Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 05 September 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०५ सप्टेंबर २०२६
सायंकाळी ६.१०
****
· प्राथमिक शाळांमधलं विद्यार्थी गळतीचं प्रमाण शून्यावर आल्याबद्दल
राष्ट्रपतींकडून देशभरातल्या शिक्षकांचं अभिनंदन-राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान;महाराष्ट्रातल्या नऊ शिक्षकांचा समावेश
· मनोज जरांगे यांनी उपचारास नकार देऊ नये-मंत्री राधाकृष्ण विखे
पाटील यांचं आवाहन
· गोपाळकाला आणि दहीहंडी उत्सवानिमित्त सर्वत्र उत्साहाचं वातावरण
आणि
· महिलांच्या टी-ट्वेंटी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत-पाकिस्तान
लढत
****
प्राथमिक शाळांमधलं विद्यार्थी गळतीचं प्रमाण जवळपास शून्यावर
आल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशभरातल्या शिक्षकांचं अभिनंदन केलं आहे.
आज शिक्षक दिनानिमित्त दिल्लीत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळ्यात त्या बोलत
होत्या. १२ वर्षांपूर्वी साडे चार टक्क्यांवर असलेलं हे प्रमाण शून्यावर आल्याबद्दल
समाधान व्यक्त करत, एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू
नये यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन राष्ट्रपती मुर्मू यांनी शिक्षकांना केलं. त्या
म्हणाल्या -
बाईट - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
भारतीय संस्कृती आणि परंपरेचा आदर राखताना विद्यार्थ्यांमध्ये
वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवणं, मानवतेसाठी काम करणं, अंत्योदयाच्या दिशेने काम करणं, पर्यावरण रक्षण आणि राष्ट्रहिताला
सर्वोच्च प्राधान्य देण्याची शिकवण विद्यार्थ्यांना देण्याचं आवाहन त्यांनी केलं.
देशभरातील ४८ शिक्षकांसह उच्च शिक्षण क्षेत्रातल्या २१ शिक्षकांना
राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात आलं. यामध्ये बीडमधील कविता गित्ते, नाशिकच्या कुंदा बच्छाव, लातूरचे वैभव कुलकर्णी, साताऱ्याचे शिवप्रसाद टिंगरे, आयआयटी मुंबईतले विक्रम विशाल, वर्ध्याचे अमर ताकसांडे, सोलापूरचे संदीपान नरोटे, धाराशिवचे किरण झरकर आणि नाशिकच्या अर्चना जाधव यांचाही राष्ट्रपतींनी गौरव केला.
****
आर्थिक सहकार्यासोबतच मानवी मूल्ये, सांस्कृतिक
वारसा आणि परस्पर संवादातून अधिक समतोल, शांततामय आणि समृद्ध
जगाची निर्मिती शक्य असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
मुंबईत ‘ग्लोबल इम्पॅक्ट फोरम २०२६’ च्या दुसऱ्या पर्वाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री
बोलत होते. यावेळी विविध देशांचे महावाणिज्यदूत, भारत, ब्राझील,
रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स
देशातील राजनैतिक प्रतिनिधी आणि उद्योजकांसह, अनेक
मान्यवर उपस्थित होते. भारताने आपल्या इतिहासात वस्तू आणि व्यापारासह विचार, ज्ञान आणि जीवनमूल्यांचाही जगभर प्रसार केला, असं
मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात नमूद केलं.
****
राज्य शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या विद्यमान भरती परीक्षेचा
सर्वंकष अभ्यास करून ती अधिक पारदर्शक करण्याच्या उद्देशानं आवश्यक सुधारणा सुचवण्यासाठी
उच्च स्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागानं यासंदर्भातला शासन
निर्णय जारी केला. सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली
या सात सदस्यीय समितीत पोलिस महासंचालक सदानंद दाते, यांचा
समावेश आहे.
****
राष्ट्रीय परीक्षा संस्था ‘एनटीए’ ने
नऊ आणि १० सप्टेंबर रोजी होणाऱ्या इंग्रजी, वाणिज्य
आणि समाजशास्त्र विषयांच्या पुनर्परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी केले आहेत. प्रश्नपत्रिकेतील
त्रुटींनंतर ही परीक्षा पुन्हा घेतली जात आहे. उमेदवारांनी विद्यापीठ अनुदान आयोग-‘युजीसी’
च्या अधिकृत संकेतस्थळावरून प्रवेशपत्र प्राप्त करून घेण्याचं
आवाहन,
परीक्षार्थींना करण्यात आलं आहे.
****
मुंबईत, जोगेश्वरी, गोरेगाव परिसरातल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सदनिका वाटपात झालेल्या
घोटाळ्या प्रकरणी एसआरएच्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. पात्र लाभार्थ्यांना डावलून घरे दिल्याच्या तक्रारी प्रकरणी
ही कारवाई करण्यात आली आहे.
****
मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत मनोज जरांगे यांनी केलेल्या सर्व
मागण्यांची दखल राज्य सरकारनं घेतलेली आहे, त्यांनी
उपचार घेण्यास नकार देऊन टोकाचं पाऊल उचलू नये, असं
आवाहन मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. ते आज
अहिल्यानगर इथं माध्यमांशी बोलत होते. अंतरवाली सराटी इथं जाऊन जरांगे पाटील यांच्या
प्रत्येक मागण्यांवर सरकारनं त्यांच्याशी चर्चा केली आहे. न्यायालयीन प्रक्रियेत सर्व
निर्णय टिकावेत म्हणून कायदेशीर बाबी तपासून त्यावर कार्यवाही सुरू करून, प्रशासकीय स्तरावर प्रक्रियाही सुरू झाली आहे, असं मंत्री विखे पाटील यांनी यावेळी
सांगितलं.
