Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 07
September 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ सप्टेंबर २०२६ दुपारी १.०० वा.
****
महिला आणि बालविकास मंत्रालयातर्फे येत्या बुधवारी वाराणसी
इथं ‘राष्ट्रीय पोषण माह २०२६’ या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. या मोहिमेचं यंदाचं
हे नववं वर्ष असून, यावर्षी ‘मिशन सक्षम
अंगणवाडी’ आणि ‘पोषण मोहिमे’च्या दुसऱ्या टप्प्याच्या मार्गदर्शक तत्वानुसार हे अभियान
राबवलं जाणार आहे. ही मोहीम ‘आमची अंगणवाडी, आमची जबाबदारी’ या संकल्पनेवर आधारित असून, यात परस्परपूरक अशा, आहारविषयक विविधता, पुरेशी प्रथिने, अंगणवाडी केंद्रांवर ताजं गरम शिजवलेलं अन्न, सामुदायिक मालकी आणि उत्तरदायित्व, तसंच बालविकासासाठी पोषण आणि शिक्षण आदी बाबींचा समावेश
असेल.
****
भारत आणि फ्रान्स यांच्यातले संबंध मागील काही वर्षांत
नव्या उंचीवर पोहोचले असून, राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉं यांच्यासोबत दोन्ही देश विशेष
जागतिक धोरणात्मक भागीदारी उभारत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
पॅरिसमधल्या स्वामीनारायण हिंदू मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला पंतप्रधानांनी दूरदृश्य
प्रणालीद्वारे संबोधित केलं. भारत-फ्रान्स सहकार्याच्या विविध पैलूंवर भाष्य करताना
त्यांनी, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, संरक्षण, अंतराळ आणि हवामान बदल अशा विविध क्षेत्रांत दोन्ही देश नव्या
वेगानं आणि ऊर्जेनं पुढे जात असल्याचं सांगितलं. ‘मेड इन इंडिया, बिल्ट इन फ्रान्स’ असलेलं हे मंदिर भारताची प्राचीन प्रतिभा
आणि फ्रान्समधल्या आधुनिक अभियांत्रिकी यांचा संगम असल्याचं पंतप्रधान म्हणाले. भारत
आणि फ्रान्समधली मैत्री आणि सहकार्याचं प्रतीक म्हणून हे मंदिर शतकानुशतकं उभं राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
नवी दिल्लीत सत्य निकेतन भागात पाच मजली इमारत कोसळून
सहा जणांचा मृत्यू झाला. एनडीआरएफ आणि दिल्ली अग्निशमन दलाकडून मदत आणि बचावकार्य वेगानं
सुरू आहे. ढिगारा हटवण्यासोबतच ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी शर्थीचे
प्रयत्न सुरू आहेत. इमारतीच्या तळमजल्यावर नूतनीकरणाचं काम सुरू असतानाच ही इमारत कोसळल्याचं
समोर आलं आहे.
****
छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात सुरु असलेल्या केंद्रीय
राखीव पोलीस बलाच्या नक्षलवाद विरोधी अभियानाला मोठं यश मिळालं आहे. सीआरपीएफ च्या
१९९ व्या तुकडीने, मिळालेल्या गोपनीय माहितीच्या
आधारे बीजापूरच्या पीडिया तसंच कुप्पागुडा क्षेत्रातल्या दाट जंगलात शोधमोहीम राबवली.
यात जंगलांमध्ये लपवण्यात आलेल्या १४ नक्षली छावण्यांमधून मोठ्या प्रमाणात हत्यारं
जप्त करण्यात आली.
****
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लातूर तालुक्यातल्या बोरगाव
काळे इथं सकल मराठा समाजाच्या वतीने आज सकाळी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. बोरगाव
काळे, मांजरा पट्टा, मुरुड सर्कल आणि पश्चिम लातूर परिसरातले मराठा बांधव मोठ्या
संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते.
दरम्यान, रेणापूर तालुक्यातल्या कोरेगाव इथं एका तरुणाने टॉवरवर चढून
आंदोलन सुरू केलं आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हा तरुण मागील
दोन ते तीन तासांपासून टॉवरवर बसून आहे. त्याला खाली उतरवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न
सुरू आहेत.
****
धाराशिव जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या तुळजापूर
इथल्या इमारतीचं उद्घाटन काल मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मे यांच्या
हस्ते झालं. विधिज्ञांनी न्यायालयीन कामकाज करताना आपली जबाबदारी आणि प्रामाणिकपणा
जपत कर्तव्य पार पाडावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत
धाराशिव इथं ग्रामीण महिला स्वयंसहाय्यता गटांनी उत्पादित केलेल्या स्थानिक उत्पादनांना
बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी विशेष विक्री महोत्सव आजपासून सुरु झाला. २४ तारखेपर्यंत
चालणाऱ्या या प्रदर्शनात नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन महिला स्वयंसहाय्यता
गटांच्या उत्पादनांची खरेदी करावी, असं आवाहन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आलं आहे.
****
जालना इथं येत्या नऊ आणि १० सप्टेंबर रोजी सांस्कृतिक
कार्य संचालनालयाच्या वतीनं दोन दिवसीय लोकसंगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.
जे.ई.एस. महाविद्यालयात होणाऱ्या या महोत्सवाला प्रवेश विनामूल्य आहे. जालना आणि परिसरातल्या
रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महोत्सवाचा आनंद घ्यावा, असं आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत
खेडकर यांनी केलं आहे.
****
भारतीय युवा फुटबॉल संघानं उत्कृष्ट कामगिरी करत २० वर्षाखालील
आशियाई चषक स्पर्धेच्या मुख्य फेरीसाठी पात्रता मिळवली आहे. पात्रता फेरीच्या अखेरच्या
सामन्यात भारतानं बांगलादेशचा तीन-शून्य असा दणदणीत पराभव केला. तब्बल २० वर्षांनंतर
भारत प्रथमच या स्पर्धेच्या मुख्य फेरीसाठी पात्र ठरला आहे.
****
धाराशिव, लातूर आणि बीड या जिल्ह्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात
सध्यस्थितीत अत्यल्प म्हणजे केवळ १२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर या
धरणातून शेतीसाठी लागणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून, २२ पाणीपुरवठा योजनाही बंद होण्याची शक्यता असल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment