिली. यावर्षीपासून देशभरासह देशाबाहेरील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठीही स्वतंत्र बक्षिसं ठेवण्यात आली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आता ११ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

****

राज्यात कालपासून येत्या वीस नोव्हेंबरपर्यंत ‘बालस्नेही पंचायत’ आणि 'बालस्नेही प्रभाग' हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. बालकांचे हक्क, संरक्षण, सुरक्षितता, शिक्षण, आरोग्य, पोषण आणि सहभाग याबाबत व्यापक जनजागृती निर्माण करणं हा उद्देशानं महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या पुढाकारानं महिला आणि बाल विकास विभागातर्फे महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, 'युनिसेफ' आणि 'यशदा' यांच्या संयुक्त सहकार्यानं हा उपक्रम होत आहे. ग्रामपंचायतींमध्ये बालस्नेही पंचायत, शहरांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधून बालस्नेही प्रभाग या संकल्पनेअंतर्गत विविध उपक्रम होणार आहेत.

****

राज्य शासनाचा डॉक्टर जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार डॉक्टर अंजली जोशी टेंभुर्णीकर यांना राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. लातूरच्या दयानंद कला महाविद्यालयात डॉक्टर जोशी अध्यापनाचं काम करतात.

****

नंदुरबारमध्ये राज्यस्तरीय तिरंदाजी स्पर्धा कालपासून सुरु झाली आहे. राज्याच्या विविध भागातून २१ वर्ष वयापर्यंतची सुमारे ८०० मुलं - मुली यात सहभागी झाली आहेत. उद्या सोमवारपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे.

****

एक नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना १९८२ ची जुनी निवृत्ती वेतन योजना पूर्वलक्षी प्रभावानं लागू करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाच्या वतीनं बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काल मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनास निवेदन देण्यात आलं.

****

बॅडमिंटनमध्ये, भारताच्या सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी तिसऱ्यांदा 'चायना मास्टर्स' स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, आज दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांनी त्यांचा अंतीम सामना चीनच्या हे जितिंग आणि रेन शियांगयू या जोडीशी होणार आहे. सात्विक आणि चिराग यांच्या जोडीनं उपांत्य फेरीत मलेशियाच्या नूर मोहम्मद अझरिन आयुब आणि टॅन वी किओंग यांचा पराभव केला.

****

कोकणात आज बहुतांश ठिकाणी तर विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...