****
दहीहंडीचा सोहळा आज साजरा होत आहे. मुंबईसह राज्यभरात या निमित्ताने
आबालवृद्धांमध्ये उत्साह दिसून येत आहे. मुंबईत ठिकठिकाणी मोठमोठ्या दहीहंडी सोहळ्यांचं
आयोजन करण्यात आलं आहे. लालबाग आणि दादरपासून ते ठाण्यातल्या भव्य मैदानांपर्यंत सर्वत्र
ढोलताशांच्या निनादात मुलामुलींची गोविंदा पथकं दहीहंड्या फोडण्याचा प्रयत्न करत आहेत.
अनेक थर रचून,
हंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस सुरू असल्याचं दिसून
येत आहे. दही हंडी फोडताना काही अपघात झाल्यास गोविंदांवर त्वरित उपचार केले जावेत
याउद्देशानं प्रशासनानं मुंबईतल्या रुग्णालयातल्या १०० हून अधिक खाटा आरक्षित ठेवल्या
असून,
आपत्कालीन वैद्यकीय पथकं तैनात केली आहेत.
छत्रपती संभाजीनगरातही अनेक ठिकाणी दहीहंडी सोहळ्यांचं आयोजन
करण्यात आलं आहे. राजकीय तसंच सामाजिक संघटनांनी गोविंदा पथकांसाठी मोठमोठ्या पारितोषिकांच्या
रकमा जाहीर केल्या आहेत. गोविंदा पथकांनी उभारलेल्या मानवी मनोऱ्यांचा थरार अनुभवण्यासाठी
नागरिकांचीही मोठी गर्दी होत आहे.
****
परभणी जिल्ह्यात गोकुळाष्टमी निमित्त गोपाल काला आणि दहीहंडीचं
आयोजन करण्यात आलं. यानिमित्त अनेक शाळांत दहीहंडीचं आयोजन करून लहान मुलांनी बाळ गोपालच्या
वेशभूषा साकारल्या होत्या. यानंतर दहीहंडी फोडून महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं.
****
अहिल्यानगर जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीनं शिक्षक दिनानिमित्त
उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १४ शिक्षक आणि २ केंद्रप्रमुखांना आज पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण
विखे पाटील यांच्या हस्ते शिक्षक पुरस्कार वितरित करण्यात आले.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अंतर्गत आज चार शिक्षकांना जिल्हा
पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. तर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १४ उपक्रमशील शाळांचा
तसंच ९ विशेष शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
****
तुळजापूर नगर परिषदेतंर्गत सर्व शाळा ह्या वातानुकूलित करण्यात
येणार असल्याचं नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी म्हटलं आहे. ते आज शिक्षक दिनानिमित्त
झालेल्या कार्यक्रमात बोलत होते. उत्तम दर्जाची शाळा उभारण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना
सर्व आधुनिक सुविधा देण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील राहणार असल्याचं गंगणे यांनी यावेळी
सांगितलं. यावेळी नगर परिषद शाळेतल्या २९ शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
****
एक नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर
कर्मचाऱ्यांना १९८२ ची जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावानं लागू करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाच्या वतीनं बीडच्या जिल्हाधिकारी
कार्यालयावर आज मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनास निवेदन
देण्यात आले. उपदानासह सर्व सेवानिवृत्तीचे लाभ मंजूर करावेत, सेवासलगता ग्राह्य धरावी आणि न्यायालयीन निर्णयांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शासनानं तातडीनं निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा
इशारा संघटनेनं दिला.
****
वैद्यकीय प्रवेशाच्या समुपदेशनाची पहिली फेरी पूर्ण झाली आहे.
एमबीबीएसच्या दोन्ही फेऱ्यांत मिळून छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय-रुग्णालय
घाटीत २०० पैकी १७८ प्रवेश झाले. त्यापैकी ४८ विद्यार्थ्यांनी ‘स्टेटस रिटेन्शन’ अर्थात प्रवेश अंतिम केले आहेत. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी
ही माहिती दिली.
****
परभणीतल्या सेलू शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न
केले जातील. शहर स्वच्छ, सुंदर, आधुनिक आणि नागरिकांसाठी अधिक सुविधायुक्त करण्यावर विशेष भर दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली आहे. सेलू इथल्या सार्वजनिक
बांधकाम उपविभागाची नूतन इमारत आणि शासकीय निवासस्थानाचा लोकार्पण सोहळा आज पालकमंत्री
मेघना यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रत्येक कार्यालयाला आयएसओ
मानांकन मिळावे,
या दृष्टीनं काम केलं जाईल असंही पालकमंत्री बोर्डीकर यांनी
म्हटलं आहे. नागरिकांनी स्वच्छतेला प्राधान्य देऊन आपलं शहर कायम स्वच्छ आणि सुंदर
ठेवण्यासाठी सहकार्य करावं, असं आवाहनही त्यांनी यावेळी
केलं.
****
महिलांच्या टी-ट्वेंटी आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत, आज भारतीय संघाची लढत पाकिस्तान संघाशी होणार आहे. भारतीय वेळेनुसार, रात्री आठ वाजता दुबई इथं हा सामना होईल. भारताने यापूर्वीचे दोनही सामने जिंकून
उपांत्य फेरी गाठली आहे.
****
No comments:
Post a Comment